समरसतेचे विश्व उभे राहत आहे...

    03-Sep-2022   
Total Views |
babasaheb  
 
 
दि. २४ ऑगस्ट रोजी विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय समरसता प्रमुख देवजीभाई रावत आणि परिषदेचे मुंबई क्षेत्रीय समरसता प्रमुख, गणेश मोकाशी कोकण प्रांत दौर्यावर होते. मुंबईतील घाटकोपर येथे विविध सामाजिक बैठकीत आणि कार्यक्रमात ते सहभागी झाले. हा सगळा वृत्तांत ‘याची देही याची डोळा’ मांडण्याचा या लेखातून केलेला हा प्रयत्न...
 
 
‘चन्दन हैं इस देश की माटी,
तपो भूमी हर ग्राम हैं।
हर बाला देवी की प्रतिमा,
बच्चा-बच्चा राम हैं।
 
 
देशाच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये देवत्व आणि प्रत्येक गावात तपोभूमी मानून अविरत सेवा संघटन कार्य करणारी विश्व हिंदू परिषद. देशसेवा करण्याचे परिमाण म्हणून विश्व हिंदू परिषदेचे अनेक आयाम आहेत. त्यापैकी एक आहे समरसता. समरसता म्हणजे काय? तर एकमेकांशी कोणताही भेदाभेद न करता केलेली स्नेहपूर्ण नि:स्वार्थी वर्तणूक. आपल्यासारखेच दुसरीही व्यक्ती माणूस आहे, त्या व्यक्तीशी माणसासारखेच वागले पाहिजे, ही जाणीव! या सगळ्याची ढोबळमानाने मांडणी करताना रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले होते की, ‘एक गाव एक पाणवठा, एक मंदिर आणि आणि एक स्मशानभूमी’ ही संकल्पना कार्यान्वित व्हावी.
 
 
अर्थात, या संकल्पनेमागचा जो भाव आहे, जो अर्थ आहे, तो आहे समरसता! मागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, “कुठल्याही प्रकारचा भेदभाव, जातीभेद न ठेवता राष्ट्रामध्ये, सार्वभौमत्त्वाशी समरस होणे, ही खरी समरसता.” या समरसतेचा कार्यभाव वृद्धिंगत करण्यासाठी दि. २४ ऑगस्ट रोजी विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय समरसता प्रमुख देवजी भाई रावत, परिषदेचे मुंबई क्षेत्रीय समरसता प्रमुख गणेश मोकाशी, कोकण प्रांत समरसता प्रमुख नरेश पाटील, कोकण प्रांत समरसता सहप्रमुख कृष्णा बांदेकर यांचा मुंबई येथे प्रवास आणि सदिच्छा भेट असा कार्यक्रम होता. विश्व हिंदू परिषदेच्या या पदाधिकार्यांची भेट आणि वार्तालापाचा कार्यक्रम घाटकोपर जिल्हा सहमंत्री सुशील साहनी यांनी आयोजित केला होता.
 
 
समरसता कार्यकर्ता म्हणून तुम्ही या कार्यक्रमाला जरूर या, असे मलाही आग्रहाचे निमंत्रण होते. तसेच, हिंदू सभा हॉस्पिटल संचालक, विहिंप स्वास्थ सेवा अभियान सहयोग डॉक्टर वैभव देवगिरकर यांनाही निमंत्रित केले. त्यावेळी मला वाटले, संघटनेच्या पदाधिकार्यांचा दौरा म्हणजे एक साचेबद्द काम. तेच ते कार्यकर्त्यांकडून परिसरातले काम अनुभव, समस्यांची माहिती करून घेणे, त्यावर विचारविमर्श करणे, स्थानिक परिसरातील विशेष समाजघटकांच्या भेटीगाठी वगैरे वगैरे. तरीही गुजरातहून देवजीभाई आणि नागपूरहून गणेशदादा येणार म्हणून या पूर्ण दिवसाच्या दौर्यात उपस्थित राहिले.
 
 
सामाजिक समरसतेची कार्यकर्ता म्हणून खात्रीने सांगते की, हा दौरा, हा दिवस माझ्यासाठी विशेषच होता. पहिलाच कार्यक्रम घाटकोपर पंतनगरला होता. रोहिदास समाजबांधवांच्या दुकानाचे उद्घाटन होते. रस्त्याच्याकडेलाएक छोटेसे दुकान. त्याचे उद्घाटन. हे उद्घाटन करण्यासाठी देवजीभाई आणि टीम का आली असेल? तर काही क्षणातच कार्यक्रमाचे महत्त्व दिसले. अनिल चव्हाण यांचे चपला शिवण्याचे ते दुकान होते. अतिशय सुबक आणि रेखीव तितकेच भक्कम.
 
 
कित्येक दशके अनिल यांचे तिथे दुकान होते. पण, पूर्वी ते कच्चे, थोडा पाऊस आला की कोलमडणारे, पाणी भरणारे असे होते. तसेच, दुकानाचे स्वरूपही साधारणच. गेल्या पावसात तर दुकानाचे खूप नुकसान झाले. अर्थाजन करण्यासाठी दुकानात बसणेही अनिल यांना मुश्किल झाले. याच परिसरात अजय बागल राहतात. मराठा समाजाचे बागल हे भाजपचे पदाधिकारी. त्यांची आई कल्पना या अत्यंत समाजशील होत्या. आईच्या मृत्यूनंतरही तिच्या समाजशीलतेचा वारसा अबाधित ठेवावा, असे बागल कुटुंबाने ठरवले. त्यामुळे अजय बागल आणि त्यांची मोठी भगिनी मुंबई बँकेच्या आणि भाजपच्या पदाधिकारी कविता देशमुख यांनी पुढाकार घेतला. त्यांनी अनिल यांना दुकान नव्याने बांधून दिले. इतकेच नव्हे, तर दुकानाची रचना अशी करून दिली की, कुणाही पांथस्थाला तिथे दोन मिनिट का होईना बसावेसे वाटेल. जातीपातीचे राजकारण महाराष्ट्राला नवीन नाही. सवर्ण आणि मागासवर्गीय समाजात तेढ माजवायचे प्रयत्न काही समाजकंटक सातत्याने करत असतात.
 
 
या अशा परिस्थितीमध्ये बागल कुटुंबीयांनी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास बांधवास सहकार्याचा हात देऊन सामाजिक समरसतेचा आदर्श प्रस्थापित केला. गरिबाबद्दल, मागासवर्गीय समाजाच्या ‘नाही रे’ परिस्थितीबद्दल वाईट वाटते, वाईट वाटते ही परिस्थिती बदलली पाहिजे, समाजात समता आली पाहिजे हे वाक्य मंत्रासारखे घोकणारे अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आपण पाहतो. मात्र, असल्या लाख शब्दांपेक्षा त्या व्यक्तीला अर्थार्जनाची सन्मानजनक संधी मिळवून देणे कधीही चांगले. समरसतेच्या कार्यप्रणालीतील हेसुद्धा एक महत्त्वाचे सूत्र आहे. हेच काम बागल कुटुंबीयांनी केले. त्यामुळे समरसतेचा मापदंड मांडणार्या या कार्यक्रमाला देवजीभाई, गणेश मोकाशी हे विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी उपस्थित राहणे हे औचित्यपूर्णच ठरले. यावेळी ईशान्य मुंबई भाजपचे अध्यक्ष अशोक राय आणि त्यांचे सहकारीही यावेळी उपस्थित होते.
 
 
त्यानंतर देवजीभाईंनी घाटकोपरमधील विविध समाजाच्या प्रमुखांसमोर समरसताविषयक विचार मांडले. त्यांनी विश्व हिंदू परिषदेचे समाजासाठी चालणारे सेवाकार्य विषद केले. ईशान्य भारतातील छात्रनिवास, शैक्षणिक संस्था त्यातून घडवले जाणारे यशस्वी भारतीय नागरिक याबद्दल त्यांनी माहिती दिली. त्यांचे अनुभव ऐकून मान्य करावेच लागले की, शक्तिशाली सुसंस्कारीत समाजाच्या जडणघडणीमध्ये आणि भक्कम निर्मितीसाठी विश्व हिंदू परिषदेचे योगदान मोठे आहे.
 
 
काही महिन्यांपूर्वीच हिंदू सभा हॉस्पिटलच्या सहकार्याने परिषदेने मुंबईच्या वस्त्यावस्त्यांमध्ये आरोग्य सेवेचे काम उभे केलेले पाहिले आहे. ढोबळ आकडेवारीनुसार, देशभर विश्व हिंदू परिषदेचे ३२ बाल कल्याण केंद्र, चार महिला साहाय्यता केंद्र, १९ निःशुल्क भोजन वितरण केंद्र, ९३ वृद्धाश्रम आहेत. इतकेच नव्हे, तर स्वयंरोजगार देणारे अनेक प्रशिक्षण केंद्रेही आहेत. १११ छात्रालय, २०० बालवाडी आणि शेकडो बाल संस्कार केंद्र आहेत. तसेच परिषदेचे १३ रुग्णालय, ६४ डिस्पेन्सरी, ११ मोबाईल डिस्पेन्सरी, ३४ रुग्णवाहिका आणि १,५३१ अन्य चिकित्सा प्रकल्प आहेत.
 
 
असो. विविध समाजघटकांच्या प्रमुखांशी संवाद साधल्यानंतर सगळ्यांनी घाटकोपर माता रमाबाई नगराकडे प्रस्थान केले. मुंबईच्या सामाजिक जीवनात आणि समरस प्रवाहाच्या प्रवासात माता रमाबाई नगराचे वेगळे स्थान आहे. नगरात प्रवेश करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. भव्य दिव्य आणि उत्तुंग पुतळा. विश्व हिंदू परिषदेच्या सर्व पदाधिकार्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. क्रांतिसूर्याने शतकाचा अंधार भस्म केला आणि करोडो जनतेला संविधानाचे अमृत दिले. त्या महामानवाला प्रणाम करताना देवजीभाईंचे डोळे भरून आले. पुतळ्याजवळ नि:शब्द सगळे उभे राहिले. यानंतर माता रमाबाई नगरातील भिक्खू संघाशी स्नेह भेटीचा कार्यक्रम होता.
 
 
पूर्व द्रुतगती मार्गाला लागून असलेले भव्य बुद्धविहार. तिथे धम्माचे पूज्य थेरो आणि भंते निवासाला होते. विहारात प्रवेश केला. पवित्र आणि शांतता, बस हे दोनच भाव. थेरो विरात्न यांनी सगळ्यांचे स्वागत केले. उपस्थितांनी तथागतांना वंदन केले. थेरो सगळ्यांना शिलदान करतील असे विरात्न यांनी सांगितले. शिलदान म्हणजे काय? हा प्रश्न पडला, तर त्याचे उत्तर होते धम्मवंदना करण्यात आली. ‘बुद्धं शरणम गच्छामी, धम्मं शरणम गच्छामी.’ वंदना संपल्यानंतर विरात्न यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संबंधित सारेच जण देशासाठी त्याग करतात, देशाचे हित साधण्यासाठी कष्ट करतात.
 
 
विश्व हिंदू परिषदेचे असे त्यागशील पदाधिकारी भेटीला आल्याबद्दल त्यांनी संतोष व्यक्त केला. तसेच त्यांनी तथागत गौतम बुद्धांच्या विचारांची कालनिरपेक्ष सत्यताही सांगितली. त्यानंतर देवजीभाई यांनी मनोगत व्यक्त केले. ”डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपुरूष असून सदासर्वकाळ वंदनीय आहेत. हिंदू धर्मावर त्यांचे अनंत उपकार आहेत. जगाला आज युद्ध नको बुद्ध हवा अशी गरज वाटते, असे अष्टांगमार्गी तथागतांचे विचार असून बौद्ध म्हणजे कुणी वेगळे नाहीत. बुद्धांचे तत्वज्ञान सगळ्यांसाठी आहे. आपला देश आणि समाज उन्नतीपथावर जाण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध आहोत.” या ईश्वरी कार्यात उपस्थित पूज्य थेरो आणि भंते यांचा आशीर्वाद साथ मिळावा, अशी अपेक्षा देवजीभाई यांनी व्यक्त केली.
 
 
यावेळी गणेश मोकाशी यांनी समाजासमोरील प्रश्न मांडले. धर्मांतर आणि त्यातून उभे राहणार्या समस्या याबाबत काही अनुभव सांगितले. यावर उपस्थित पूज्य थेरो आणि भंते यांनी प्रसन्नतेने सांगितले की, ”धम्मकार्यात आणि देशसमाजाच्या उन्नतीच्या कार्यात आम्ही सदैव भद्र सज्जनशक्ती सोबत असतो.” भिक्खू संघाने यावेळी आभार मानून आपल्या काही मागण्याही मांडल्या. यानंतर विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या घाटकोपर किरोळ येथील निवासस्थानी गेले. हिंदू म्हणून अखंड राहणारा मातंग समाज. देवजीभाई आणि सहकार्यांनी या समाजबांधवांशी संवाद साधला. समाजात नवप्रवाह काय आहेत? समाजापुढे आव्हान काय असून समाजाचे काय म्हणणे आहे, याबाबत मत व्यक्त करण्यात आली. यानंतर हा दौरा समाप्त झाला.
 
 
रोहिदास, नवबौद्ध आणि मातंग समाज बांधवांचे प्रातिनिधिक स्वरूपातले विचार अनुभवले. दिवसभराच्या दौर्यातून समोर आले की, समाज बदलत आहे. सकारात्मक जगण्याचे बळ समाजात आले आहे. समरसतेचे विश्व उभे राहत आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.