विस्थापितांचे भयानक वास्तव

    30-Jul-2022   
Total Views |

guatemala
 
 
काल-परवा घडलेली एक घटना. ग्वाटेमाला देशाच्या सीमेवरून मेक्सिकोकडे जाणारा तो ट्रक बंद होता. पण, त्यात क्षमतेपेक्षा जास्त वस्तू असाव्यात. कारण, तो ट्रक चालताना हलत होता. शेवटी ग्वाटेमालाच्या सीमेवर तैनात असलेल्या सीमारक्षकांना संशय आला. तसेही सीमापार जाणार्‍या बंद वाहनांची तपासणी करायचीच असते. मात्र, हा ट्रक सीमेवर थांबला आणि भराभर लोक ट्रकमधून उड्या मारून पळू लागले. मेक्सिको आणि ग्वाटेमाला देशाच्या सीमेवर असलेल्या घनदाट जंगलात लपले. ट्रकमधून उतरताना काही लोक पडले. त्यांना जखमा झाल्या, तर काही लोक ट्रकमध्येच अत्यवस्थ अवस्थेत होते. या जखमी आणि अत्यवस्थ लोकांना ग्वाटेमालाच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या छोट्या ट्रकमध्ये ९४ लोक गुराढोरांसारखे कोंडून बसले होते आणि ग्वाटेमाला देशातून मेक्सिकोच्या दिशेने जात होते. यातल्या ८४ लोकांना पकडण्यात ग्वाटेमालाच्या सैनिकांना यश मिळाले. या ८४ पैकी ५५ ग्वाटेमालाचेच नागरिक होते. यात वृद्धही होते आणि छोटी बालकही होती, तर बाजूच्या होंडूरास, इक्वाडोर, साल्वाडोर, नेपाळ आणि आपल्या देशाचेही दोन नागरिक होते. त्यांना वाटत होते की, अमेरिकेत गेले की त्यांची बेरोजगारी, गरिबीपासून सुटका होईल. संपन्नता त्यांच्या आयुष्यात पाणी भरेल. मजाच मजा, मुक्त आयुष्य जगता येईल.
 
 
ग्वाटेमाला, होंडूरास, इक्वाडोर या देशातले नागरिक तर सातत्याने विस्थापित होतच असतात. ग्वाटेमाला देश ज्वालामुखीच्या तोंडावरच वसलेला. भूकंप आणि ज्वालामुखीचा विस्फोेट यामुळे देश त्रस्त. कृषीआधारित असलेल्या या देशाच्या अर्थव्यवस्थेला पर्यावरणाच्या असमतोलामुळे उतरती कळा लागली. ज्वालामुखीच्या सातत्याने होणार्‍या विस्फोेटामुळे इथल्या जनतेच्या जगण्यावर प्रचंड ताण पडला. गरिबी आणि मृत्यूची भीती या सगळ्याचा परिणाम इथल्या महिलांवर आणि दुर्बलांवर होणारच.त्यामुळे गेल्या दहा वर्षांत ग्वाटेमालमधील लाखो मुलींनी विस्थापनाचा मार्ग पकडला. घरगुती हिंसा, लैंगिक शोषण याचा बळी होण्यापासून वाचण्यासाठी त्यांनी देश सोडणे पसंत केले. पण, हे विस्थापन अवैध असल्यामुळे पुढे त्यांच्या आयुष्यात प्रश्नांशिवाय काहीच उरले नसणार, हे नक्की. होंडूरास या देशात तर एका दिवसाला १३ जणांची हत्या होतात. महिला अत्याचाराच्या घटना तर मिनटागणिक सुरूच असतात. या दोन्ही देशात मानवी गुन्हेगारीसोबतच पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. त्यामुळे पारंपरिक कृषी व्यवसाय नावापुरता उरला आहे. या देशातील ग्रामीण जनता जगण्यासाठी दाही दिशा शोधते. लोकांना आशा असते की, एकदा अमेरिकेला गेलो की झाले. या खोट्या आशेमुळे ग्वाटेमाल ते मेक्सिको सीमा रेषा पार करताना हजारोलोक मृत्युमुखी पडले आहेत. काही सैनिकी कारवाईत, काही आजारी पडून तर काही ग्वाटेमाला आणि मेक्सिको या दोन देशामध्ये सुचिआते नदी आहे.
 
 
दोन देशातीलजंगलामधील सीमा पार करण्याऐवजी काही लोक नदीमधून लपूनछपून पोहून मेक्सिकोत येण्याचा प्रयत्न करतात. पण, इतकी मोठी नदी पार करताना खूप कमी लोक जीवंत राहतात. तरीही जीवाची पर्वा न करता लोक जगण्यासाठी विस्थापन करत असतात. आयुष्य चांगले व्हावे, सुख मिळावे या इच्छेसाठी ते मृत्यूलाही कवटाळण्यास तयार होतात. काही महिन्यांपूर्वीची घटना. मेक्सिकोच्या सीमेवर एक वाहन अडवण्यात आले. बंद वाहनातून लोकांची किंवा पशूंची किंवा तत्सम अवैध वस्तूंची तस्करी होते, हे तर सगळ्यांनाच माहिती. पण, मेक्सिकोच्या सीमेवर येताच आणि सैनिकी कारवाई होण्याआधीच लोक वाहनाचा दरवाजा उघडून पळ काढतात. जंगलात पळून काही दिवस तिथे राहून पुन्हा प्रवास सुरू करतात. पण, यावेळी वाहन अडवले तरी कुणीही वाहनातून उडी मारली नाही. कारण, त्या बंद वाहनामध्ये दाटीवाटीने बसलेले ते ५३ लोक मृत होते. न जाणे कित्येक दिवस ते या बंद वाहनातून प्रवास करत होते. पण, गर्दीत श्वास गुदमरून आणि प्रचंड उकाड्याने होरपळून यातले काही लोक मेले आणि संसर्गाने आजारी पडून बाकीचेही मृत्युमुखी पडले. किती भयानक. विस्थापितांना घेऊन जाणारे वाहन केवळ मेक्सिकोच्या सीमेवरच थांबणार होते. काहीही झाले तरी ते इतरत्र कुठेही थांबणार नव्हते. तहान, भूक आणि इतर नैसर्गिक विधींसाठीही नाही. कल्पना करा काय अवस्था असेल, या विस्थापितांची सगळे जग हळहळले. विस्थापितांचा प्रश्न ऐरणीवर आला. पण, तरीही लोकांचे विस्थापन काही थांबत नाही.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.