मुंबई : गेल्या बऱ्याच दिवसांपासून कुत्र्याने लोकांचा चावा घेतल्याच्या घटना कानावर पडत आहेत. तसेच कुत्रा चावल्यानंतर उपचाराकरता अधिक वेळ वाया दवडू नये कारण यामुळे रेबीज होण्याचा धोका सर्वाधिक असतो. या पार्श्वभूमीवर रेबिजपासून मुक्तता मिळावी यासाठी शासनाद्वारे ही अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. तरी डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी काही घरगुती प्रथमोपचार करणेसुद्धा गरजेचे असते.
सर्वप्रथम कुत्रा ज्या जागी चावला आहे ती जागा पाण्याने किमान दहा मिनिटे नीट स्वच्छ धुवून साफ करावी. यामुळे विषाणूचा प्रसार रोखता येतो. नंतर कापडाच्या साहाय्याने नीट ती जागा पुसून घ्यावी आणि त्या भागावर अँटीसेप्टिक क्रीम लावावी. जखम गंभीर असल्यास तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे आणि अँटी रेबीज इंजेक्शन घ्यावे. तसेच कोणत्याही प्रकारचा संसर्ग, लालसरपणा, सूज, वेदना किंवा ताप असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कुत्र्याचा चावा बेतला जीवावर !
गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांनी रविवारी संध्याकाळी अहमदाबादमधील एका खाजगी रुग्णालयात वयाच्या ४९ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. पराग देसाई १५ ऑक्टोबर रोजी राहत्या घराजवळ मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना त्यांच्यावर कुत्र्याने हल्ला केला. त्यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना ब्रेन हॅमरेज झाला असून उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.