मुंबई (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावातून रविवारी दि. ११ सप्टेंबर रोजी विहरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. वन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी त्वरित कारवाई करून या बिबट्याला वाचवण्यात आले. पशुवैद्यकीय तपासणी केल्यानंतर या बिबट्याची नैसर्गिक अधिवासात सुटका करण्यात आली आहे.
नागझरवाडीच्या रुपेश कृष्णा सवाळ यांना रविवारी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान घराशेजारी असलेल्या चिरेबंदी विहिरीमध्ये बिबट्या पडला असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ वनपरिक्षेत्र कार्यालय सावंतवाडी येथे संपर्क साधला.माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या बचाव पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ही विहीर ४० फुट खोल असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. तसेच कठड्यापासून सध्याची पाण्याची पातळी अंदाजे १५ फुटावर आहे. रात्रीच्या अंधारात कोंबड्या किंवा भटक्या कुत्र्यांच्या शिकारीसाठी आल्यावर विहिरीचा अंदाज न आल्यामुळे अपघाताने हा बिबट्या विहिरीत पडला असावा. जीव वाचवण्यासाठी बिबट्याने विहिरीच्या पाणीपातळीच्या जवळ असलेल्या खोबणीचा सहारा घेतला. ही खोबणी विहिरीच्या भिंतीत गुहेप्रमाणे ३ ते ४ फूट आत पर्यंत पोकळ असल्याने बिबट्या तिथे त्यात लपून बसला. बघ्यांची वाढत असलेली गर्दी, खोबणीत दडून बसलेला बिबट्या अन वरून सतत पडत असलेला मुसळधार पाऊस या सर्व आव्हानांचा वन विभागाच्या बचाव पथकाला सामना करावा लागला.
वनविभागाच्या बचाव पथकाने सदर बिबट्याला यशस्वीरीत्या लोखंडी पिंजऱ्यात कैद केले. हा बिबट्या अंदाजे अडीच ते तीन वर्षांचा वाढ झालेला नर बिबट असून त्याची पशुवैद्यकीय तपासणी करण्यात आली. हा बिबट्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यासाठी पूर्णतः निरोगी असल्याचे या तपासणीमध्ये दिसून आले. त्यानुसार त्याला नैसर्गिक अधिवासात यशस्वीरित्या मुक्त करण्यात आले. या बचावकार्यात न्हवेलीच्या गावकरी मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले. हे बचावकार्य उपवनसंरक्षक सावंतवाडी दीपक खाडे यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सावंतवाडी मदन क्षीरसागर, वनक्षेत्रपाल कडावल अमित कटके, वनपाल महेश पाटील, वनरक्षक अप्पासो राठोड, दत्तात्रय शिंदे, महादेव गेजगे, संग्राम पाटील, सागर भोजने, प्रकाश रानगिरे, रामदास जंगले, राहुल मयेकर या सर्वांच्या टीमने यशस्वीपणे पार पाडले.