मेक्सिकन सिनेटच्या अध्यक्ष अॅना लिलिया रिवेरा यांनी पंतप्रधानांच्या हाताला बांधली राखी
14-Oct-2023
Total Views |
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील यशोभूमी येथे नवव्या जी२० संसदीय स्पीकर समिटचे (पी२०) उद्घाटन केले. 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्यासाठी संसद' या थीमसह भारताच्या जी२० अध्यक्षतेच्या व्यापक फ्रेमवर्क अंतर्गत भारतीय संसदेद्वारे शिखर परिषद आयोजित केली जात आहे.
यावेळी त्यांनी इस्त्रायल-हमास युद्धापासून तर अनेक मुद्दयांवर भाष्य केले. दरम्यान, या परिषदेमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मेक्सिकोच्या सिनेटच्या अध्यक्षा ॲना लिलिया रिवेरा पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधताना दिसत आहेत. राखी बांधून झाल्यावर पंतप्रधान मोदींनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वादही दिला आहे.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संघर्षाने भरलेले जग कोणाच्याही हिताचे नाही. विभाजित जग मानवतेसमोरील प्रमुख आव्हाने सोडवू शकत नाही. शांतता आणि बंधुभावाची एकत्र वाटचाल करण्याची हीच वेळ असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.
यावेळी त्यांनी निवडणूक प्रक्रियेच्या आधुनिकीकरणावरही भर दिला. मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही तासांतच निवडणूक निकाल जाहीर झाल्यामुळे गेल्या २५ वर्षांपासून ईव्हीएमच्या वापरामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता आली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत एक अब्ज लोक सहभागी होणार असून त्यावेळी निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी पी२० प्रतिनिधींना त्यांनी आमंत्रित केले आहे.