मूळव्याधीचे मूळ...

    09-Oct-2023
Total Views | 153
What is the fastest way to heal a hemorrhoid

मूळव्याधीसाठी अनेक पॅथीमध्ये औषधे उपलब्ध आहेत. रुग्ण ऑपरेशनच्या भीतीने इतर पॅथीकडे वळतात व त्यात काही वेळा आजार बळावतो. तेव्हा आजच्या या लेखात मूळव्याधासंबंधी थोडक्यात माहिती करून घेऊया.

शौचामध्ये रक्त पडणे हे लक्षण अनेक रुग्णांना असते. परंतु, संकोचामुळे ते डॉक्टरला हे लक्षण सांगण्याचे टाळतात. गुदद्वाराच्या नसा फुगल्यावर त्यातून काही वेळा रक्तस्राव होतो. या फुगलेल्या नसा गुरूद्वाराच्या प्रवेशद्वाराजवळ असतात (बाह्य मुळव्याध) किंवा ‘एनल कॅनाल’ व ‘रेक्ट’ममध्ये (आंतर मुळव्याध) असतात. शौचास कडक झाल्यास किंवा बद्धकोष्टामुळे शौचासाठी जास्त जोर लावावा लागल्यामुळे, या फुगलेल्या नसांतून रक्तस्राव होतो व शौचावाटे रक्त जाऊ लागते.

लक्षणे

शौचावाटे रक्त पडणे हे मूळव्याधीचे एक प्रमुख लक्षण असते. इतर लक्षणे - १) बद्धकोष्ट - शौचास साफ न होणे व कडक होणे. २) शौचाच्या वेळेस वेदना होणे ३) रक्त पडणे : हे रक्त थोडेसे शौचास लागून येते किंवा रक्ताचे काही थेंब ठिबकतात. ४) गुदद्वाराच्या येथे सूज येणे : बाह्य मूळव्याधीमुळे फुगलेल्या नसा गुदद्वाराच्या प्रवेशाद्वारापाशी दिसतात, यामुळे त्या भागात सारखे दुखत राहणे, चालताना त्रास होणे इत्यादी लक्षणे जाणवतात.५) रक्तस्राव झाल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे व अशक्तपणा वाढणे.

निदान

मूळव्याधीचे निदान हे व्यवस्थित हिस्ट्री आणि तपासणीने होऊ शकते. तपासणीमध्ये गुदद्वाराची बाह्य तपासणी केली जाते. बाह्य मूळव्याध असल्यास गुदद्वाराजवळ फुगलेल्या नसा दिसतात. या भागातील आणखी दोन आजार आहेत. १) फिशन इन एनो (गुदभ्रंश) बद्धकोष्टामुळे गुदद्वाराच्या प्रवेशद्वारावर चीर पडते व त्यातून थोडासा रक्तस्राव होतो. शौचाला जाताना प्रचंड वेदना होतात. शौचाला जाऊन आल्यावरदेखील गुदद्वाराच्या येथे बर्‍याच वेळा दुखत राहते. अशा रुग्णांची तपासणी केल्यास गुदद्वाराशी सूज नसते. पण, गुदद्वार आंकुचन पावलेले असते. (एनल स्पिंकटर स्पाझम) अशा रुग्णामध्ये डिजिटल पर रेक्टल तपासणी टाळावी. कारण, याने प्रचंड वेदना होतात. २) भगंदर (फिस्टुला) - या आजारात एक ट्रॅक तयार होतो व त्यातून स्राव झिरपत राहतो. यामुळे गुदद्वार नेहमी ओलसर राहते व तेथे खाज सुटते. ट्रॅकमध्ये स्राव जास्त प्रमाणात जमा झाल्यास गुदद्वारावर सूज येते. पण, रक्तस्राव सहसा होत नाही.

मूळव्याध, गुदभ्रंश आणि भगंदर हे तिन्ही आजार गुदद्वाराशी संबंधित आहेत. त्यांचे निदान हे प्रत्यक्ष तपासणी करूनच होऊ शकते. म्हणूनच संकोच न ठेवता डॉक्टरला गुदद्वाराची तपासणी करू द्यावी. याशिवाय प्रोक्टोस्कोपीने आंतर मूळव्याधीचे निदान केले जाते. आजार जुना असल्यास ‘कोलोनोस्कोपी’ किंवा ‘सिगमॉयडोस्कोपी’चा सल्ला दिला जातो. शौचामध्ये होणारा रक्तस्राव हा आतड्याच्या कॅन्सरमुळेदेखील होऊ शकतो. म्हणून शौचात रक्त पडत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.

चाचण्या

आजार नवीन असल्यास सहसा चाचण्यांची गरज पडत नाही. शौचाची तपासणी केल्यास त्यात रक्त आढळते. काही वेळा अमांश (अमिबियासीस) किंवा कृमीचेदेखील निदान होते, असे आढळल्यास त्यावरील उपाय करावे. बर्‍याच वेळा रक्तातील हिमोग्लोबिन कमी झालेले आढळते. रक्तस्राव बंद झाल्यावर हा दोष नाहीसा होतो. ‘कोलोनोस्कोपी’ व ‘सिगमॉराडोस्कोपी’ फक्त मर्यादित रुग्णांमध्ये करण्यात येते.

वैद्यकीय उपचार आणि पथ्य

आहारात मसालेदार, तिखट, तेलकट व मांसाहारी पदार्थांचे सेवन टाळावे. जेवणाच्या वेळा नियमित असाव्या. आहारात पालेभाज्या, फळे, ताक, दही यांचा समावेश करावा. पाणी जास्त प्रमाणात प्यावे. रात्रीचे जागरण टाळावे.

गणेश क्रिया : मधल्या बोटास खोबरेल तेल लावून ते गुदद्वारावर व थोडेसे आतल्या बाजूस लावावे. शौचाला जाण्याआधी याचा प्रयोग केल्यास बद्धकोष्ठाचे प्रमाण कमी होते. हवाबाण हरडे, कायम चूर्ण यासारखे रेचक रात्री झोपताना घ्यावे. लिक्वीड क्रिमॅफिन किंवा डलकोलॅक्स गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी.

गुदद्वाराशी आग होत असल्यास प्रोक्टोसिडल किंवा अ‍ॅनोवेट हा मलम लावावा.

गुदद्वाराच्या येथे जास्त दुखत असल्यास वॉवेरॉनची गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी.

बर्‍याच रुग्णांना पथ्य व वैद्यकीय उपचार याने आराम पडतो. रक्तस्राव चालू राहिल्यास तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील चाचण्या व उपचार करावे.

शस्त्रक्रिया

पहिल्या व दुसर्‍या डिग्रीच्या मूळव्याधीसाठी शस्त्रक्रियेची सहसा गरज लागत नाही. तिसर्‍या व चौथ्या डिग्रीसाठी मात्र शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते. शस्त्रक्रियेच्या पद्धतीत आता अनेक सुधारणा झाल्या आहेत. पूर्वी ‘हिमरॉयडेक्टोमी’ ही शस्त्रक्रिया केली जायची. यामध्ये सूज आलेली रक्तवाहिनी कापून तेथे टाके घातले जायचे. या पद्धतीमुळे रक्तस्राव जास्त होत असे व जखम भरून येण्यास विलंब लागत असे. बॅन्डींग, स्टेपालिंग, लेझर या नव्या पद्धतीच्या शस्त्रक्रिया सध्या उपलब्ध आहेत. या बाबतीत तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सिट्झ बाथ : मोठ्या घमेल्यात कोमट पाणी घ्यावे व त्यामध्ये बसावे. त्यामुळे गुदद्वारास सौम्य शेक मिळून जखम भरण्यास मदत होते.

मूळव्याधीवरील इतर उपचार शस्त्रक्रियेच्या भीतीने रुग्ण इतर पॅथीकडे वळतात.

मूळव्याध आणि होमियोपॅथी : नक्स वॉमिका, सल्फर, एसक्यूलस, हमामेलिस ही औषधे वापरली जातात.

गुदभ्रंश (फिशर इन एनो) मध्ये ग्रॅफाईट, राटनाहिया व हमामेलिस ही औषधे वापरली जातात.

भगंदर (फिस्टूला) मध्ये मर्कसॉल व हिपारसल्फ ही औषधे वापरली जातात.

ही औषधे तज्ज्ञ होमियोपॅथी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी. याशिवाय सखोल होमियोपॅथी हिस्ट्री घेऊन कॉनस्टिट्यूशनल रेमेडी शोधून काढावी. यामुळे आजार पुन्हा होण्याची शक्यता कमी होते.

मुळव्याध आणि आयुर्वेदिक औषधे

बद्धकोष्टासाठी रेग्युलॅक्स, सेनावॅक या गोळ्यांचा उपयोग केला जातो. मूळव्याधीसाठी पायलेक्स गोळ्या व पायलेक्स मलम यांचा उपयोग केला जातो. याशिवाय आयुर्वेदिक पद्धतीने ऑपरेशनदेखील केले जाते.

क्षारसूत्र चिकित्सा

भगंदर (फिस्टुला) साठी या उपचार पद्धतीचा वापर केला जातो. औषधी द्रव्यामध्ये बुडवलेला धागा फिस्टुलामध्ये टाकला जातो व त्याचे दुसरे टोक वरच्या भागातून बाहेर काढले जाते. या धाग्याची गाठ क्रमाक्रमाने आवळली जाते. धाग्यातील औषधी द्रव्यामुळे फिस्टुलाची जखम भरण्यास मदत होते. या पद्धतीचा वापर डॉ. अरुण समसी केईएम हॉस्पिटलमधील सर्जरी विभागात करायचे. ही पद्धत अत्यंत प्रभावी आहे. गेली चार दशके केईएम रुग्णालयात आयुर्वेद संशोधन विभाग कार्यरत आहे. सर्व प्रकारच्या पॅथीजचा एकत्रित अभ्यास (इंटिग्रेटेट मेडिसीन) ही काळाची गरज आहे.

मूळव्याध आणि बोगस डॉक्टर्स

होमियोपॅथी, आयुर्वेदिक उपाय आपण समजू शकतो. तज्ज्ञ डॉक्टरांनी ते अवश्य करावे. रुग्णाला आराम पडावा हेच महत्त्वाचे आहे. बर्‍याच वेळा कुठलीही डिग्री नसलेले झोलाछाप डॉक्टर्सही मूळव्याधीचा इलाज करताना दिसतात. त्यांच्याकडे कुठलीही डिग्री नसते, कुणाच्या हाताखाली काम करून ते ‘मूळव्याध स्पेशॉलिस्ट’ बनतात. त्यांच्याकडे प्रचंड गर्दी असते. रुग्णदेखील हे अघोरी उपाय करण्यास तयार होतात व त्रास झाल्यास सर्जनकडे जातात. असल्या प्रकारास आळा घातला गेला पाहिजे. कुठलीही नोंदणी नसताना ते समाजात डॉक्टर म्हणून मिरवतात. हे समाजासाठी घातक आहे. यास जबाबदार आपले भ्रष्ट प्रशासन आहे. आपल्या महानगरपालिकेच्या कार्यालयात अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेदिक, होमियोपॅथी आणि बोगस डॉक्टर यांची नोंदणीच नाही. बोगस डॉक्टरविषयी कुणी तक्रार केली, तर पालिका अधिकारी व पोलीस हफ्ते बांधून घेतात व बोगस डॉक्टरला संरक्षण देतात.

प्रतिबंधात्मक उपाय

आदर्श जीवन पद्धती हा मुख्य प्रतिबंधात्मक उपाय आहे. सकाळी लवकर उठणे ध्यान धारणा, योग, ब्रह्मविद्या, विपश्यना, उपासना यापैकी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे. त्याचा नियमित अभ्यास करावा. चालणे, व्यायाम याचा देखील सराव ठेवावा. अति खाणे, धुम्रपान, मद्यपान, मसालेदार जेवण टाळावे. झोप व्यवस्थित घ्यावी. कारण, नसताना जागरण टाळावे. भक्तीमार्गदेखील आपल्या जीवन पद्धतीत अवलंबावा.

अवघड जागेचे दुखणे असल्यामुळे रुग्ण डॉक्टरला सांगण्यास संकोच करतात. ऑपरेशनच्या भीतीने बोगस डॉक्टरांच्या सापळ्यात अडकतात.

माझा भारत देश बद्धकोष्ट व मूळव्याधीमुक्त होवो ही सदिच्छा!

डॉ. मिलिंद शेजवळ
९८९२९३२८०३
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121