अजित पवारांचा निर्धार मेळाव्यात अखेरचा घाव!

    01-Dec-2023
Total Views | 81
NCP Ajit Pawar Camp Melava


दि.१ डिसेंबर २०२३ राष्ट्रवादी अजित पवार गटाची निर्धार रॅली कर्जत येथे आयोजित करण्यात आली. निर्धार नवपर्वाचा,वैचारिक मंथन घडयाळ तेच वेळ नवी, हे ह्या शिबिराचे घोषवाक्य होते. शिबिराच्या घोषवाक्याप्रमाणे नवपर्वाचा एल्गार अजित पवारांनी मंचावरून केलेला पाहायला मिळाला. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार डेंग्यु झाल्यामुळे माध्यमांपासून लांब होते. परंतु, गेल्या दोन दिवसापासून कर्जतच्या जाहिर सभेत त्यांनी विरोधकांचा खरपुस समाचार घेतला आहे. त्यामुळे अजित पवारांनी कर्जतच्या शिबिरात शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडीबद्दल काय गौप्यस्फोट केले.

अजित पवारांनी शिबिराला संबोधित करताना सुरुवातीलाच आपल्या भाषणात लोकसभा निवडणुकांसाठी गटाचं नेमकं काय धोरण असेल, याबाबत भाष्य केलं. ““लोकसभा निवडणुकीत बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या आपल्याकडे असलेल्या जागा आपण लढवणारच आहोत. पण त्याबरोबर ठाकरे गटाकडे ज्या जागा आहेत, त्यातल्याही काही जागा आपण लढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जागावाटपावर प्राथमिक चर्चा झाली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी प्राथमिक चर्चा करण्यात येणार असल्याचे ही अजित पवारांनी स्पष्ट केलं.तसेच NDA च्या घटकपक्षांना एकत्र घेऊन चांदयापासून बांदयापर्यत काम करणार असल्याचे ही अजित पवारांनी सांगितले.
 
दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवारांनी त्यांच्यावरील आरोपांवर भाष्य केलं. “काही आमच्यावर आरोप करतात की यांच्यावर केसेस होत्या त्या थांबाव्यात म्हणून हे गेले. आमच्यापैकी काहींनी १९९९ पासून बहुतेक मंत्रीमंडळांत काम केलं आहे. त्यामुळे आमच्यावर आरोप झाले. पण आरोप झाले म्हणजे ते सिद्धही व्हायला पाहिजे असतात. माझ्यावर झालेल्या आरोपांमुळे जलसंपदा विकासकामांची गती रेंगाळली. तेव्हा मी निधीला मान्यता द्यायचो म्हणून मला टार्गेट करण्यात आलं, असे ही पवारांनी सांगितले.
 
तसेच याआधी महाराष्ट्राच्या हितासाठी वरिष्ठांच्या मान्यतेने भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. पंरतु काहींच्या दुर्आग्रहामुळे ते सरकार टिकले नाही, हे पुन्हा सांगण्याची गरज नाही. तसेच त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वानी आधी कोणती भूमिका घेतली होती, नंतर भूमिका कशी बदलली हे वारंवार सांगितल्याचे ही अजित पवार म्हणाले.तसेच महायुतीच्या सरकारमध्ये जाण्याच्या निर्णयाबद्दल अजित पवार म्हणाले की, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आम्ही १०-१२ जण होतो. देवगिरीला बसलो होतो. आम्ही काय करायचा विचार सुरू होता. डायरेक्ट साहेबांना सांगितलं तर काय वाटेल असं वाटल्याने आम्ही सुप्रिया सुळेंना माझ्या घरी बोलावलं. त्यानंतर सुप्रिया ताईंनी ७ दिवस मागितले. मी साहेबांना कन्व्हिन्स करते. काय करायचं ते माझ्यावर सोपवा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. आम्ही सात-आठ दिवस थांबलो. पुन्हा आम्ही एकत्र बसलो.

अनिल देशमुख, जयंत पाटील होते. सरकारमध्ये गेलं पाहिजे. आमदारांच्या कामाला स्थगिती मिळाली आहे. अनेक प्रश्न आहे. बहुजन समाज आणि अल्पसंख्यांकाचा विचार झाला पाहिजे. याचा विचार यावेळी आम्ही केला, अशी माहिती अजित पवारांनी दिली. त्यानंतर हा निर्णय साहेबांना सांगण्यात आला. तेव्हा साहेबांनी सांगितले की, सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. त्यानंतर २ मे ला पुस्तक प्रकाशानावेळी साहेबांनी राजीनामा दिला. त्यावेळी शरद पवार राजीनामा देणार हे कुणालाही माहीत नव्हतं. फक्त घरातील चार लोकांना माहीत होतं. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. मग पुढे १५ जणांची कमिटी स्थापन करण्यात आली. समितीने बसावं आणि अध्यक्ष निवडावा असं शरद पवारांनी सांगितलं. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शऱद पवार यांनी राजीनामा दिल्यावर सर्वच आश्चर्यचकित झाले. त्यातून वातावरण वेगळं झालं. त्यानंतर शरद पवार घरी गेले. त्यानंतर अनेकांनी वेगवेगळी प्रतिक्रिया दिली. राजीनामा दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना बोलावून घेतलं आणि वायबी सेंटर बाहेर आंदोलन करण्यास सांगितलं. म्हणजे वायबीसमोरचं आंदोलन ठरवून झाल्याचा गौप्यस्फोट ही अजित पवारांनी केला. तसेच राजीनामा द्यायचा नव्हता तर नाही द्यायचा. पण आम्हाला अस संभ्रमात का ठेवण्यात आलं, अशी टीका ही अजित पवारांनी शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावर केली.

त्याचबरोबर याआधी विरोधीपक्ष नेते पद सोडतो सांगितले पण संघटनेची जबाबादारी देण्यात आली नाही, अशी खंत ही अजितदादांनी बोलून दाखवली. त्याचनंतर २ जुलैला शपथविधी झाल्यानंतर ही निर्णय आवडला नाही म्हणून १५ जुलैला बोलवण्यात आलं. आधी मंत्री या मग आमदार या असे सांगितले. निर्णय आवडला नाही तर बोलावले कशाला?, असा सवाल ही अजितदादांनी उपस्थित केला. तसेच १२ ऑगस्टला मला एक उद्योगपतीने बोलावले. शरद पवार आणि जयंत पाटील असतील असा मला निरोप आला, म्हणून मी गेलो," असा खुलासा ही त्यांनी पुण्याच्या भेटीबाबत अजित दादांनी केला.तसेच डेंग्यू झाल्यावर उद्दव ठाकरेंनी केलेल्या टिकेला उत्तर देताना अजितदादा म्हणाले की, मला विकनेस आला होता. डॉक्टरांनी मला काळजी घ्यायला सांगितली होती. त्या पद्धतीने मी काळजी घेतली. पण अनेकांनी म्हटलं की अजित पवारांना राजकीय आजार झाला. मी काही लेचापेचा राहिलो नाही राजकीय आजार व्हायला, अशी टिका ही पवारांनी उद्धव ठाकरेंवर केली.

तसेच मुलांपेक्षा मुलीच जास्त वंशाचा दिवा लावतात, काहींना याचा अनुभव आहे असं सांगत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावलाय. त्यावेळी राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात कुटुंब नियोजनाचं महत्व सांगताना अजितदादांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला. यावेळी समान नागरी कायद्याबाबत अनेकांच्या मनात गैरसमज असल्याचंही अजितदादांनी सांगितलं.त्याचबरोबर धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामीत्व हा आपल्या पक्षाचा आत्मा आहे. त्यामुळे काही जण म्हणतात की, तुम्ही त्यांच्यासोबत कसे गेलात. मुळात जर आमच्या वरिष्ठांनी सांगितले तर शिवसेनेसोबत जाऊ शकतो मग ह्यांच्यासोबत का नाही? असा सवाल ही पवारांनी उपस्थित केला. तसेच आज काही पक्ष स्वता: ला सेक्यूलर आणि दुसऱ्यांना जातीवादी समजतात. स्वता: ला सेक्यूलर समजून घेणारे पक्ष आज इंडिया आघाडी म्हणून एकत्र येऊन भाजप आणि मित्र पक्षांवर टिका करतात. पंरतु देशातील महत्त्वाच्या पक्षांनी कधीना कधी भाजपासोबत युती केलेली आहे. मग त्यांनी विचारधारा सोडली नाही. पण आम्ही सोडली असं कसं म्हणता.

ममता बनर्जी, फारुख अब्दुला, महेबुबा मुफ्ती, नितिश कुमार अशा सर्वांनीच भाजपासोबत युती केली. मग त्यांनी निर्णय घेतला तर ते योग्य आणि आम्ही भाजपासोबत गेलो, तर आम्ही जातीवाद्यांसोबत गेलो असं कंस म्हणता येईल. तसेच इंडिया आघाडीवर टिका करताना अजित पवार म्हणाले की, इंडिया आघाडीला नेता ठरवता येत नाही? आघाडीच्या लोगोवर एकमत करता येत नाही? आघाडीची बैठक कुठे घ्याची हे ठरवता आले नाही? अशा परिस्थितील लोकांच्या हातात देश सोपवायचा का? ह्यांचा विचार देशातील जनतेने करायला हवा. गोंधळलेलं राज्य ते विकसित राज्य असा प्रवास समजून घेतला पाहिजे, असे ही पवार म्हणाले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा मुळ पक्षच आहे. शाहू, फुले , आंबेडकरांची विचारधारा आम्ही सोडलेली नाही. मी जरी त्याकाळी प्रांतध्यक्ष किंवा संघटनेचा पदाधिकारी झालेला नसलो, तरी संघटनेची कामे कोण करत होते. हे आपल्याला चांगलेच ठाऊक आहे, अशी टिका ही पवारांनी केली.
 
त्याचबरोबर कुणाच्या ताटात कमी असेल तर आपल्या ताटातील काढून दुसऱ्याला देणं ही आपली संस्कृती आहे. कुणाच्या ताटाखालंच मांजर होणं ही आपली संस्कृती नाही. त्यामुळे आज जे लोक लायकी काढत आहेत. त्यांनी समजून घ्यावं की, माणसांची लायकी त्यांच्या जातीवर अवलंबून असते. तर कर्त्तुत्वावार ठरत असते, असा टोला ही अजित पवारांनी ठाकरे गटावर लगावला.तसेच केंद्रात भाजपाची एकहाती सत्ता असल्याने जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलाला आहे. नरेंद्र मोदींसारखे विकासाचा दृष्टीकोण असणारे नेतृत्त्व भारताला मिळाल्यामुळे भारताला जागतिक मान्यता मिळालेली आहे. तसेत अस्थिर वातावरणात किती विकास झाला, हा अभ्यासाचा विषय आहे. पंरतु आज देशाच्या विकासासाठी लागणारे खमके नेतृत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपाने मिळाले आहे, अशा शब्दात पंतप्रधानांचे कौतुक ही अजित पवारांनी केले. 




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121