ठाणे : “पेट्रोलसह अन्य इंधन पदार्थांचा समावेश (वस्तू व सेवा कर) ‘जीएसटी’मध्ये करण्याची मागणी जोर धरीत आहे. ‘जीएसटी’ परिषदेच्या येत्या शुक्रवारी होणार्या बैठकीत इंधनाचा समावेश (पेट्रोलियम पदार्थ) वस्तू व सेवाकरात करावा, अशी विनंती ठाणे ‘स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन’च्या (टिसा) वतीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व ‘जीएसटी’ परिषदेकडे करण्यात आली आहे,” अशी माहिती ’टिसा‘चे प्रसिद्धीप्रमुख आशिष सिरसाट यांनी दिली.
इंधनाचा समावेश वस्तू व सेवा करात केल्यास महागाईवर बर्यापैकी ताबा मिळवता येईल. तसेच, लघुत्तम, लघु, मध्यम उद्योगांना स्पर्धात्मक दृष्टीने लाभ होईल, अशी खात्री ’टिसा‘ला वाटते. तसेच, स्पर्धात्मक स्तरावर फायदा होईल कारण की, सध्या अशा अनेक गोष्टीमध्ये पेट्रोलियम पदार्थ वापरले जातात. परंतु, इंधनाचा वस्तू सेवाकरात समावेश नसल्याने त्यांना ‘सेटऑफ’देखील मिळत नाही. त्यामुळे त्यांना लेव्हल प्लेयिंग ग्राऊंड मिळेल. अनेक उद्योगांना पेट्रोलियम पदार्थ त्यांचा कच्चा माल असतो. परंतु, ‘जीएसटी’त समावेश नसल्याने मोठा फटका बसतो, असे मत ’टिसा‘च्या अध्यक्षा सुजाता सोपारकर यांनी व्यक्त केले.