‘जर तुम्ही पुस्तकांपर्यंत पोहोचत नसाल, तर मी पुस्तके तुमच्यापर्यंत पोहोचवेन!’ असे म्हणत ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा उपक्रम गेली अनेक वर्षे राबविणार्या विनायक रानडे यांच्याविषयी...
आयुष्याला कलाटणी देणारे प्रसंग अनेकदा अपघाताने घडतात, म्हणजेच अगदी योगायोगाने. परंतु, विनायक रानडे यांचे आयुष्य हे अक्षरशः अपघाताने बदलले. असे प्रसंग उद्भवल्यानंतर मनुष्य अर्थातच हताश होतो, खचतो-रडतो. परंतु, या अपघातामुळे त्यांना स्वतःशी संवाद साधायची संधी मिळाली. या दरम्यान त्यांना आपण काय काय करू शकतो, आपल्याकडे काय आहे, या गोष्टी नव्याने उमगल्या आणि त्यात सर्वात महत्त्वाचे होते ते म्हणजे ’आयुष्य!’ माणूस पैशाने काहीही विकत घेऊ शकतो. परंतु, त्यासाठी महत्त्वाचे आहे ते आयुष्य आणि या घटनेनंतर मिळालेले आयुष्य ही रानडे यांना दैवी कृपा वाटली आणि आपण या आयुष्याबद्दल, जगण्याच्या मिळालेल्या आणखी एका संधीबद्दलदेवाचे आणि समाजाचे देणे लागतो, हे त्यांनी जाणले. मग नेमके आपण काय करू शकतो, या विचारात असताना त्यांना जाणवले की, सुंदर दिसण्यासाठी आरोग्यशास्त्र, आहार आदी गोष्टी आहेत, तर मग सुंदर असण्यासाठी लोक काही करतात का, असा त्यांना प्रश्न पडला. वाचन माणसाला दृष्टी देते, विचार देते आणि वैचारिक तेज माणसाला आतूनच सुंदर बनवते आणि म्हणून त्यातून त्यांनी पुस्तक आणि वाचनाचा उपक्रम सुरू करण्याचे ठरवले.
विनायक रानडे नाशिकचे रहिवासी. त्यात नाशिकमध्ये वास्तव्यास स्वतः मराठी साहित्याचे दैवत वि. वा. शिरवाडकर. त्यामुळे सुरुवातीपासूनच वाचनाची आवड. बालपण असेच पुस्तकांत गेल्यामुळे रानडे यांना वाचनालय सुरू करावे किंवा वाचकांसाठी काही तरी करावे, असा मानस होता. त्यामुळे आत्ता मिळालेल्या सक्तीच्या विश्रांतीमुळे त्यांनी या विचारांना चालना दिली आणि ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चे वाचनालय सुरू केले. या वाचनालयाने थोड्याच कालावधीत खूप उंची गाठली. वाचक कोणत्या न कोणत्या निमित्ताने वाचनालयास विविध प्रकारे देणगी देत होते. जगभरातून वाचक वाचनालयास, कधी वाढदिवसानिमित्ताने वा उत्सवाप्रसंगी आनंद साजरा करण्याच्या निमित्ताने पुस्तके वा निधी पाठवत होते.

वाचनालय समृद्ध होत होते. परंतु, प्रत्यक्ष वाचकांची संख्या मर्यादित राहिली होती. मदत जगभरातून येत होती, पण वाचक फक्त नाशिक परिसरातलेच होते. वाचनालय असे मोजक्याच वाचकांपुरते का मर्यादित आहे, असा जेव्हा रानडे यांनी विचार केला तेव्हा तीन कारणे त्यांच्या लक्षात आली. ती म्हणजे, वय, वेळ आणि अंतर. काही वाचक वृद्धापकाळामुळे, तर काही वेळेच्या अभावामुळे आणि काही वाचक अर्थात वाचनालयापासून दूर राहत असल्यामुळे प्रत्यक्ष वाचनालयात येऊ शकत नव्हते. मग यावर उपाय काय? जर वाचक पुस्तकांपर्यंत, वाचनालयापर्यंत पोहोचू शकत नसतील, तर आपण पुस्तके त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यातूनच सुरू झाला ’ग्रंथ तुमच्या दारी’ हा उपक्रम! १०० पुस्तकांची एक पेटी. त्यात प्राचीन ग्रंथांपासून ते अगदी नव्या पुस्तकांपर्यंत विविध साहित्यप्रकारांचा समावेश. एका भागातील वा शहरातील ३५ वाचकांसाठी १०० पुस्तकांची एक ग्रंथपेटी आणि अशा कित्येक पेट्या वाचकांसाठी घरोघरी उपलब्ध करून दिल्या.
विनायक रानडे म्हणतात, “हा ग्रंथालयाचा पर्याय नाही, तर हे त्याला पूरक आहे. आपण ग्रंथालयात जायलाच हवे. कारण, ग्रंथपेटीमधील पुस्तके मर्यादित आहेत आणि ग्रंथालयात पुस्तकांचा खजिना आहे. विज्ञान, भूगोल, इतिहास, रहस्य, गूढ, विनोदी अशी कित्येक प्रकारांची निवड आपल्या तिथे करता येईल.” परंतु, असे असले तरी ’ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाला फक्त महाराष्ट्रातूनच नाही, तर सातासमुद्रापलीकडेदेखील भरपूर प्रतिसाद मिळाला. ’वाचाल तर वाचाल’ ही उक्ती खर्या अर्थाने आचरणात आणली. वाचकांना नव्या पुस्तकांची, लेखकांची, दर्जेदार-अभिजात साहित्याची ओळख करून देण्याचे महत्त्वाचे काम विनायक रानडे अविरतपणे करीत आहेत.

गेली १३ वर्षं हा त्यांचा अभिनव उपक्रम अखंड सुरू आहे. महाराष्ट्र, गोवा, दिल्ली, कर्नाटक अशा भारतातल्या अनेक राज्यांत तर दुबई, नेदरलँड्स, टोकियो, ऑस्ट्रेलिया, फिनलंड, ओमान, लंडन, अमेरिकेच्या कित्येक घरांमध्ये ही ग्रंथपेटी पोहोचली आहे. विनायक रानडे यांनी फक्त ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचावेत, माणूस वाचनाने समृद्ध व्हावा, या हेतूने सुरू केलेल्या या उपक्रमासाठी तब्बल २ कोटी, २५ लाख रुपयांची ग्रंथसंपदा त्यांनी आजपर्यंत वाचकांपर्यंत पोहोचवली आहे. जगभरात मराठी साहित्यावर प्रेम करणार्या वाचकांना ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्याचे शिवधनुष्य उचलल्याबद्दल अनेक वाचकांनी कौतुक तर केलेच. परंतु, महाराष्ट्र शासनानेदेखील त्यांच्या या उपक्रमास पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य दिले आहे, तर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते रानडे यांना विशेष सन्मानपत्रदेखीलमिळाले आहे.
वाचन संस्कृती आणि मुख्यतः पुस्तक संस्कृती आज धोक्यात आहे, असे वाटत असताना; स्वबळावर, कित्येक गोष्टींचा सामना करत ती जपण्याचे महत्त्वाचे काम आज विनायक रानडे यांच्यासारखा अवलिया करत आहे आणि त्यांच्यासारख्या ग्रंथसख्यामुळे आज खरोखरच ’ग्रंथ आपल्या दारी’ पोहोचत आहे, हे नक्की!
- वेदश्री दवणे