औरंगाबाद : भारतीय जनता पार्टीचे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षक दिनाच्या मुहूर्तावरच जिल्ह्यातील ढिसाळ शिक्षण व्यवस्थेची पोलखोल केली. खास शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रशांत यांनी जिल्ह्यातील शाळांना अचानक भेट दिली, तिथे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा दर्जाही तपासला यात या सर्वच गोष्टींचा दर्जा ९० टक्के घसरल्याचे आरोप प्रशांत यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या झाडाझडतीमध्ये आजवर पडद्याआड राहिलेले हे वास्तव जगासमोर आले आहे.
प्रशांत यांनी त्यांच्या या भेटीमध्ये शाळेतील मुलांची छोटी परीक्षा घेतली, तेव्हा कित्येक ठिकाणी मुलांना साधी बाराखडी सुद्धा येत नसल्याचे उघड झाले. मुलांना साधे साधे सामान्य ज्ञानाचे प्रश्न येत नव्हते, नीट उजळणी म्हणता येत नव्हती. मुलांच्या शिक्षणाची इतकी वाईट अवस्था प्रशांत यांच्या या झाडाझडतीमुळे समोर आली. या सगळ्या प्रकारानंतर प्रशांत यांनी जिल्ह्यातले प्राथमिक शाळांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
शिक्षक नीट शिकवत नसल्याने मुलांचे खूप नुकसान होत आहे असेही प्रशांत यांनी सांगितले. याच भेटीत प्रशांत यांनी शाळेत पोषण आहाराच्या माध्यमातून दिली खिचडीही खाऊन बघितली. शिक्षक दिनानिमित्त प्रशांत यांनी एका शाळेतील शिक्षिकेचे पूजन देखील केले. राज्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थेची दुरावस्था कित्येक वर्षे तशीच आहे त्यामुळे आता प्रशांत यांनी केलेल्या या झाडाझडतीनंतर तरी हे चित्र बदलेल अशी आशाच व्यक्त केली जात आहे.