अंधांच्या जीवनात सुगंधाची अनुया

    26-Nov-2023   
Total Views |
Article on Anuya Joshi

दृष्टिहीन व्यक्तींना सुगंधी द्रव्याच्या मूल्यमापन कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देऊन, स्वावलंबी बनविण्याचे काम करणार्‍या डोंबिवलीकर अनुया जोशी यांच्याविषयी...

अनुया यांचा जन्म डोंबिवलीत झाला. त्यांचे बालपणही डोंबिवलीतच गेले. त्यांचे शालेय शिक्षण टिळकनगर विद्यामंदिरमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी डोंबिवलीतील पेंढरकर महाविद्यालय आणि वि. ग. वझे महाविद्यालयातून पूर्ण केले. अनुया यांनी ’परफ्यूमरी अ‍ॅण्ड कॉस्मेटिक मॅनेजमेंट’ या अभ्यासक्रमाचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. अनुया यांचे वडील धनंजय साने हे मनपामध्ये नोकरी करत होते. त्यांची आई धनश्री या पेंढरकर महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. ’परफ्यूमरी अ‍ॅण्ड कॉस्मेटिक मॅनेजमेंट’ या क्षेत्रात येण्याचे बाळकडू अनुया यांना आपल्या आजोबांकडून मिळाले. त्यांच्या आजोबांनीदेखील याच विषयात १९३५ साली बनारस हिंदू विद्यापीठातून ’एमएससी’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यामुळे आजोबा घरी नेहमी साबण, शाम्पू किंवा तेल तयार करत असत. हे सर्व पाहून अनुया यांना हळूहळू त्याविषयी आवड निर्माण झाली. त्यानंतर अनुया यांनीदेखील या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

२००८ला त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, त्यांनी एका कंपनीत नोकरी करण्यास सुरुवात केली. एके दिवशी त्या वझे महाविद्यालयात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना महाविद्यालयात प्राध्यापकपदासाठी काही जागा भरण्यात येणार असल्याची माहिती समजली, त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. वझे महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक पदावर अनुया रुजू झाल्या. अनुया यांनी ज्या महाविद्यालयातून शिक्षण घेतले, तिथेच नोकरीची संधी मिळाली. सुगंधी द्रव्ये ही तशी चैनीची गोष्ट मानली जाते. पण सुगंधी द्रव्ये आणि सौंदर्य प्रसाधने (कॉस्मेटिक) आता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहेत. टूथपेस्ट, शाम्पू, साबण, टॉल्कम पावडर केवळ एवढेच नाही, तर चहा पावडर यांसारख्या खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा सुगंधी द्रव्यांचा वापर केला जातो. चहा पावडर, कॉफी हातात घेतल्यानंतर ग्राहक प्रथम त्यांचा सुगंध कसा आहे, हे पाहत असतो. त्यानंतर उकळल्यानंतर त्यांचा सुगंध वेगळा येतो. या क्षेत्रात विद्यार्थी घडवित असतानाच, संबंधित कंपनी सोबतही त्यांचा संवाद साधला जात होता. एका कंपनीशी बोलताना दृष्टिहीन व्यक्तींना या विषयाचे प्रशिक्षण दिले जावे, असा विषय समोर आला. तिथूनच या कामाला मूर्त स्वरूप देण्यास प्रारंभ झाला.

पण, दृष्टिहीन व्यक्तीशी संपर्क कसा साधायचा, हा प्रश्न होता. त्यासाठी ‘नॅशनल ब्लाईंड असोसिएशन इंडिया’ यांच्या माध्यमातून हा विषय दृष्टिहीन व्यक्तीपर्यंत पोहोचविला. या सगळ्यासाठी निधीसह सामग्रीची ही आवश्यकता लागणार होती. त्यामुळे अनुया यांनी वझे महाविद्यालयाच्या माध्यमातून २०१२ मध्ये अंधांसाठी सुगंधी द्रव्यांच्या मूल्यमापन कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू केला. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून दृष्टिहीन विद्यार्थ्यांना सुगंधी रासायनिक द्रव्य आणि अत्तरे यांच्या गंधांच्या मूल्यमापनाचे प्रशिक्षण देण्याचे काम केले जाते. या दृष्टिहीन विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणे या उद्दिष्टाने प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली.

या प्रशिक्षणामुळे अनेक दृष्टिहीन विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यामुळे त्यांना समाजात ’व्हाईट कॉलर’ असे काम करता येऊ लागले आहे. आपण आपल्या कुटुंबांची आणि मुलांची व्यवस्थित काळजी घेऊ शकतो, ही खात्रीदेखील त्यांना झाली आहे. या कामामुळे दृष्टिहीन विद्यार्थ्यांमध्ये स्वयंप्रेरणा आणि आत्मविश्वास वाढला आहे. आपले काम सांभाळूनही अनेक जण प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात, त्यांना आपले काम सांभाळून प्रशिक्षण घेता यावे, याकरिता वेळेचे त्या पद्धतीने नियोजन केले जाते. हे सर्व काम करीत असतानाच, २०१८ मध्ये अनुया यांना ’पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन परफ्यूमरी अ‍ॅण्ड कॉस्मेटिक मॅनेजमेंट’ विभागाच्या प्रमुख म्हणून जबाबदारी दिली.
 
दृष्टिहीन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताना अनुया आणि त्यांच्या सहकारी यांच्यासमोर अनेक आव्हाने होती. सुगंधी द्रव्यांमध्ये एक हिरवा फ्लेव्हर येतो. जो पानांचा, भाज्यांचा असतो. पण, दृष्टिहीन विद्यार्थ्यांनी हिरवा रंग कधी पाहिलाच नाही, तर त्यांना ते कसे समजावून सांगणार, अशी अनेक आव्हाने त्यांच्यासमोर होती. कधी-कधी या दृष्टिहीन विद्यार्थ्यांकडूनही त्यांना खूप काही शिकता आले. जसे एखादा साबण हा अनेकदा केवळ रंग पाहून पसंत केला जातो. पण, या व्यक्तींकडून निरपेक्षपणे योग्य सुगंध असलेला साबण निवडला जातो, अशा सकारात्मक गोष्टीही खूप शिकता आल्या.

अनुया यांनी २०१९ला एक परीक्षा दिली होती. या परीक्षेनंतर एका व्यक्तीची निवड केली जाते. त्या व्यक्तीला फ्रान्सला प्रशिक्षणाची संधी मिळते. त्यासाठी भारतातून एक व्यक्तीची निवड केली जाते, त्यात अनुया यांचा समावेश होता. अनुया फ्रान्सला जाऊन सर्व गोष्टी पाहून आल्या. फ्रान्स ही सुगंधी द्रव्ये आणि सौंदर्य प्रसाधनांची पंढरी मानली जाते. त्यामुळे या प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या, सामान्य विद्यार्थ्यांना घेऊन अनुया या फ्रान्सला गेल्या होत्या. त्यासाठी त्यांनी फ्रान्स विद्यापीठाशी चर्चा करून कोर्स डिझाईन केला होता. या सर्वासाठी त्यांना दोन वर्षं मेहनत घ्यावी लागली. यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा हा भाषेचा होता. पण, या अडथळ्यावर मात करत, ते विद्यार्थ्यांना घेऊन तिथे गेले, अशा या हरहुन्नरी प्राध्यापिकेला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.