ठाणे : मुंबई - ठाणे सारख्या महानगरातील कचऱ्याच्या समस्येवर हरित पर्याय उपलब्ध झाला आहे. साई खानोलकर या युवा उद्योजकाच्या लाहस् ग्रीन इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीने Tow - Go म्हणजेच Treatment Of Waste On The Go. या 'टोगो' वाहनाचे अनावरण शुक्रवारी आ. प्रताप सरनाईक यांच्याहस्ते ठाण्यातील 'बिझनेस जत्रा' या लघुउद्योजकांच्या मेळाव्यात करण्यात आले. यामुळे घनकचरा निर्मुलन ऑन द स्पॉट होऊन खतनिर्मितीही होणार आहे.असा दावा लाहस् चे साई खानोलकर यांनी केला आहे. पहिल्या टप्यात ही वाहने ठामपा आणि मिरा भाईंदर क्षेत्रात उपयोगात आणली जाणार आहेत.
नागरीकरण वाढत असल्याने घनकचऱ्याचे व्यवस्थापन कोलमडून पडत आहे. ठाणे शहरात वाढत्या कचऱ्याची समस्या गहन बनली असून वारंवार जनजागृती करूनही कचऱ्याची विल्हेवाट लावताना महापालिका प्रशासन मेटाकुटीला आले आहे. एकट्या ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज अंदाजे ९६० मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होत असल्याने तसेच, डंपिंग ग्राऊंडची वानवा असल्याने कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण बनत चालला आहे. यावर आता टोगो वाहनाचा हरित पर्याय उपलब्ध झाला असुन घनकचर्याचे निव्वळ पाच दिवसात खतामध्ये रूपांतर होणार आहे. या स्वयंचलित टोगो व्हॅनचे उदघाटन आ. प्रताप सरनाईक यांच्याहस्ते करण्यात आले. या अभिनव बहुउपयोगी कचरा व्यवस्थापनामुळे शुन्य जागेत कचरा विल्हेवाट लावता येणार आहे.
टोगो वाहन चालवण्यासाठी सीएनजी या हिरव्या इंधनाचा उपयोग केला जातो. या प्रक्रियेत जी ऊर्जा निर्माण होते, ती सुध्दा खत बनवताना वापरली जाते. कचऱ्याचे खतात रुपांतर झाल्यानंतर ८० ते ८५ टक्के कपात होते. (उदा. १००० किलो कचऱ्याचे १५०-२०० किलो खतामध्ये रुपांतर होते. कोणतीही दुर्गंध नाही आणि प्रक्रिया केलेली दिसतही नाही.कचरा गोळा करण्यासाठी मात्र इंजिन चालक व दोन श्रमिकांची गरज भासते.
टोगो हा एक ओल्या कचऱ्याचा कंपोस्टर असुन यात कचऱ्याचे रूपांतर सुक्या खतात होते.गोळा केलेल्या कचऱ्यातुन ओला कचरा विलग करून या वाहनात टाकायचा.पूर्ण प्रकिया वाहनाच्या इंजिनवर चालते. वाहनाच्या टपावर बसवलेल्या सौर ऊर्जेच्या पॅनल्सद्वारे उपलब्ध विजेवर टोगोची बरीच विद्युत कार्ये पूर्ण होतात.स्मार्ट 'TOW-GO' हे पी. एल. सी. टेक्नॉलॉजीवर आधारीत आहे. त्यामुळे कार्यात काही बिघाड झाल्यास, सर्विस प्रोव्हायडरला तात्काळ मेसेज पाठवला जातो व जी काही समस्या निर्माण झाली आहे ती एक्सेस कंट्रोल घेऊन बसल्या जागी सोडवता येते.'TOW-GO' ची स्वतःचीच अशी सुरक्षा यंत्रणा आहे, ज्यात पाळत ठेवण्याची यंत्रणा असुन चोरी नियंत्रण गजर आणि तात्काळ रिर्पोट करणारे यंत्रदेखील समाविष्ट केले आहे.
मिनी टोगो - ६०० किलो प्रतिदिन - १२०० घरांसाठी
स्टँडर्ड टोगो - १५०० किलो प्रतिदिन- २५०० घरांसाठी
हेवीड्युटी टोगो - २४०० किलो प्रतिदिन- ५००० घरांसाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया च्या प्रेरणेतुन वागळे इस्टेट येथील एनव्हायरो इन्व्हेंटच्या पुढाकारातुन लाहस् ग्रीन इंडिया कंपनीचे हे अभिनव टोगो वाहन केवळ ओल्या कचऱ्यावरच प्रक्रिया करते. त्यामुळे प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर आळा बसुन पर्यावरणाचा धोका टळतो. त्यामुळे हा १०० टवके हरीत पर्याय असल्याचा दावा उत्पादकांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास निधीतुन ५० कोटींचा निधी घनकचरा व्यवस्थापनासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. जागेवरच कचरा निर्मुलन होऊन खतनिर्मिती होणार असल्याने या टोगो वाहनांचा वापर ठाणे महापालिका क्षेत्रातील येऊर सारख्या ठिकाणी आणि मिरा-भाईंदर मनपा क्षेत्रातही केला जाणार आहे.- आ. प्रताप सरनाईक