दिल्लीत वायु प्रदूषणाची स्थिती गंभीर, हवा गुणवत्ता निर्देशांक पाचशेपार
03-Nov-2023
Total Views | 29
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये हिवाळाच्या प्रारंभीच वायु प्रदूषणाची स्थिती गंभीर झाली आहे. दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसराचा (एनसीआर) हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्युआय) हा पाचशेपार गेला आहे. दिल्लीच्या आजूबाजूच्या राज्यांच्या शेतात पिकांचे अवशेष (पराल) जाळून निघणारा धूर थेट राजधानी दिल्लीत पोहोचतो. दिल्लीतील दाट लोकसंख्येमुळे प्रदूषण अनेक पटींनी वाढते.
ऑक्टोबर ते डिसेंबर हे महिने राजधानीसाठी सर्वाधिक हानीकारक असतात कारण या काळात शेतात पराली मोठ्या प्रमाणात जाळली जाते. दिल्लीच्या आसपासची राज्ये म्हणजे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यामध्ये जाळल्या जाणाऱ्या परालीमुळे दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात वायु प्रदूषणाची स्थिती गंभीर झाली आहे.
देशाची राजधानी दिल्लीतील अनेक ठिकाणांचा एक्युआय हा ४०० ते ५०० च्या पार गेला आहे. दिल्लीतील आनंदविहार परिसरात तर एक्युआय ८०० झाला होता. त्याचप्रमाणे नोएडा, गाझियाबाद, गुरुग्रामसह एनसीआर परिसरातही वायु प्रदुषणाचा स्तर धोकादायक झाला आहे. त्यामुळे संपूर्ण दिल्लीमध्ये धुळीचा करड्या रंगाचा थर पसरल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या नायब राज्यपालांनी शुक्रवारी सायंकाळी उच्चस्तरीय बैठकीत प्रदूषण आणि त्याच्या उपायांचा आढावा घेतला.