विश्वाची ओळख हा खरं तर अत्यंत अवघड विषय. याचा अनेक स्तरांवर परिचय करून देता येतो. मात्र, हौशी खगोल अभ्यासकाला लागते, त्याची प्राथमिक ओळख! खगोलशास्त्राविषयी बहुतेक सर्वांनाच कुतूहल असते. अभ्यास करायची इच्छा असते. त्यांच्यासाठी समजायला सोपी, वाचनीय आणि विशेषतः मराठी पुस्तकांची गरज आहे. याच विषयावर ‘राजहंस प्रकाशन’तर्फे डॉ. गिरीश पिंपळे यांनी लिहिलेले ‘ओळख आपल्या विश्वाची’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.
हा विषय जितका खोलवर अभ्यास करू, तितका समजायला कठीण होत जातो. शिवाय तो इतका मोठा आहे की, त्याची प्राथमिक, संक्षिप्त आणि तरीही उत्सुकता वाढवणारी माहिती वाचकांना उपलब्ध करून देणे, हे एक आव्हानच आहे. डॉ. पिंपळे यांनी ते सहजगत्या पेलले आहे. त्यांचा या विषयाच्या प्रसारामधील ३० वर्षांचा अनुभव पुस्तक वाचताना नक्कीच जाणवतो.
यात एकून नऊ प्रकरणे आहेत. पहिल्या प्रकरणात विश्व जाणून घेण्यासाठी कुतूहल निर्माण केले आहे. विश्वाचा परिचय करून घेताना नेमके काय अभ्यासले पाहिजे, याचा आढावा या प्रकरणात आहे. दुसर्या प्रकरणात सूर्यमालेची ओळख करून दिली आहे. यात सूर्य, पृथ्वीसह आठ ग्रह, उपग्रह, बटू ग्रह, लघुग्रह, उल्का, अशनी आणि धूमकेतू यांची सविस्तर माहिती दिली आहे. यात मोठी आकडेवारी असली तरी ती समजण्यासाठी रूपके अगदी उत्तमरितीने मांडली आहेत. तिसर्या प्रकरणात आकाशगंगेची रचना आणि तिचे घटक याविषयी तिची भव्यता सांगणारी ओळख करून दिली आहे. चौथ्या प्रकरणात आधुनिक विश्वरूपदर्शन इतके सुंदर केलेले आहे की, त्याचे विस्तीर्ण रूप खरोखर डोळ्यासमोर येते.
या प्रकरणात पृथ्वी ते विश्व हे रूप मांडताना दीर्घिकांचे समूह, कृष्णद्रव्य याविषयी माहिती तर आहेच; शिवाय महास्फोटाचा सिद्धांत, बहुविश्व संकल्पना मांडल्या आहेत. शिकण्यासाठी हे विषय क्लिष्ट आहेत. परंतु, लेखकाने ते अतिशय सोप्या भाषेत मांडले आहेत. खगोलशास्त्राच्या कोणत्याही कार्यक्रमात सर्वात अधिक प्रश्न ज्या विषयावर असतात, तो विषय पाचव्या प्रकरणात मांडला आहे आणि हे प्रकरण अतिशय वेधक झाले आहे. यात तारे आणि तार्यांचे जीवनचक्र याची सविस्तर माहिती आहे. तार्याचा जन्म आणि मृत्यू हा विषय सामान्य विद्यार्थी ते शास्त्रज्ञ यांच्यासाठी तितकाच जिज्ञासापूर्ण आहे. यात कृष्णविवरे, श्वेत बटू, न्यूट्रॉन, अतिनवतारे, चंद्रशेखर मर्यादा, श्वेतविवरे आणि कृमिविवारे यांवर स्वतंत्र ग्रंथ लिहून होऊ शकतात. हे आजही पूर्णपणे न उलगडलेले कोडी आहेत. याविषयी लिहिणे सोपे नाही, यावर लेखकाने अत्यंत सहजगत्या लिहिलेले असल्याने समजण्यास सोपे जाईल. सहाव्या प्रकरणात दीर्घिका, क्वसार आणि तारकागुच्छ यांविषयी विस्तृत परिचय करून दिला आहे.
त्यांचे महाकाय स्वरूप तर समजतेच. शिवाय, या अभ्यासाने पुढे काय साध्य करता येईल, हेही लक्षात येते. सातवे प्रकरण हे खगोलप्रेमींचे आकर्षण म्हणजे आकाशदर्शनावर आहे. सैद्धांतिक अभ्यासाबरोबर प्रात्यक्षिक अभ्यास तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे या प्रकरणाचे महत्त्व आगळेवेगळे आहे. यात प्रत्यक्ष आकाश पाहताना लक्षात घेण्याच्या गोष्टी म्हणजे तारकासमूह, राशी, नक्षत्रे आणि प्रकाशवर्षे यांसारख्या संकल्पना मांडल्या आहेत. साध्या डोळ्यांनी आणि दुर्बिणीने दिसणारे आकाश यातील फरक मांडताना त्यासाठी महत्त्वाच्या सूचनादेखील दिल्या आहेत. आठवे प्रकरण म्हणजे, खगोलशास्त्राचे दैनंदिन जीवनातील स्थान विषयक आहे. हा विषय जरासा अवघड असला तरी त्याचा आपल्या रोजच्या जीवनाशी जवळचा संबंध आहे. अनेक अंधश्रद्धांचे निर्मूलन या अभ्यासाने होऊ शकते. याचे अनेक दाखले या प्रकरणात आहेत.
काही माहिती देताना आकृत्या दिल्या असत्या तर माहिती अधिक चांगल्यारितीने समजली असती. जसे ध्रुवतार्याचे स्थान ओळखणे, केप्लरचे नियम, नक्षत्र रचना. योग्य विषयक्रम, मराठी वैज्ञानिक नावे, रंगीत छायाचित्रे, ओघवती भाषा, समर्पक उदाहरणे, परिपूर्ण साधर्म्य असलेली रूपके आणि चपखल वाक्प्रचार यांनी संपूर्ण पुस्तकात रंजकता आणली आहे. विषय सोपा करीत असताना कोठेही वैज्ञानिक तपशील, आकडेवारी, तांत्रिक ज्ञान याच्याशी तडजोड झालेली नाही आणि हे लेखकाचे कौशल्य सर्व पुस्तकांत प्रतिबिंबित होते.
पुस्तकाचे नाव : ओळख आपल्या विश्वाची
लेखक : डॉ. गिरीश पिंपळे
प्रकाशन : राजहंस प्रकाशन
सुजाता बाबर