१४ विद्या, ६४ कलांमधील ‘भाषाज्ञान’ ही एक महत्त्वपूर्ण कला अवगत असलेल्या, ‘अॅक्मी एज्युकेशन’च्या सर्वेसर्वा आणि भाषाविषयक महत्त्वपूर्ण कार्य करणार्या दीप्ती गोरे यांच्याविषयी...
जसा नद्यांचा संगम होतो आणि त्या सर्व नद्या समुद्राशी एकरूप होतात, त्याचप्रमाणे ठाण्यातील ’अॅक्मी एज्युकेशन’ या भाषाविषयक संस्थेमध्ये जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, जपानी अशा कितीतरी भाषा एकत्र येतात आणि या ’अॅक्मी एज्युकेशन’शी एकरूप होतात आणि या सर्वाचे उगमस्थान म्हणजेच दीप्ती गोरे.भाषेच्या माध्यमातून वेगळे असे काहीतरी घडावे आणि आपल्या ओंजळीमध्ये जेवढे आहे तेवढे या नव्या पिढीला देता यावे म्हणून दीप्ती गोरे यांनी ’अॅक्मी एज्युकेशन’ हे उचललेले महत्त्वाचे पाऊल.
खरेतर दीप्ती गोरे यांचे पदवी शिक्षण पूर्ण झाले ते मानसशास्त्र आणि इंग्रजी साहित्य या विषयात. परंतु, याच्या जोडीने त्यांना जर्मन भाषादेखीलआवडू लागली. जसे आपले लाडके पु. ल. देशपांडे रवींद्रनाथ टागोरांची ’गीतांजली’ मूळ भाषा बंगालीमधून वाचता यावी, म्हणून स्वतः बंगाली शिकले. तसेच जर्मन साहित्यिकांच्या साहित्याचा अनुवाद वाचण्यापेक्षा जर ते मूळ जर्मन भाषेतून वाचता आले, तर त्याची गोडी काही औरच असेल, या कल्पनेतून दीप्ती गोरे यांनी स्वतः जर्मन भाषा शिकण्यास सुरुवात केली आणि बघता बघता त्यांच्या अभ्यासाची व्याप्ती एवढी वाढली की, त्या स्वतः जर्मन भाषेत तज्ज्ञ झाल्या.
दीप्ती यांनी या भाषेवर मिळवलेले प्रभुत्व पाहून त्यांना अनेक शैक्षणिक संस्थांमधून जर्मन शिकवण्यासाठी मागणी होऊ लागली. ही मागणी फक्त वरिष्ठांची नव्हती, तर स्वतः विद्यार्थीदेखील त्यांचाच आग्रह धरू लागले. सुरुवातीच्या काळात या भाषेची गोडी मुलांमध्ये कशी रुजवता येईल, याचा विचार करत त्या स्वतः जर्मनच्या शिकवण्या घेऊ लागल्या. एक-दोन मुलांपासून सुरू झालेल्या या प्रवासात अनेक मुले जोडली गेली आणि यातून 2009 साली उभी झाली ती ’अॅक्मी एज्युकेशन’ ही संस्था.
या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भाषेच्या शिक्षणाबरोबर मुलांमध्ये त्या भाषेची संस्कृती रुजावी आणि त्यांची ज्ञानात्मक दृष्टी विस्तारावी आणि या हेतूने चांगले लोक अधिकाधिक प्रमाणात जोडले जावे, यासाठी ही संस्था फक्त जर्मन भाषेपुरताच मर्यादित राहिली नाही, तर दीप्ती गोरे यांनी आपल्या संस्थेमध्ये फ्रेंच, स्पॅनिश, जपानी, मँडेरिन या परदेशी भाषांचे शिक्षण देण्यासही सुरुवात केली. अनेकदा आपली मातृभाषा वा हिंदी, इंग्रजी भाषा या आपल्या बर्यापैकी अंगवळणी पडलेल्या असतात. परंतु, संपूर्ण नवी भाषा शिकणे हे नक्कीच आव्हान असते. त्यामुळे दीप्ती गोरे यांनी विद्यार्थ्यांस ज्ञानाबरोबर आनंद मिळावा, मजा यावी यासाठी त्या-त्या देशात कशाप्रकारे खाद्यसंस्कृती असते, त्याचे प्रत्यक्ष नमुने मुलांस आणायला सांगून किंवा मुलांचा वाढदिवस ’हॅप्पी बर्थडे टू यू’ हे तथाकथित गाणे न म्हणता ते उदा. जर्मन भाषा शिकत असतील, तर 'Wie schn5n dass du geboren bist' असे म्हणून साजरा करू लागले.
परदेशी भाषांच्या जोडीने दीप्ती त्यांच्या या संस्थेमध्ये मराठी आणि संस्कृत हे विषय लहान मुलांना शिकवले जातात. आजच्या धावपळीच्या आणि इंग्रजाळलेल्या काळात पालकांना मुलांसाठी कदाचित पुरेसा वेळ नाही. कदाचित प्रत्येक घरात लहान मुलांकडून ‘शुभं करोती कल्याणम’, ‘रामरक्षा’ किंवा पाढे म्हणून घ्यायला आजी-आजोबांचा सहवास नाही, तर अशा सर्व मुलांसाठी ‘अॅक्मी एज्युकेशन’ आहे. यापद्धतीने आजपर्यंत आपल्या मराठी संस्कारांचा, भारतीय संस्कृतीचा ठेवा ज्याप्रमाणे जोपासला गेला आहे, त्याचप्रमाणे हा उद्याचा भारतदेखील हा ठेवा अविरत जोपासू शकेल.
कोरोनासारख्या महामारीमुळे जेव्हा संपूर्ण जग ऑफलाईन होते, बंद होते तेव्हा सगळे काम ऑनलाईन सुरू झाले; अशा काळात मुलांचे संपूर्ण लक्ष हे मोबाईलवरच्या खेळांवर केंद्रित झाले होते, अशा वेळी मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ नये, म्हणून या लहान मुलांसाठी दीप्ती यांनी आपल्या संस्थेमार्फत विविध संस्कार शिबिरे आयोजित केली. आपण जे शिक्षण घेतो ते कधीही वाया जात नाही. त्यांनी घेतलेल्या मानसशास्त्राच्या शिक्षणामुळे कुठेतरी त्यांच्यामधला मानसशास्त्रज्ञ त्यांच्यातल्या शिक्षकात डोकावत होता आणि म्हणूनच त्या मुलांच्या ’उद्या’ची काळजी त्यांनी ’आज’च घेतली.
१४ विद्या ६४ कलांमधील भाषाज्ञान ही एक कला आहे आणि एका भाषेपासून सुरू केलेला हा प्रवास अनेक भाषांच्या हातात हात गुंफून अखंड सुरू आहे, असा भाषेचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी दीप्ती गोरे ’लँगफेस्ट’ म्हणजेच ‘भाषामहोत्सव’ आयोजित करतात. ज्यात प्रत्यक्ष जर्मनी, स्पेन, फ्रान्स अशा देशांमधून पाहुणे या मुलांस भेटायला येतात. यावेळी त्यांच्या ओंजळीतले अनुभव, त्या पाहुण्यांशी गप्पा, मुलांचे कार्यक्रम - तेही ते जी भाषा शिकत आहेत त्या भाषेतून प्रहसन, गाणे आदींचे सादारीकरण या ’लँगफेस्ट’मध्ये होते. अशा विविध उपक्रमांमधून, शिकवणीतल्या वैविध्यपूर्ण पद्धतीमधून दीप्ती गोरे खर्या अर्थाने भाषाभगिनींचा प्रचार-प्रसार करण्याबरोबर मुलांमध्ये, भारतीय संस्कृतीचेही बीज पेरण्याचे महत्त्वपूर्ण कार्य गेली अनेक वर्ष अखंड करत आहेत.
- वेदश्री दवणे