मुंबई(प्रतिनिधी): मुंबईतील गोरेगावच्या बिंबीसार नगरमध्ये असलेल्या महापालिकेच्या शाळेतून बुधवारी दि. २९ रोजी पाहटे एका नर बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या संपूर्ण बचाव कार्याला सुमारे तीन तास लागले. या बिबट्याला पकडून, त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी करून या बिबट्याला पुन्हा जंगलात सोडण्यात येणार आहे.
मंगळवारी दि २८च्या मध्यरात्री हा बिबट्या गेटवरून उडी मारताना शाळेच्या सुरक्षारक्षकाला दिसला. या सुरक्षारक्षकानी म्हणजेच प्रफुल मिठबावकर यांनी त्या बाथरूम कहा दरवाजा बंद करून घेतला. त्याने तत्काळ या बाबतची माहिती वन विभागाला दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जागेचा आढावा घेतला. बिबट्याला बाथरूम मध्ये शिरता आले, पान जागा छोटी असल्यामुळे बाहेर पडता आले नाही. ही शाळा पश्चिम द्रुतगती महामार्गापासून १००-२०० मीटर अंतरावर होती. जवळपास निवासी क्षेत्रात असल्याने या बिबट्याला शांतता पूर्वक वाचवणे गरजेचे होते.या साठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बिबट्या बचाव पथकाला बोलावण्यात आले. या पथकाने संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण करून, या बाथरूम भोवती जाळी लावण्याचे ठरवले. या नंतर दार्ट गनच्या सहाय्याने बिबट्याला बेशुद्ध करण्यात आले. नंतर, या बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले. बिबट्याची वैद्यकीय तपसणी केली जाणार आहे. यामध्ये या बिबट्याच्या शरीरात मायक्रोचिप आहे की नाही याची देखील तपासणी केली जाईल. दोन वर्षांपूर्वी, हाच बिबट्या येऊर येथे अशक्त अवस्थेत आढळला होता. त्यावेळी वन विभागाने त्याला पकडून त्याच्यावर उपचार करून पुन्हा येऊर याठिकाणीच सोडले होते. काही दिवसांपूर्वी या बिबट्याचे छायाचित्र मानपाडा परिसरात मिळाले होते. परंतु, हा बिबट्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे जंगल पार करत गोरेगाव येथे पोहोचला.
ही कारवाई उप वनसंरक्षक संतोष सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये सहाय्यक वनसंरक्षक गिरीजा देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बरबडे, वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश भोईर, एसजीएनपी बिबट्या बचाव पथक, पशुवैद्यक डॉ. शैलेश पेठे आणि वन्यजीव वॉर्डन रोहित मोहिते, वन्यजीव वॉर्डन पवन शर्मा यांचा सहभाग होता.