सत्तासंघर्षाच्या इतिहासात अपरिचित राहिलेल्यांची गाथा; 'स्वराज'!

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दूरदर्शनची विशेष मालिका

    12-Aug-2022
Total Views | 108
swaraj
 
 
 
मुंबई : भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या विविध पैलूंना समोर आणणारी ७५ भागांची 'स्वराज - भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा' ही मालिका येत्या रविवार, दि. १४ ऑगस्टपासून 'डीडी नॅशनल' या दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर सुरु होणार आहे. १५ व्या शतकापासून म्हणजेच वास्को द गामाचे भारतात आगमन झाल्याच्या कालखंडापासून सुरू झालेल्या सत्तासंघर्षाच्या इतिहासाचे दर्शन घडवणारी ही एक भव्य मालिका आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीत आतापर्यंत अपरिचित राहिलेल्यांची गाथा या मालिकेत दाखवण्यात आली आहे. मालिकेच्या प्रसारणापूर्वी शुक्रवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सूचना आणि प्रसारण मंत्रालयच्या अतिरिक्त महासंचालिका (पश्चिम क्षेत्र) स्मिता वत्स शर्मा, प्रसार भारतीचे अतिरिक्त महासंचालक (पश्चिम क्षेत्र) नीरज अग्रवाल, ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी, इ. मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे मनोज जोशी हे या मालिकेचे 'सूत्रधार' या महत्वाच्या भूमिकेत आहेत.
 
 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून या मालिकेचा प्रारंभ केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते शुक्रवारी दि. ५ ऑगस्ट आकाशवाणी भवन येथे करण्यात आला. यावेळी माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन हेसुद्धा उपस्थित होते. राणी अबक्का, कान्होजी आंग्रे, सिद्धो कान्हो मुर्मु, बक्षी जगबंधू, तिरोत सिंह, सिद्धो कान्हो मुर्मु, शिवप्पा नायक, तिलका मांझी यांसारख्या अनाम वीरांचे आणि वीरांगनांचे आयुष्य आणि बलिदानाच्या गाथा या मालिकेत मांडण्यात आली आहे. 'सोने की चिडिया' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या विरोधात इंग्रजांशिवाय फ्रेंच, डच आणि पोर्तुगीज वसाहतवाद्यांनी जो अन्यायकारक कारभार केला आणि त्यांच्या विरोधात ज्या अनाम वीरांनी उठाव केला; त्यांच्या न ऐकलेल्या कहाण्या या मालिकेतून समोर येणार आहेत. महत्वाचे म्हणजे नवोदित कलाकारांना घेऊन ही मालिका तयार करण्यात आली आहे.
 
 
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या इतिहासाचे दृक-श्राव्य सादरीकरण करणे हा या मालिकेचा उद्देश आहे. यात प्रत्येक धर्मातील शूरवीरांची शौर्यगाथा मांडण्यात आली आहे. 4K/HD या सर्वोत्तम दर्ज्यातून या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील आणि परदेशातील प्रेक्षकांना स्वातंत्र्याच्या संघर्षांमागील भावना एका नव्या दृष्टिकोनातून लक्षात घेता येणार आहे. ज्यांच्याविषयी आजवर कोणाला माहित नव्हते अशा अनाम वीरांच्या महान त्यागाचा योग्य सन्मान या मालिकेद्वारे होणार आहे. विशेषतः आजच्या युवा वर्गाला भारताच्या समृद्ध इतिहासापासून प्रेरणा मिळेल आणि तिचे रूपांतर एका राष्ट्रीय चळवळीत होईल, असा दृष्टकोन निर्माण करणारी ही मालिका आहे.
इतर भाषा प्रसारण संख्या - ९
प्रादेशिक वाहिन्यांवरील प्रसारण : २० ऑगस्टपासून (रात्री ८ ते ९)
मालिकेचा प्रत्येक नवा भाग : डीडी नॅशनलवर, दर रविवारी (रात्री ९ ते १०)
मालिकेचे पुनःप्रसारण : मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार
मालिकेच्या श्राव्य आवृत्तीचे प्रसारण : २० ऑगस्टपासून आकाशवाणीवर (शनिवार, सकाळी ११ वाजता)
 
 
भविष्याचा योग्य मार्ग दर्शवणारा असा हा इतिहास!
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून आज संपूर्ण भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. याचे औचीत्य साधून, आजपर्यंत आपल्याला ठाऊक नसलेल्या भारताच्या इतिहासातील शूरवीरांची मांडणी करणे, हे या मालिकेसाठी सर्वात मोठ आव्हान होते. त्यामुळे अनेक इतिहास अभ्यासकांच्या मार्गदर्शनातून या मालिकेतील भाग तयात केले आहेत. स्वराज्य निर्मितीसाठी त्याकाळच्या वीरांनी दिलेलं योगदान तंतोतंत मांडण्याचा प्रयत्न या मालिकेतून केला आहे. कोणाच्या भावना दुखू नये यासाठी मिळालेल्या माहितीच्या आधारे पुराव्यानिशी ही मालिका तयार केली आहे. १५ व्या शतकापासून ते १९४७ पर्यंत मधल्या अनेक शूरवीरांनी आपल्या भविष्यातील पिढ्यांचा विचार करून स्वराज्यासाठी जे योगदान दिले, ते दाखवणारी ही मालिका आहे. असा इतिहास बऱ्याचदा मांडला जात नाही. त्यामुळे हा इतिहास जरी असला तरी भविष्याचा योग्य मार्ग दर्शवणारा असा हा इतिहास आहे. असे ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यावेळी बोलले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121