संसदेतील वक्तव्यांबाबत न्यायालयीन कारवाई करता येत नाही, या सवलतीचा काही खासदार गैरफायदा घेताना दिसतात. प्रथमच निवडून आलेल्या प्रणिती शिंदे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर हा सरकारचा तमाशा’ होता, असे विधान लोकसभेत केले. हे विधान त्यांनी आपल्या पुढील निवडणूक प्रचारसभेत करून निवडून येऊन दाखवावे. खेळाडूला बाद करता येत नसेल, तर त्याला जायबंदी करणारी गोलंदाजी करण्याचे धोरण इंग्लंडने अवलंबिले होते. त्याचाच हा राजकीय अवतार!
सार्वजनिक ठिकाणी काय बोलावे आणि कसे वागावे, याचा पोच अनेक लोकांना नसतो. त्यात प्रामुख्याने काही राजकीय नेत्यांचा समावेश होतो. त्यातून एखादा नेता निवडणुकीत निवडून आला, तर आपण सर्वज्ञ झाल्याची त्याची समजूत होते. त्यामुळे एखाद्या विषयाचे आपल्याला ज्ञान आहे किंवा नाही, याची पर्वा न करता असा नेता बेलगाम बाणबाजी करताना दिसतो.
लोकसभा किंवा राज्यसभा या सदनांमध्ये केलेल्या वक्तव्यांवर न्यायालयात दाद मागता येत नाही, असा कायदा आहे. जनतेचे प्रश्न मांडताना आणि सरकारवर टीका करताना लोकप्रतिनिधींच्या डोयावर न्यायालयीन कारवाईची टांगती तलवार असू नये, या उद्देशाने ही तरतूद करण्यात आली आहे. पण, गेल्या काही वर्षांपासून काही लोकप्रतिनिधींकडून या सवलतीचा गैरफायदा घेतला जात आहे, असे दिसून येते. ठोस मुद्द्यांअभावी सरकारला कोंडीत पकडता येत नसल्याने सदनात टीकेच्या नावाखाली प्रच्छन्न निंदा आणि बिनबुडाचे आरोप करून सरकारच्या निर्णयांबद्दल संभ्रम निर्माण करण्याचे धोरण काँग्रेससारख्या पक्षाच्या नेत्यांनी अवलंबिल्याचे दिसते. ही त्यांची राजकीय ‘बॉडीलाईन’ गोलंदाजी झाली. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज हॅरॉल्ड लारवूड याच्या ‘बॉडीलाईन बॉलिंग’चाच हा राजकीय अवतार आहे. प्रतिस्पर्ध्याला खेळता येऊ नये, यासाठी त्याच्या अंगावर जाईल, अशी गोलंदाजी करायची आणि खेळाडूला जखमी करण्याचा प्रयत्न करायचा, असे कुटिल धोरण इंग्लंडचा कप्तान डग्लस जार्डीन याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आखले होते. त्या गोलंदाजीला ‘बॉडीलाईन’ असे संबोधले गेले. सध्या विरोधकांकडून सरकारी निर्णयांचा विरोध करण्यासाठी काहीसे असेच धोरण अवलंबिले जात आहे.
लोकसभा किंवा राज्यसभेत काँग्रेस नेत्यांनी केलेली वक्तव्ये पाहिल्यास त्यात तथ्य शून्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचा आकस आणि द्वेष अधिक असल्याचे दिसते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तर आपल्या भाषणातूनच नव्हे, तर लोकसभेतील आपल्या वर्तनानेही आपण नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारला किती तुच्छ लेखतो, ते नेहमीच सूचित केले आहे. लोकसभेत ते पहिल्याच बाकावर बसतात. त्यांच्या शेजारची जागा मोकळीच असते. पण, ते नेहमी एक हात बाकाच्या पाठीवर पसरून मान मागे टाकून कामकाज पाहात असतात. त्यांच्या या पोझमुळे ते लोकसभेत आहेत की, घरात टीव्ही पाहात आहेत, अशी शंका येते. लोकसभेसारख्या सर्वोच्च मंचावर कसे वागावे, याची त्यांना जाणीव नसेल असे नव्हे; पण ते या गोष्टी हेतुपुरस्सर करीत असावेत, असेच वाटते.
संसदेतील भाषणस्वातंत्र्याचा गैरफायदा घेत त्यांनी आजवर अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. लोकसभेत त्यांनी हिंदू देवतांची चित्रे झळकावून देवतांच्या शस्त्रांचा संबंध हिंदू हे हिंसक असण्याशी लावला होता. त्यांना वाटेल, तेव्हा ते कधीही मध्येच उठून उभे राहतात आणि बोलण्याचा आग्रह धरतात. ही गोष्ट नियमानुसार नसल्याने त्यांना बोलण्याची परवानगी नाकारली जाते. मग आपल्याला संसदेत बोलू दिले जात नाही, असा उफराटा प्रचार करण्यास ते मोकळे होतात.
आता लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेत सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी या कारवाईचे वर्णन ‘सरकारचा तमाशा’ असे करून सर्वांना धक्का दिला. प्रणिती शिंदे प्रथमच लोकसभेवर निवडून आल्या असून, त्यांचे लोकसभेतील हे पहिलेच भाषण होते. लोकसभेचा आणि राजकारणाचा इतका अल्प अनुभव असतानाही पाकिस्तानवरील लष्करी कारवाईला ‘सरकारी तमाशा’ म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली, ही गोष्ट त्यांच्याबद्दल भ्रमनिरास करणारी ठरेल. प्रणिती शिंदे यांना लष्करी कारवाईची, सामरिक धोरणाची आणि राजकारणाची काहीही समज नाही, हेच त्यांच्या भाषणातून दिसून आले.
‘ऑपरेशन सिंदूर’ ही कारवाई जगात आता लष्करीदृष्ट्या एक मैलाचा दगड ठरली आहे. जगभरातील लष्करीतज्ज्ञांनी तिची वाखाणणी केली. असा या कारवाईचा उल्लेख ‘तमाशा’ असा करून त्यांनी या कारवाईला बदनाम केले नाही; उलट त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची पातळी काय आहे, तेच दाखवून दिले. राहुल गांधी यांच्याप्रमाणेच प्रणिती शिंदे यांनाही गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही, हेच यातून दिसून आले. मात्र, अशा हेतूतः करण्यात येणार्या टीकेवर लोकसभा अध्यक्षांनी कारवाई करण्याची गरज आहे. लोकसभेत सदस्यांनी काय आणि कसे बोलावे, तसेच कसे वर्तन करावे, याचेही नियम लोकसभा अध्यक्षांनी लागू करण्याची गरज आहे.
प्रणिती शिंदे यांचे वडील सुशीलकुमार शिंदे हेही देशाचे गृहमंत्री होते. पण, त्या पदावर असताना आपल्याला श्रीनगरमध्ये जाण्याची भीती वाटत असे, असे त्यांनी स्वतःच एका मुलाखतीत कबूल केले होते. यावरून काँग्रेसच्या राजवटीत काश्मीर खोर्यातील दहशतवाद किती पराकोटीला पोहोचला होता, त्याची कल्पना येईल. मुंबईवर दि. २६ नोव्हेंबर रोजी हल्ला झाल्यानंतर याच शिंदे यांनी देशात ‘भगवा दहशतवाद’ असल्याचा दावा करीत हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. कसाबचा हल्ला हे रा. स्व. संघाचेच कारस्थान होते, असे त्यांनी आणि काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी भासविण्याचा प्रयत्न केला होता. आता त्यांच्या मुलीने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारतीय हवाई दल आणि लष्कराने पाकिस्तानविरोधात केलेल्या लष्करी कारवाईची संभावना ‘तमाशा’ अशी केली आहे. शिंदे यांनी गांधी परिवाराच्या लाचारीपोटी हिंदू समाजाला बदनाम करण्यासही मागेपुढे पाहिले नाही. आता त्यांची मुलगी त्याच कारणास्तव वडिलांचेच धोरण पुढे चालविताना दिसते. ‘खाण तशी माती’ ही मराठीतील एक म्हण त्यांना चपखल लागू पडते. माणसाला वेळेच्या आधी आणि नशिबात असेल, त्यापेक्षा अधिक काही मिळत नाही, असे म्हणतात. पण, काहीजणांना त्यांच्या लायकीपेक्षा अधिक गोष्टी मिळतात आणि त्यांचा स्वतःबद्दल गैरसमज होतो. प्रणिती शिंदे या अशा निवडक नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी हे विधान सोलापूरमधील आपल्या पुढील निवडणुकीच्या प्रचारसभेत करावे आणि निवडून येण्याचे आव्हान स्वीकारावे!
राहुल बोरगांवकर