काँग्रेसला ओबीसींची मतं घेण्याचा अधिकार नाही; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका, म्हणाले, राहुल गांधींनी...

    26-Jul-2025
Total Views |


नागपूर : काँग्रेसला ओबीसींची मते घेण्याचा अधिकार नाही. राहुल गांधींनी देशाची आणि ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. आधीच जातनिहाय जनगणना न करणे ही माझी चूक होती, या राहुल गांधींच्या विधानावर त्यांनी प्रत्युत्तर दिले. शनिवार, २६ जुलै रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "मोदीजींनी जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्यामुळे या देशात मोठ्या प्रमाणात क्रांती होणार आहे. सर्व समाजांचा विकास व्हावा, यासाठी ही जनगणना आहे. राहुल गांधींना उशीरा सुचलेले हे शहाणपण आहे. त्यांनी देशाची आणि ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे. काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीने ओबीसी समजाला वेठीस धरले होते, त्यांना ओबीसींचे मत घेण्याचा अधिकार नाही. काँग्रेसने ओबीसींवर अन्याय करण्याचे काम केले."


आपण सर्वांनीच स्वत:ला दुरुस्त करून घ्यावे!

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात बदल होण्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, "हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्या त्या पक्षाच्या नेत्यांना त्यांचे निर्णय घ्यावे लागतात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याने ते अंतिम निर्णय घेतील. जनतेच्या मनात आपल्याबद्दल वाईट भावना निर्माण होईल, आपल्या प्रतिष्ठेला डाग लागेल, जनतेचे मत खराब होईल, ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिले ते आमच्या वागण्या-बोलण्यामुळे नाराज होत असतील तर यासाठी आम्ही सर्वांनीच स्वत:ला दुरुस्त करून घेतले पाहिजे. मंत्रिमंडळ आणि सरकारचा चेहरा गतीमान, पारदर्शी आणि लोकाभिमुख ठेवला पाहिजे," असेही ते म्हणाले.