दिग्विजय सिंह यांचा काँग्रेसला राम राम? राजीनामा पत्र व्हायरल
16-Oct-2023
Total Views | 212
मुंबई : यावर्षी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुक आयोगाकडून या निवडणूकांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, नुकतीच काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. परंतु, ही यादी पुढे आल्यानंतर थोड्याच वेळात एका काँग्रेस नेत्याचा राजीनामा चांगलाच व्हायरल झाला आहे. माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांचा हा राजीनामा आहे. त्यांच्या राजीनाम्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे पत्र ट्विटरवर व्हायरल झाले आहे. या पत्रात लिहिले आहे की, “माझ्या पाच दशकांच्या राजकीय प्रवासात मला काँग्रेसमध्ये असताना अनेक अनुभव आले. काँग्रेस पक्षात असताना मी एका सामान्य कार्यकर्त्यापासून राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास केला. पक्षाने मला राष्ट्रीय सरचिटणीस ते राज्यसभा सदस्यासारख्या महत्त्वाच्या पदावर नेण्याचे काम केले. यासाठी मी आयुष्यभर कृतज्ञ राहीन. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून सर्वोच्च नेतृत्वाची उदासीनता पाहून मी दुखावलो आहे."
तसेच "मध्य प्रदेश निवडणुकीसाठी उमेदवार निवडताना मी दिलेल्या नावांचा विचार करण्यात आलेला नाही. निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य न दिल्याने माझा स्वाभिमान दुखावला गेला आहे. मी आता अशा टप्प्यावर पोहोचलो आहे जिथे मला वाटते की, मी यापुढे अशा अन्यायकारक वातावरणात राहू शकत नाही. त्यामुळे जड अंत:करणाने मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. स्वीकार करा," अशा मजकूराचे हे पत्र आहे.
हे पत्र व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच त्यांनी हे पत्र बनावट असल्याचा दावा करत काँग्रेसचा राजीनामा दिल्याची चर्चा खोटी असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी याबाबत भाजपला जबाबदार धरत भाजप खोटे बोलण्यात माहीर असल्याचे म्हटले आहे. मी १९७१ मध्ये काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले असून मी काँग्रेसमध्ये पदासाठी नाही, तर विचारसरणीने प्रभावित होऊन प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसमध्येच राहीन, असेही ते म्हणाले.