क्रियाशून्य बडबड निरर्थकच!

    08-Nov-2023   
Total Views |
Knowledge without experience is worthless

समर्थांच्या मते, आपली कृती, आपण करीत असलेली क्रिया महत्त्वाची आहे. नुसत्या क्रियाशून्य बडबडीला काही अर्थ नसतो. अशी बडबड, असा उपदेश लोक तेवढ्यापुरता ऐकतात व विसरतात. कारण, त्यामागे सांगणार्‍याच्या शब्दाला कृतीचे पाठबळ नसल्याने ते सांगणे, तो उपदेश प्रभावशाली होऊ शकत नाही. अनुभवाशिवाय ज्ञानाच्या गोष्टी व्यर्थ आहेत. मन हे विचार करणारे असते. म्हणून समर्थ सांगतात की, हे विचाराने तुझे तुलाच तत्त्व शोधून काढायचे आहे. लोक ज्ञान पुष्कळ सांगतात. अनेक पुस्तकांतून ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. हे खरे असले तरी ते ज्ञान आपण शोधून पाहिल्याशिवाय त्याचे खरेपण मनावर बिंबत नाही.

केवळ शब्दज्ञानात पारंगत असलेले, पुस्तकीज्ञानाने गर्विष्ट झालेले पंडित अहंकारात आकंठ बुडालेले असल्याने मृत्यूसमयीही त्यांची बढाईखोर आत्मप्रौढी मिरवण्याची वृत्ती कायम राहते. त्यामुळे अशांना मृत्यूनंतर स्वर्गात प्रवेश न मिळतात्यांना ब्रह्मराक्षस या पापयोनीत जावे लागते. ती पिशाच्च योनी असल्याने तेथील अवस्था दयनीय असते, हे समर्थांनी मागीलश्लोक क्र. ११३ मध्ये सांगितले आहे. समर्थपुढे असेही म्हणाले की, परमेश्वराशिवायसर्वज्ञ, सर्वज्ञानी असा दुसरा कोण आहे? अर्थात कुणीही नाही, असे असताना आपल्या विद्वत्तेचा, ज्ञानाचा, पांडित्याचा गर्व करण्यात अथवा त्यासंबंधी दुराभिमान बाळगण्यात काही अर्थ नसतो, ही वस्तुस्थिती आहे. असे असले तरी आपल्यासारखी सामान्य माणसे थोड्याशा शास्त्रवाचनाने, अनुभवाचा लेश नसताना, इतरांना ज्ञानाच्या गोष्टी सांगत सुटतात. मुखाने असे ज्ञानाच्या गोष्टी बडबडणे निरर्थक असते. पुढे त्याचा परिणाम असा होतो की, अतिअहंभाव, गर्विष्टपणा, बढाई, दांभिकता हे अवगुण वाढीस लागतात. या परिणामांची जाणीव नसल्याने असा माणूस आपल्या अवगुणात आनंद मानू लागतो. त्याच्या ठिकाणी अहंकार साठतच जातो. स्वामींनी हे पुढील श्लेकात अर्थवाही शब्दांत सांगितले आहे-

फुकाचे मुखीं बोलता काय वेचें।
दिसेंदिस अभ्यांतरी गर्व सांचे।
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।
विचारें तुझा तूंचि शोधून पाहें॥११४॥


परमेश्वरी सत्ता हीच खरी सर्वार्थाने ज्ञानयुक्त आहे. या सर्व विश्वातील घडामोडी म्हणजेच विश्वाचा कारभार आपोआप चालला आहे, असे मानता येत नाही. तर्कशास्त्रातील नियमानुसार कारणाशिवाय कार्य घडत नाही. प्रत्येक घटीत घटना हे कार्य असल्याने त्याला काहीतरी कारण असावे लागते. याला आपण ’कार्य-कारण भाव’ म्हणतो. तथापि, निसर्गातील किंवा जीवनातील काही घटना, प्रसंग अद्भुत चमत्कृतीपूर्ण असतात की त्यांची कारणपरंपरा शोधता येत नाही. असे का घडले, याचे कारण शोधताना सापडलेल्या कारणाचे कारण शोधताना एका विशिष्ट ठिकाणी थांबावे लागते.

हे आध्यात्मविद्येत आहे असे नव्हे, तर पदार्थविज्ञानात भौतिकशास्त्रातही असेच आहे. तेथे अंतिम कारण सापडत नाही. अशावेळी या विश्वाचा पसारा सांभाळणारा कोणीतरी जगचालक असला पाहिजे, हे मानण्यावाचून गत्यंतर नसते. ही परमेश्वरी सत्ता मानल्यावाचून विश्वाचे कोडे उलगडता येत नाही. परमेश्वर हा सर्वज्ञ असल्याने त्याला भूत-भविष्याचे ज्ञान असते. सामान्य माणूस काही घटनांमागील उद्देश समजू शकत नाही. संतांची परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा, विश्वास असल्याने त्यांना परमेश्वरी सत्तेचे प्रत्यंतर येते. संत आपल्या इच्छा-आकांक्षा परमेश्वरी सत्तेशी जोडतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील भौतिक, मानसिक समस्यांकडे ते तटस्थ वृत्तीने पाहू शकतात. त्यांची शांती ढळत नाही अथवा प्राप्त गोष्टींचा त्यांना अभिमान, गर्व, अहंकार होत नाही. ईश्वरेच्छा प्रमाण मानून ते व्यावहारिक जगात वावरत असतात. आपण मात्र आपला अहंकार देहबुद्धी पोसण्याच्या परमेश्वरी योजनांशी सांगड न घालू शकल्याने, आपले तेच खरे असे समजून फक्त तोंडाने बडबड करीत असतो.

पुस्तकी ज्ञानाने, शब्दपांडित्याने आपण ज्ञानी असल्याचा भ्रम या पंडितांना होतो. अनुभवाचा लवलेश नसलेले हे भ्रमिष्ट पंडित फक्त बडबड करून लोकांना ज्ञान सांगत सुटले आहेत. अशी फुकटची बडबड करायला काही पैसे पडत नाहीत. ज्ञानतत्त्वांचा अभ्यास नसताना फुकटचीबडबड करण्यासाठी या पंडितांचे काही खर्च होत नाही, उलट त्यामुळे अहंकार मात्र वाढत जातो. फक्त शब्दज्ञान असलेले, ज्ञानीपणाचा आव आणणारे हे पंडित लोकांकडून आपली पूजा करवून घेतात. अध्यात्म हे प्रचितीचे शास्त्र आहे. स्वानुभव तेथे महत्त्वाचा असतो. कसलाही ज्ञानानुभव नसलेले, प्रचितीच्या बाबतीत शून्य असलेले हे ढोंगीबाबा आपण ईश्वराला जाणले असे सांगून लोकांना फसवत असतात. अशांच्या केवळ बडबडीने कुणाचाही फायदा होणार नसून बडबडीतून निर्माण झालेल्या, साठलेल्या अहंकाराने या दांभिक बाबीचे नुकसानच होणार आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवणार्‍या भोळ्या भाविकांचे नुकसान तर होतेच, पण आपणदांभिकाच्या नादी लागल्याने मूर्ख बनलो, हा मनस्तापही सहन करावा लागतो.

यासाठी अध्यात्मात प्रचिती, आत्मज्ञान यांची खात्री पटल्याशिवाय शिष्यत्व पत्करू नये. तसेच अध्यात्माप्रमाणे व्यवहारात, प्रपंचात अनुभूतीला, प्रचितीला प्रत्यक्ष क्रिया करण्याल विशेष महत्त्व आहे. क्रिया न करता फक्त तोंडाने बडबडणार्‍या वाचाळवीरांना काही महत्त्व उरत नाही. समर्थांनी या श्लोकात याबाबत आपले स्पष्ट मत नोंदवले आहे की, ’क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे!’ समर्थांचा, समर्थ विचारांचा भर साक्षेप, सततोद्योग यावर आहे. त्यांना आळसाचा विलक्षण तिटकारा आहे. समर्थांचे बोल स्वानुभवावर आधारित असतात. ते बोल हे एका चिंतन करणार्‍या महात्म्याचे बोल असल्याने अशी म्हणीवजा वाक्ये त्यांच्या मुखातून सहजपणे बाहेर पडतात. समर्थांची वाणी ही ओजस्वी, प्रभावी व प्रासादिक असल्याने त्यांच्या रचनेत अशी सुभाषितवजा अनेक दर्जेदार वाक्ये मनाच्या श्लोकात सापडतात. आज समर्थांच्या रचनांना ३५० वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला असला तरी लोकांच्या ती वाक्ये नित्य वापरात आहेत. ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे!’ हे त्यांपैकीच एक. समर्थ भाषाप्रभू आहेत. काही नवीन बनवलेल्या शब्दाचा वापर ते चपखलपणे करतात. उदाहरणार्थ, मनाच्या श्लोकांतील ’क्षयातीत’, ‘ज्ञानबोधे’, ‘मौनावला’, ‘सदासर्वदा’ असे अनेक शब्द आहेत. प्रस्तुत श्लोकात तसाच स्वामींनी ’दिसेंदिस’ या वेगळ्या शब्दाचा उपयोग केला आहे. तो शब्द अर्थवाही असून भुजंग प्रयात वृत्तात तोल सांभाळतो.

समर्थांच्या मते, आपली कृती, आपण करीत असलेली क्रिया महत्त्वाची आहे. नुसत्या क्रियाशून्य बडबडीला काही अर्थ नसतो. अशी बडबड, असा उपदेश लोक तेवढ्यापुरता ऐकतात व विसरतात. कारण, त्यामागे सांगणार्‍याच्या शब्दाला कृतीचे पाठबळ नसल्याने ते सांगणे, तो उपदेश प्रभावशाली होऊ शकत नाही. अनुभवाशिवाय ज्ञानाच्या गोष्टी व्यर्थ आहेत. मन हे विचार करणारे असते. म्हणून समर्थ सांगतात की, हे विचाराने तुझे तुलाच तत्त्व शोधून काढायचे आहे. लोक ज्ञान पुष्कळ सांगतात. अनेक पुस्तकांतून ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. हे खरे असले तरी ते ज्ञान आपण शोधून पाहिल्याशिवाय त्याचे खरेपण मनावर बिंबत नाही. यासाठी समर्थ या श्लोकाच्या शेवटच्या ओळीत सांगत आहेत की, ’विचारें, तुझा तूंचि शोधून पाहे.’ अनुभवी माणसाने ज्ञानाचा उपयोग संवाद साधण्यासाठी करावा आणि वाद नष्ट करावेत. समर्थांनी पुढील श्लोकात तो विचार पुन्हा मांडून ‘तुटे बाद संवाद तो हितकारी’ या गटातील श्लोकांची सांगता केली आहे.

7738778322
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..