ठाणे : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटला असून सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला मंजुरी दिल्याने ठाण्यात भाजपने जल्लोष करीत मिठाईचे वाटप केले. भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ. निरंजन डावखरे आणि आ. संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश सचिव संदीप लेले, कृष्णा भुजबळ तसेच ओबीसी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी जल्लोष केला. यावेळी आ. डावखरे यांनी, आघाडीला १५ महिने जमले नाही ते फडणवीस-शिंदे यांनी एक महिन्यात करून दाखवले, असा टोला लगावला.
मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्राला ओबीसी आरक्षण देण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले होते. त्यामुळे चहूबाजूने टीकेचे धनी व्हावे लागल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर खापर फोडले होते. मात्र, नुकत्याच विराजमान झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने ओबीसी आरक्षणासंबधी सर्व तांत्रिक बाबी न्यायालयात मांडून पूर्तता केली. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणावर मंजुरीची मोहोर उठवली. या निर्णयानंतर ठाण्यात भाजपच्या खोपट कार्यालयाबाहेर उत्साही जल्लोष करण्यात आला. यावेळी आ. निरंजन डावखरेंसह आ. संजय केळकर यांनी आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. १५ महिने केवळ ‘तारीख पे तारीख’ करणार्या ठाकरे सरकारच्या मनातच ओबीसींना आरक्षण मिळवून द्यायचे नव्हते, असे टीकास्त्र आ. केळकर यांनी सोडले.
हे म्हणजे, दुसर्याहच्या बाळाचे बारसे करण्यासारखे!
आघाडीला जे जमले नाही ते या सरकारने करून दाखवले, असे स्पष्ट करून आ. डावखरे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. फडणवीस-शिंदे सरकारमुळेच ओबीसी आरक्षण मिळाले असताना काही लोक फुकाचा जल्लोष करीत आहेत. हे म्हणजे, दुसर्यामच्या घरात जन्मलेल्या बाळाचे बारसे करण्यासारखे आहे, असा टोला आ. डावखरे यांनी यावेळी लगावला.