‘उडान’ची गगनभरारी

    25-Jan-2023   
Total Views |
 Air Transport Services Sector in India
‘उडान’ किंवा ‘उडे देश का आम नागरिक’ ही संकल्पना मोदी सरकारने अस्तित्वात आणली. तसेच मोदी सरकारच्या मागील आठ वर्षांच्या कार्यकाळात विमानतळांची संख्या, सेवा वाढविण्यावरही विशेष भर दिला गेला. त्यानिमित्ताने भारताच्या हवाई वाहतूक सेवा क्षेत्राचा संक्षिप्त इतिहास, सद्यस्थिती आणि भविष्य यांचा आढावा घेणारा हा लेख...

भारतात विमान प्रवासाची सेवा स्वातंत्र्याच्या आधीपासून सुरू झाली. १९३२ साली जेआरडी टाटांनी ‘टाटा एअरसेल’ नावाने कंपनी स्थापना केली. एप्रिल १९३२ साली ब्रिटिशांनी त्यांना हवाई मार्गाने टपाल वाहतूक करण्याची परवानगी दिली व त्याच वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये जेआरडी टाटांनी स्वतः टपालविमान चालवत कराचीहून अहमदाबाद मार्गे मुंबईला आणले होते. कंपनीची स्थापनाच दोन विमाने व एका वैमानिकावर करण्यात आली होती. दुसर्‍या महायुद्धानंतर ‘टाटा एअरलाईन्स’च नाव बदलून ‘एअर इंडिया’ करण्यात आले.


‘एअर इंडिया’ ही भारताची पहिली विमान कंपनी. पण, दुसर्‍या महायुद्धानंतर अनेक उद्योजकांनी आपल्या ‘एअरवेज’ (विमान कंपन्या) उघडण्यास सुरुवात केली. स्वातंत्र्याच्या तोंडावर भारतात हवाई कंपन्यांची स्पर्धा सुरु झाली.स्वातंत्र्यानंतर आठवडाभरात जेव्हा विजयालक्ष्मी पंडित रशियाच्या राजदुतपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी निघाल्या, तेव्हा जेआरडी टाटा यांनी हट्टाने आपले ‘एअर इंडिया’चे विमान त्यांच्या दिमतीला दिले. जेआरडी टाटांनी विजयालक्ष्मी यांच्या प्रवासाच्यानिमित्ताने दाखवून दिले की, ‘एअर इंडिया’ ही आंतरराष्ट्रीय सेवादेखील देऊ शकते.


सध्या टाटाला ‘एअर इंडिया’ ही सरकारकडून तोट्यात असलेली कंपनी ताब्यात मिळाल्यानंतर या पांढर्‍या हत्तीचे गाडे हाकण्यासाठी, ‘स्टेट बँक’ आणि इतर बँका टाटा समूहाला कर्जपुरवठा करीत आहेत. याशिवाय ‘टाटा समूहा’कडे दोन विमान कंपन्या आहेत. त्या म्हणजे- ‘विस्तारा’ व ‘एअर एशिया.’ २००७-२००८ मध्ये ’एअर इंडिया’ व ‘इंडियन एअरलाईन्स’ यांचे एकत्रकरणही करण्यात आले.

१९९१ नंतर क्रांतिकारी बदल
भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतरची काही वर्षे विमान प्रवास करणार्‍यांची संख्या फार कमी होती. १९९१ नंतर व विशेषत: मोदीजींचे सरकार आल्यानंतर विमान सेवा सामान्यांच्याही आवाक्यात यावी, यासाठी प्रयत्न केले गेले. ‘खाजाउ’ धोरणाचा एक भाग म्हणून भारत सरकारने (ओपन स्काय पॉलिसी) ‘मोकळे आकाश धोरण’ अमलात आणले. हे धोरण अमलात आल्यानंतर ‘एअर इंडिया’ला स्पर्धेला तोंड द्यावे लागले. पाच ते सहा खासगी प्रवासी विमान वाहतूक कंपन्या भारतात सुरू झाल्या.

‘मोकळे आकाश’ धोरणानंतर भारतातील मोदी उद्योग समूह व आंतरराष्ट्रीय पातळीवरची ‘लुफनान्झा’ या दोन कंपन्यांनी एकत्र येऊन, ‘मोदीलुफ्ट’ ही विमान कंपनी बंद पडली. पर्वेज दमानिया व जहांगिर दमानिया हे दोघे भाऊ प्रवर्तक असलेली ‘दमानिया एअरवेज’ ही कंपनी सुरू करण्यात आली होती. ‘एनईपीसीडी’ ही एक कंपनी, सहारा, किंग फिशर (विजय मल्ल्या यांची कंपनी) या सर्व कंपन्या एकापाठोपाठ एक बंद पडल्या व भारतात ‘मोकळे आकाश धोरण’ फलद्रूप झाले नाही. या कंपन्या बंद होण्याची कारणे म्हणजे, या कंपन्यांनी अवास्तव खर्च केले. प्रचंड खर्चाच्या तुलनेत उत्पन्नाची बाजू लंगडी पडत गेल्यामुळे, भारतातील ‘मोकळे आकाश धोरण’ फसले.

दरम्यानच्या काळात ‘इंडिगो’, ‘गोएअर’, ‘स्पाईसजेट’ व ‘एअरडेक्कन’ या कंपन्या अस्तित्वात आल्या. यापैकी ‘एअर डेक्कन’ पूर्णत: अयशस्वी ठरली. ‘इंडिगो’, ‘गोएअर’ व ‘स्पाईसजेट’ या व अन्या कंपन्यांनी विमान प्रवासाची संकल्पना बदलली. या अगोदर विमानात बसल्याबरोबर ‘फ्रेश’ होण्यासाठी प्रवाशांना कोलोनवॉटरमध्ये भिजविलेला टॉवेल देत, कानात घालायला कूपस देत. पेपरमिंट देत. पाण्याच्या बाटल्या देत. वेळेनुसार नाश्ता किंवा जेवण देत. या सर्व सुविधा या कंपन्यांनी बंद करून ‘लोकॉस्ट’ (कमी खर्चाची) विमानसेवा ही संकल्पना राबविली. ही संकल्पना बर्‍याच प्रमाणात यशस्वी झाली.

उडान योजना
‘उडान’ किंवा ‘उडे देश का आम नागरिक’ ही संकल्पना पंतप्रधान मोदींची! या धोरणाची सुरुवात नागरी उड्डाण मंत्रालयाने २०१६ मध्ये केली. महानगरांशी ‘टियर-२’ व ‘टियर-३’ शहरे, जिल्ह्याची ठिकाणे व भारतातील अन्य अंतर्गत भाग विमानसेवेला जोडला जावा, सामान्य नागरिकांना कमी खर्चात विमान प्रवास करता यावा, प्रादेशिक विभाग विमानाने जोडले जावेत व प्रादेशिक विमानतळ आधुनिक व्हावेत, ही ‘उडान’ धोरणाची वैशिष्ट्ये. या धोरणाची १०० टक्के परिपूर्ती होण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. ही धोरणे आकर्षक आहेत. पण, त्याच्या अंमलबजावणीचे प्रयत्न कासवगतीने होत आहेत. परिणामी, या सेवेबाबत यापुढे कोणतीही नवीन घोषणा न करता, ‘उडान’ पूर्णपणे यशस्वी करण्याचे प्रयत्न करावेत.


मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून, जागतिक क्रमवारीत तो नक्कीच वरच्या क्रमांकाचा ठरू शकतो. महाराष्ट्राचा विचार करता, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘चिपी’ विमानतळ सुरू झाले. गोवा येथे उत्तर गोव्यात अलीकडेच मोपा हे नवा विमानतळ सुरू झाले. अशी विमानतळे इतरही राज्यांत वेगाने विकसित करुन विमानतळाचा दर्जा सुधारणे हा देखील कार्यक्रम राबविला जावयास हवा.

‘उडान’ योजनेनुसार, जी काही विमाने उडत होती, त्यापैकी ४५ ते ६० टक्के विमाने कोरोनामुळे बंद पडली होती. कोरोनाचा विमान वाहतूक सेवेवर भयंकर परिणाम झाला. कोरोनाचे परिणाम मार्च २०२० पासून जाणवू लागले. पण, ‘उडान’ योजना या अगोदरपासूनच हवी तितकी कामगिरी करत नव्हती. ‘नागरी उड्डाण मंत्रालया’ने ऑगस्ट २०२० मध्ये नवे ७८ ‘उडान’ सेवेचे मार्ग जाहीर केले. पण, ‘एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया’ (एएआय)च्या आकडेवारीनुसार, ‘उडान’च्या ७६६ मार्गांपैकी फक्त एक तृतीयांश मार्गावर म्हणजे २८५ मार्गांवर ‘उडान’ योजनेतील किमाने उडत होती. ऑक्टोबर २०१६ मध्ये ‘उडान’ योजना जाहीर झाल्यानंतर पहिले विमान एप्रिल २०१७ मध्ये उडाले होते.


केंद्र सरकारने किमान कंपन्यांना त्यांची अर्धी आसने सवलतीच्या दरात विकावित, अशा सूचना दिल्या होत्या व त्याबद्दल या विमान कंपन्यांना ‘सबसिडी’ देण्याचे सरकारतर्फे घोषित करण्यात आले होते. ‘नागरी उड्डाण मंत्रालया’च्या आकडेवारीनुसार, दि. २९ सप्टेंबर, २०२० पर्यंत देशात ४५ विमानतळांवरून २८५ मार्गांवर उड्डाण विमानसेवा कार्यरत होत्या.

भारताचे सध्याचे नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करून स्वदेशी ‘डॉर्नियर’ विमानाची पहिली व्यावसायिक उड्डाण सेवा सुरू करण्याबाबतची माहिती दिली. लहान लहान प्रदेशांना जोडण्यासाठी ‘उडान’ ही कल्पना सध्याच्या केंद्र सरकारची. पण, पूर्वीही दि. २६ जानेवारी, १९८१ रोजी ‘वायूदूत’ या कंपनीची लहान लहान प्रदेशांना जोडण्यासाठी स्थापना करण्यात आली होती. सन १९८९ मध्ये ‘वायूदूत’ या ईशान्येतील राज्यांसह २३ ठिकाणांहून ‘ऑपरेशन’ सुरू करण्याची परवानगी मिळाली होती. नंतर ‘वायूदूत’ कंपनी ‘इंडियन एअर लाईन्स’मध्ये जाणीव करण्यात आली. या विमान सेवांचा कारभार आर्थिकदृष्ट्या परवडणारा ठरत नाही.

पूर्वी विमानाने प्रवास करणे ही खूप मोठी गोष्ट होती. परंतु, आता अनेकांचे विमानाने प्रवास करणे सामान्य झाले आहे. तरीही भारतासारख्या देशात अजूनही अशी अनेक कुटुंबे आहेत, ज्यांच्यासाठी विमानप्रवास हा अद्याप स्वप्नवत आहे. मोदींना अशा सगळ्यांचे स्वप्न सत्यात उतरावे, असे वाटते. आता अनेक कंपन्या आहेत, ज्या प्रवाशांना अगदी स्वस्त दरात तिकीट उपलब्ध करून देतात. स्वस्त दरात सेवा देणारी कंपनी म्हणजे- ‘विस्तारा’. सध्या ‘विस्तारा’संबंधी एक मोठी बातमी चर्चेत आहे आणि ती म्हणजे २०२३च्या अखेरपर्यंत ‘एअर इंडिया’ व ‘विस्तारा’ यांचे विलीनीकरण होण्याची दाट शक्यता आहे.

भारतीय प्रवासी परदेशात जाताना, भारतीय विमान कंपन्यांकडून प्रवास करण्याऐवजी, परदेशी कंपन्यांच्या विमानांतून प्रवास करतात. याची कारणे शोधून यात बदल करावयास हवा. परदेशी विमानांतून प्रवास चांगला व सुरक्षित होतो, अशी जी मनोधारणा आहे, त्यात बदल व्हायला हवा. भारताचे आज जगात आर्थिकदृष्ट्या पाचवे स्थान आहे. लवकरच याहून वरच्या स्थानावर जायचे आहे. त्यावेळी विमान प्रवाशांची संख्या निश्चितच वाढणार. देशात येणार्‍यांची तसेच देशातून बाहेर जाणार्‍यांचीही. त्यामुळे विमानतळांची संख्या वाढविणे महत्त्वाचे. त्यातही विमानतळ वाढविण्याच्या निर्णयावर राजकीय मारामारी खूप होते. त्यामुळे आहेत ते विमानतळ अत्याधुनिक व अद्ययावत करणे, विमानतळावर चांगली व पटकन सेवा, चांगली एअरक्राफ्ट्स, विमान वेळेत सुटणे व वेळेत लँड होणे यावर भर देऊन याबाबी अमलात आणावयास हव्यात. त्यावेळीच जगभर असे म्हटले जाईल की, भारतातील विमानसेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे.


आंतरराष्ट्रीय पातळीवर सतत पेट्रोलचे दर वाढत असल्यामुळे त्याचा फटका विमान वाहतूक करणार्‍या कंपन्यांना व ग्राहकांना बसताना दिसतो. तेव्हा, अशा सर्व पैलूंचा विचार करुन ‘उडान’ योजना यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न महत्त्वाचे.
भारतात सध्या ‘एअर इंडिया एअरलाईन्स’, ‘विस्तारा एअरसाईन्य गो फर्स्ट’ (गो एअर) ‘इंडिगो एअरलाईन्स’, ‘एअर इंडिया एक्सप्रेस’, ‘एअर एशिया इंडिया’, ‘स्पाईसजेट’, ‘अकासा एअर’ या कंपन्या प्रवासी विमान वाहतूक सेवा देतात. भारतातील या उद्योगातील सर्वात मोठी कंपनी सध्या ‘इंडिगो’ आहे. या कंपनीची हवाईसेवा देशातील ७४ विमानतळांवरून उड्डाण घेते व परदेशात २० ठिकाणीही जाते. भारतीय प्रवासी परदेशात जाताना, भारतीय विमान कंपन्यांकडून प्रवास करण्याऐवजी, परदेशी कंपन्यांच्या विमानांतून प्रवास करतात. याची कारणे शोधून यात बदल करावयास हवा. परदेशी विमाानांतून प्रवास चांगला व सुरक्षित होतो, अशी जी मनोधारणा आहे, त्यात बदल व्हायला हवा.


भारताचे आज जगात आर्थिकदृष्ट्या पाचवे स्थान आहे. लवकरच याहून वरच्या स्थानावर जायचे आहे. त्यावेळी विमान प्रवाशांची संख्या निश्चितच वाढणार. देशात येणार्‍यांची तसेच देशातून बाहेर जाणार्‍यांचीही. त्यामुळे विमानतळांची संख्या वाढविणे महत्त्वाचे. त्यातही विमानतळ वाढविण्याच्या निर्णयावर राजकीय मारामारी खूप होते. त्यामुळे आहेत ते विमानतळ अत्याधुनिक व अद्ययावत करणे, विमानतळावर चांगली व पटकन सेवा, चांगली एअरक्राफ्ट्स, विमान वेळेत सुटणे व वेळेत लँड होणे यावर भर देऊन याबाबी अमलात आणावयास हव्यात. त्यावेळीच जगभर असे म्हटले जाईल की, भारतातील विमानसेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सतत पेट्रोलचे दर वाढत असल्यामुळे त्याचा फटका विमान वाहतूक करणार्‍या कंपन्यांना व ग्राहकांना बसताना दिसतो. तेव्हा, अशा सर्व पैलूंचा विचार करुन ‘उडान’ योजना यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न महत्त्वाचे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.