इस्रायलवर करण्यात आलेला दहशतवादी हल्ला हा आजवरच्या इतिहासातील सर्वात भीषण असाच. कोणत्याही दहशतवादाचे समर्थन होऊच शकत नाही, असे असताना काँग्रेसने जाहीरपणे ‘हमास’ला पाठिंबा दिला. तसेच देशभरातील मुस्लीम संघटनादेखील आता काँग्रेसचे अनुकरण करीत ‘हमास’ला समर्थन देताना दिसतात. त्यामुळे इस्रायल-‘हमास’ संघर्षाने काँग्रेससह दहशतवादाला पाठिंबा देणार्या देशविरोधी मुस्लीम संघटनांचा चेहरा पुनश्च उघडा पडला आहे.
इस्रायलवर आजवरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण जगातून, हा हल्ला करणार्या ‘हमास’ या दहशतवादी संघटनेच्या विरोधात तीव्र शब्दांत भावना व्यक्त करण्यात आल्या. भारतानेही या क्रूर हल्ल्याचा निषेध केला; तसेच भारत इस्रायलच्या सोबत उभा असल्याचे सांगितले. देशातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून ओळखल्या जाणार्या काँग्रेसने मात्र भारताच्या भूमिकेला छेद देणारा ठराव पक्षाच्या बैठकीत संमत करीत पक्ष पॅलेस्टिनींसोबत असल्याचे म्हटले. या दहशतवादी हल्ल्यात जे शेकडो निरपराध बळी पडले, त्यांचा एका शब्दानेही उल्लेख काँग्रेसने केला नाही. काँग्रेसच्या भूमिकेशी सुसंगत अशा घटना म्हणूनच देशभरात घडताना दिसून येतात. केरळमधील धर्मांधांची भूमिका, ही कायमच देशविरोधीच राहिली आहे. याही वेळेला केरळमधील धर्मांधांनी अजिबात निराश केले नाही. आपल्या देशद्रोही भूमिकेला जागत त्यांनी ‘हमास’ला समर्थन दिले.
कट्टरपंथी इस्लामी संघटना ‘जमात-ए-इस्लामी हिंद’ने इस्रायलवर दहशतवादी हल्ला करणार्या, शेकडो निरपराध नागरिकांची हत्या करणार्या ‘हमास’ या दहशतवाद्यांना समर्थन देण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ‘पॅलेस्टाईन सॉलिडॅरिटी कन्व्हेन्शन’ या नावाने केरळमधील मुस्लीमबहुल मलप्पुरम येथे हा कार्यक्रम होणार आहे. याला भारतातील पॅलेस्टिनी राजदूत उपस्थित राहणार आहेत, ही धक्कादायक बाब.दहशतवादाचे समर्थन करणार्या एका कार्यक्रमाला दुसर्या देशाचा राजदूत कसा उपस्थित राहू शकतो, हे मान्य न होणारे. ज्यूंनी जमीन बळकावली आहे, त्याविरोधात हा कार्यक्रम असल्याचे सांगितले गेले. पॅलेस्टिनी राजदूत अबू अलहैजा यांना कार्यक्रमाचे निमंत्रणही देण्यात आले होते, ते त्यांनी स्वीकारले. पॅलेस्टिनी तसेच ‘हमास’ या दहशतवादी संघटनेला पाठिंबा देण्यासाठी तसेच ऐक्य दर्शवण्यासाठी, हा कार्यक्रम प्रामुख्याने आयोजित केला गेला. ही तीच ‘हमास’ दहशतवादी संघटना, जिने इस्रायलमध्ये केलेल्या नरसंहाराने १ हजार, २०० पेक्षा अधिक निष्पाप इस्रायली नागरिकांचा बळी घेतला. चिमुरड्या मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सार्यांचाच संहार केला गेला. एका चिमुरड्याची गोळ्यांनी अक्षरशः चाळणी केलेली आढळून आल्याने, जगभरात संतापाचे वातावरण आहे.
भारताने हल्ला झाल्यानंतर लगेचच इस्रायलला पाठिंबा दिला असून, भारत त्याच्यासोबत उभा असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील एक इस्लामी संघटन, याच दहशतवादी ‘हमास’च्या समर्थनार्थ कार्यक्रम घेते, हे निंदनीयच. ही तीच संघटना आहे, जिने कर्नाटकातील हिजाबबंदीविरोधात भूमिका घेतली होती. या संघटनेने घेतलेल्या धर्मांध भूमिकेमुळे कर्नाटकात अनेक ठिकाणी हिंसाचार उफाळला होता. या संघटनेला सौदी अरेबियातील विद्यापीठांकडून भारतात इस्लामचा प्रचार करण्यासाठी निधी मिळतो, हे नुकतेच उघडही झाले. याच ‘जमात-ए-इस्लामी’ने ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेला निधी पुरवल्याचा संशय आहे. ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ने पुलवामा दहशतवादी हल्ला घडवून आणल्यानंतर तिच्यावर भारतात बंदी घालण्यात आली आहे. याच संघटनेच्या ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन’ने १० तारखेला पॅलेस्टिनी तसेच ‘हमास’ला पाठिंबा जाहीर केला होता. ‘हमास स्क्वेअर’ नावाच्या मेळाव्याचे मलप्पूरम येथे आयोजन केले होते.
‘जमात-ए-इस्लामी’ने मुस्लिमांना विशेष प्रार्थनेत सहभागी होम्याचे आवाहनही केले आहे. ही प्रार्थना ‘हमास’बरोबरच पॅलेस्टिनींसाठी करण्यात येणार आहे.भारतातील बहुसंख्य इस्लामी समुदायाच्या प्रतिनिधींनी, संघटनांनी यापूर्वीच ‘हमास’ला पाठिंबा दिला आहे. अलीगढ मुस्लीम विद्यापीठात ‘हमास’ दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ मोर्चाही काढण्यात आला होता. ‘ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डा’ने पंतप्रधान मोदी यांनी इस्रायलची बाजू घेतल्याने पॅलेस्टिनींवर अत्याचार झाल्याचे म्हटले आहे. ‘हमास’ने केलेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी ‘ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डा’चे अध्यक्ष मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी इस्रायललाच जबाबदार धरले. एमआयएम या पक्षानेही ‘हमास’ने केलेल्या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे. मुस्लीम धर्मगुरूंनी विशेष प्रार्थनांचे आयोजन करून मुस्लिमांनी मिरवणूक तसेच निदर्शने काढू नयेत, यासाठी आवाहन केले. प्रमुख मौलांनी इमाम, प्रचारक तसेच मुस्लीम भाविकांनी युद्धकाळात कुनुत-ए-नजला नमाज अदा करावी, असे आवाहन केले आहे. मुस्लिमांची जेव्हा हत्या, छळ, लूट होते, तेव्हा कुनुत-ए-नजला अदा केली जाते.
‘हमास’च्या दहशतवाद्यांनी केलेला नरसंहार, हा अत्यंत क्रूर असाच. म्हणूनच त्याचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन होऊ शकत नाही. पॅलेस्टिनींनी ‘हमास’सारख्या दहशतवादी संघटनेला गाझा पट्टीचे प्रशासकीय अधिकार दिले, तेव्हाच त्यांनी मानवतेविरोधात बोलण्याचा नैतिक अधिकार गमावलेला आहे. आत्मघाती बॉम्बहल्ले करणे, इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागणे, इस्रायलमध्ये घुसून गोळीबार करणे अशी दहशतवादी कृत्ये करणार्या या संघटनेकडे गाझा पट्टीचे संपूर्ण नियंत्रण देण्यात आले, तेव्हाच हा लढा रक्तरंजित झाला. इस्रायलवर शनिवारी पहाटे झालेला हल्ला, हा आजवरचा सर्वात भीषण हल्ला असाच ठरला. नाझींनी केलेल्या ज्यूंच्या हत्याकांडाचे स्मरण यानिमित्ताने झाले, इतका तो क्रूर होता. म्हणूनच एलॉन मस्क यांच्या ‘एक्स’ या समाजमाध्यमांवरून ‘हमास’शी संबंधित खाती हटवण्यात आली आहेत.
काँग्रेसने मात्र याचा राजकीय लाभ घेण्यासाठी मुस्लिमांना भारतविरोधात भडकवण्याचा प्रयत्न चालवलेला दिसतो. काँग्रेसप्रमाणेच जगभरातील देशांचा मुखवटा आता गळून पडला असून, चेहरा उघड झाला आहे, जो अत्यंत भयावह आहे. मानवाधिकार, दहशतवाद यांवर भाष्य करणार्या देशांची, पक्षांची आता थेट विभाजन झाले आहे. इस्रायलच्या बाजूने बोलणारे, उभे राहणारे आणि दहशतवादाचे समर्थन करणारे असे दोन गट आहेत. भारत हा इस्रायलच्या बाजूने उभा आहे, तर देशातील सर्वात जुना पक्ष असा ज्याचा लौकिक आहे, तो काँग्रेस पक्ष दहशतवादाचे समर्थन निलाजरेपणाने करतो आहे. हीच काँग्रेसी परंपरा आहे आणि याच परंपरेच्या नेतृत्वाखालील विरोधकांची ‘इंडिया’ ही आघाडी ‘हमास’ या दहशतवादी संघटनेला पाठबळ देत आहे. म्हणूनच ‘यांचे काय करायचे’ असाच प्रश्न म्हणूनच उपस्थित होतो.