दिल्लीच्या प्रगती मैदानावर नुकतीच सातव्या ’इंडिया मोबाईल काँग्रेस’ची सांगता झाली. आज भारत इलेक्ट्रॉनिक उत्पादनात जागतिक शक्ती म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे दिल्लीत पार पडलेल्या ‘मोबाईल काँग्रेस’मध्ये भारतातील स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी आणि उत्पादकांसाठी काय नवीन घडले, याचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरावे.
२०१४ च्या आधी भारतीय बाजारपेठेमध्ये चीनमध्ये उत्पादित झालेल्या स्मार्टफोन्सचा अगदी सुळसुळाट होता. यामध्ये चिनी कंपन्यांचे स्मार्टफोन तर होतेच, पण त्यासोबत जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘अॅपल’ आणि ‘सॅमसंग’ सारख्या कंपन्यासुद्धा चीनमध्ये आपले स्मार्टफोन्सचे उत्पादन करत. पण, २०१४ नंतर केंद्र सरकारने आणलेल्या ‘मेक इन इंडिया’ योजनेमुळे आणि देशात स्मार्टफोन्सचे उत्पादन वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) मुळे भारत आज स्मार्टफोन उत्पादनात ‘आत्मनिर्भर’च बनला नाही, तर आज ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन जगभरात खरेदी केले जात आहेत.
ग्लोबल रिसर्च फर्म ‘काऊंटरपॉईंट’च्या एका अहवालानुसार, २०१४ ते २०२२ या काळात भारतात दोन अब्ज स्मार्टफोन्सचे उत्पादन झाले. या काळात भारतीय स्मार्टफोन उत्पादन वाढीचा वेग हा २३ टक्के इतका राहिलेला आहे. भारतात झालेल्या या स्मार्टफोन उत्पादन क्रांतीने जगाला आश्चर्यचकित केले आहे. देशातील वाढता मध्यमवर्ग, डिजिटल साक्षरता आणि केंद्र सरकारने डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे भारतात स्मार्टफोन्सची मागणी वाढत आहे.
स्मार्टफोनची ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारतातील स्मार्टफोन्स उत्पादक पूर्णपणे सक्षम आहेत. त्याचबरोबर परदेशी स्मार्टफोन्स उत्पादक कंपन्या भारत सरकारच्या ‘फेज्ड मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्राम’ (पीएमपी), ‘मेक इन इंडिया’, ‘प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह’ (पीएलआय), आणि ‘आत्मनिर्भर भारत’ यासह अनेक योजनांचा लाभ घेऊन भारतात आपली उत्पादन क्षमता वाढवत आहेत.
भारत सरकारच्या प्रयत्नांबरोबरच अमेरिका-चीन व्यापारयुद्धाने आणि कोरोनाच्या महामारीनेसुद्धा भारताला स्मार्टफोन उत्पादनात आघाडीवर नेण्याचे काम केले आहे. अमेरिका-चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापारयुद्धामुळे अमेरिकी कंपन्या आपली उत्पादन क्षमता चीनच्या बाहेर भारतासारख्या उद्योगस्नेही देशांमध्ये हलवत आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या काळात चीनवर अवलंबून राहणे जागतिक पुरवठा साखळीसाठी किती धोकादायक आहे, याची जाणीव सर्वांनाच झाली. यामुळेच चीन अधिक एक हे नवीन धोरण उदयास आले. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे या जागतिक परिस्थितीचा लाभ भारताने अचूकपणे घेतला.
केंद्र सरकारच्या ‘पीएलआय’ योजनेचा लाभ घेऊन ‘अॅपल’सारख्या दिग्गज स्मार्टफोन निर्माता कंपनीने भारतात आपले उत्पादन सुरू केले आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात ‘अॅपल’ने भारतात ७.५ अब्ज डॉलर्स किमतीच्या ‘आयफोन’चे उत्पादन केले आहे. यातील सहा अब्ज डॉलर्सच्या ‘आयफोन’ची निर्यात करण्यात आली. जगभरात आता ‘मेड इन इंडिया’ आयफोन खरेदी केले जात आहेत. भारतात उत्पादन सुरु केल्यापासून देशात ‘अॅपल’च्या महसूलात ५० टक्क्यांनी वाढ झाली. भारतात २०२२-२३ या आर्थिक वर्षात सहा अब्ज डॉलर्सच्या आयफोनची विक्री केली. ‘अॅपल’चे भारतातील हे यश इतर स्मार्टफोन कंपन्यांना खुणावत आहे. यामुळेच सातव्या ’इंडिया मोबाईल काँग्रेस’मध्ये जगभरातील स्मार्टफोन कंपन्यांनी भारतात उत्पादन सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यातील मुख्य आकर्षण ठरले ते, गुगलच्या पिक्सल फोनचे.
‘अॅपल’च्या ‘आयफोन’प्रमाणेच गुगलचे पिक्सल फोनसुद्धा स्मार्टफोन बाजारात लोकप्रिय आहेत. या दोन्ही कंपन्या एकमेकांच्या प्रतिस्पर्धी आहेत. ‘अॅपल’चे यश पाहून गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारतात पिक्सल फोनचे उत्पादन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भारतात स्मार्टफोन उत्पादनचा एक नवा अध्याय सुरू होईल, यात शंका नाही. स्मार्टफोन उत्पादनाबरोबरच केंद्र सरकार स्मार्टफोन निर्मितीसाठी लागणार्या इलेक्ट्रॉनिक वस्तूचेसुद्धा उत्पादनसुद्धा देशातच करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे भारतात स्मार्टफोन उत्पादनाची एक पुरवठा साखळी तयार होईल.
‘सॅमसंग’ने भारतात स्मार्टफोनसाठी आवश्यक असलेल्या डिस्प्ले बनवण्याचा कारखाना उभारला आहे. त्याबरोबरच केंद्र सरकारने भारताला सेमीकंडक्टरच्या उत्पादनात ‘आत्मनिर्भर’ बनवण्यासाठी ‘पीएलआय’ योजना आणली आहे. या योजनेमुळे जगातील दिग्गज सेमीकंडक्टर उत्पादक कंपन्या आपले उत्पादन भारतात सुरू करण्यासाठी गुंतवणुकीची संधी शोधत आहेत.
मागच्या एका दशकात ज्याप्रकारे भारताने स्मार्टफोन उत्पादनात आघाडी घेतली आहे, याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेलाही होत आहे. आकडेवारीनुसार, भारतात सध्या मोबाईल उत्पादनात तीन लाख कर्मचारी काम करत आहेत. भविष्यात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारताने एका दशकात मोबाईल उत्पादनात मोठा पल्ला गाठला आहे, ही बाब कौतुकास्पद आहेच. पण भारताचे पुढचे लक्ष्य हे, स्मार्टफोन उत्पादनात चीनला मागे टाकण्याचे असेल. भारत हे लक्ष्य लवकरच गाठेल यात शंका नाही.
श्रेयश खरात