अजिंठा लेण्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आता ई- बसेस!

    29-Sep-2024
Total Views |

ajanta caves
 
मुंबई : (Ajanta Caves) महाराष्ट्र पर्यटन विभागाने पर्यटकांना विनाअडथळा अजिंठा लेणीपर्यंत नेण्यासाठी २० इलेक्ट्रिक बसेसचा ताफा सुरू केला आहे, अशी माहिती शुक्रवारी एका अधिकाऱ्याने दिली.
 
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून शुक्रवार दि. २७ सप्टेंबर २०२४ रोजी पहिली इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आली. या बसेस सर्व आधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहेत. या बसेस प्रवाश्यांना पार्किंगमधून गुहा संकुलापर्यंत पोहोचवतील.अजिंठा लेण्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आरामदायी, त्रासमुक्त आणि पर्यावरणपूरक अशी सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे हा यामागील उद्देश आहे. या बसेसमुळे पर्यटकांचा प्रवास अविस्मरणीय होणार आहे.
 
पीटीआयशी बोलताना राज्याच्या पर्यटन विभागाचे सहाय्यक संचालक विजय जाधव म्हणाले, "२० इलेक्ट्रिक बसेसचा हा ताफा अजिंठा लेणी या जागतिक वारसास्थळाला भेट देणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांसाठी सोईस्कर ठरणार आहे. यापूर्वी पारंपारिक डिझेल बसेस वापरात होत्या, परंतु बसच्या फेऱ्यांमुळे पर्यटकांना बराच वेळ वाट पाहावी लागत असे. आता या नवीन इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्यामुळे वाहतूक तर जलद होईलच, शिवाय ती पर्यावरणपूरकही असेल. तसेच, प्रवासादरम्यान पर्यटकांना अजिंठा लेणीच्या इतिहासावरील चित्रपट पाहायला मिळणार आहे," असे ते म्हणाले.
 
"वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित बसेसची १४ ते २२ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. संपूर्ण ताफा २० ऑक्टोबरपर्यंत कार्यान्वित होईल अशी अपेक्षा आहे. तसेच लवकरच, महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून पर्यटकांसाठी आरक्षण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अनुकूल बुकिंग प्रणाली सुरू करणार आहे," असेही ते पुढे म्हणाले.
 
युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यताप्राप्त असलेल्या अजिंठा लेणी ह्या छत्रपती संभाजीनगर शहरापासून अंदाजे १०० किलोमीटर अंतरावर आहे. बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी या जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी भारताची ठळक ओळख करून देणाऱ्या महत्त्वाच्या लेणी आहेत. या लेण्यांमध्ये भगवान गौतम बुद्धांचे जीवन आणि जातक कथांचे वर्णन करणारी उत्कृष्ट चित्रांनी सुशोभित असलेली विहारे आणि मठांसह ३० संकुलांचा समावेश आहे.
 
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या माहितीनुसार या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट यादरम्यान ७,००० हून अधिक विदेशी पर्यटकांसह तब्बल २,५८,६१९ पर्यटकांनी या स्थळाला भेट दिली आहे.