अग्निपथ : केंद्र सरकारची युवा संजीवक योजना

    18-Jun-2022
Total Views | 72
military
 
 
 
सध्या ‘अग्निपथ’ या सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या योजनेबाबत बरीच उलटसुलट चर्चा, देशातील काही ठिकाणी हिंसक आंदोलनं सुरु आहेत. तसेच सर्व माध्यमांवर याच विषयाची चर्चादेखील आहे. चार वर्षांनंतर या योजनेत सहभागी झालेल्या युवकांचे पुढे भविष्य काय? एवढ्या मोठ्या प्रमाणावर युवकांची भरती झाली, तर सैन्यदलाच्या गुणवत्तेचं काय? चार वर्ष पूर्ण झाल्यावर अनेक बेरोजगार निर्माण होतील वगैरे वगैरे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले गेले. परंतु, एक नागरिक या नात्याने या योजनेचा अभ्यास करून मूल्यमापन करण्याचा मी प्रयत्न केला, तेव्हा निर्माण योजनेवर टीका करून आंदोलनं करण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोनातून या योजनेकडे पाहिल्यास आपल्या सर्वच प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळतात आणि ही योजना भारतीय युवकांच्या दृष्टीने किती उपयुक्त आणि समाजाच्या दृष्टीने बहुगुणी ठरू शकते याचा उलगडा होऊ शकेल. त्याविषयी सविस्तर....
 
सेनेच्या सर्व भरतीच्या जागांवर अग्निवीरांनाच घेतले जाईल का?
 
नाही, सेनेची इतर सर्व भरतीची प्रक्रिया आहे तशीच चालू राहील. हा फक्त १८ वर्षांच्या युवकांसाठी चार वर्षे काळासाठी दिलेला एक पर्याय आहे. छऊअ, जढअ करून सैन्यात अधिकारी बनू शकता. अग्निवीर हा सैन्यदलात सैनिक म्हणून प्रवेशाचा एक नवीन विकल्प आहे.
 
सैन्य दलात भरती करताना जे मापदंड शारीरिक व वैद्यकीय, मानसिक इ. ‘अग्निपथ’साठी पण असतील का?
 
हो, हे सर्व मापदंड ‘अग्निवीर’ भरतीसाठी बंधनकारक असतील.
 
योजनेत सहभागी झालेल्या युवकांचे चार वर्षांच्या सेवेनंतर काय?
 
जे युवक या योजनेसाठी निवडले जातील, त्यांची चार वर्षांच्या शेवटी एक परीक्षा घेतली जाईल आणि शिवाय त्यांचा चार वर्षांच्या कामगिरीचा विचार करून त्यांच्या गुणवत्तेनुसार २५ टक्के युवकांना सैन्याच्या नोकरीत कायम स्वरुपी सामावून घेतले जाईल. यामुळे सैन्यात नोकरी मिळवण्यासाठी युवकांना आणखी एक मार्ग खुला होईल. बाकीच्यांना एकरकमी अनुदान मिळेल ज्याचा उपयोग होऊ शकेल.
 
 
 
भारतीय सेनेला अशा योजनेची गरज आहे का?
 
नवीन जागतिक बदलत्या परिस्थतीनुसार निर्माण होणारी आव्हाने, नवीन तयार होणारी जागतिक पातळीवरीलराजकीय, आर्थिक, भौगोलिक, सामाजिक समीकरणामुळे, पर्यावरणातील बदल यामुळे निर्माण होणार्‍या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सैन्य दलातून चार वर्षे प्रशिक्षण घेतलेल्या युवाशक्तीचा खूप मोठा उपयोग होईल. तसेच, आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी एक प्रशिक्षित समाज तयार होईल.तसेच, ही योजना कोणत्याही विशिष्ट धर्मातील युवकांसाठी नाही. जो चार वर्षांत उत्तम कामगिरी करेल आणि गुणवत्ता दाखवेल त्या कोणत्याही धर्मातील युवकांसाठी ही योजना आहे.
 
 
चार वर्षांनंतर सरकार मुलांना वार्‍यावर सोडणार का?
 
तर अजिबात नाही, आपण याकडे एक वेगळा शैक्षणिक अभ्यासक्रम म्हणून पाहिले पाहिजे. आजसुद्धा अनेक विद्यार्थी शासनाचे किंवा स्वतःचे लाखो रुपये खर्च करून अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांना चांगल्या पगाराच्या नोकर्‍या सर्वांनाच मिळतात असे नाही. पण, या योजनेत सहभागी झालेल्या युवकांना सैनिकी विशेष प्रशिक्षणाबरोबरत्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षणही करून घेतले जाणार आहे. त्यामुळे २५ टक्क्यांमध्ये निवड होण्याची संधी मिळाली नाही, तरी नुकसान नाही. पदवी आणि चार वर्षांनी मिळणारे आर्थिक अनुदान, सैनिकी प्रशिक्षणामुळेपुढील नोकरी किंवा उद्योगासाठी निर्माण होणारी विशेष पात्रता या गोष्टी मिळणारच आहेत. ज्याचा उपयोग त्यांच्या नोकरी किंवा स्वयंरोजगार यातील संधीचा उपयोग करून घेण्यासाठी होईल.
चार वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करून परत आलेल्यांना कोणता विशेष लाभ होणार?
 
राज्यातील पोलीस भरती, केंद्रीय पोलीस दल किंवा समांतर सैनिकी दलातील भरतीसाठी या प्रशिक्षित विद्यार्थ्यांचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे.
 
 
अग्निवीर अन्य प्रशिक्षित सैनिक जसे लढतात तितक्याच दृढ निश्चयाने आणि निष्ठेने शत्रूचा मुकाबला करू शकतील का?
 
याबद्दल शंका घेणे म्हणजे आपल्या सैन्यदलाच्या प्रशिक्षण क्षमतेवर आणि धोरणात्मक निर्णयक्षमतेवर शंका घेण्यासारखे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, ही योजना फक्त सैनिकांसाठी आहे. सैन्यातील अधिकारी निवडण्यासाठी नाही. आपला सैनिक एक ते दीड वर्षांचा प्रशिक्षण अभ्यास पूर्ण करून सर्व सैनिक पूर्ण क्षमतेने शत्रूसमोर उभे राहतात आणि प्रत्येकाच्या व्यक्तिगत क्षमतेनुसार कामाचे स्वरूप ठरवले जाते. तसेच, सैन्यात सीमेवर प्रत्यक्ष लढण्याच्याबरोबरच अनेक महत्त्वाची पूरक कामे ही असतात त्यासाठी या अग्निवीरांचा प्रभावी उपयोग केला जाईल.
 
‘अग्निपथ’ योजनेचा सर्वंकष साधकबाधक विचार केला आहे का?
 
या योजनेसाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या समितीच्या सर्वंकष अभ्यासपूर्ण अहवालानंतर साधकबाधक चर्चा घडवूनच योजना जाहीर करण्यात आलेली आहे. त्याची पार्श्वभूमी अशी की, माजी संरक्षणमंत्रीमनोहर पर्रिकर यांनी सैन्यदलात काही सुधारणा करण्यासाठी सेवानिवृत्त ले. जन. डॉ. डी. बी. शेकटकर यांची एक समिती नेमली होती. या समितीने असे म्हंटले होते की, केवळ सैन्याची फुगलेली किंवा जास्त संख्या कार्यक्षम आणि परिणामकारक कामगिरी करू शकते असे नाही, तर तरुण आणि चपळ, चुस्त, सैन्य अधिक परिणामकारक आणि अपेक्षित कामगिरी करू शकते. म्हणून सैन्यात काही ठरावीक काळासाठी तरुणांची भरती केली पाहिजे आणि त्यांना प्रशिक्षित केले पाहिजे. त्या प्रशिक्षणाचा व त्याद्वारे मिळालेल्या विविध कौशल्याचा वापर करून ते आपल्या खासगी-नागरी आयुष्यात नोकरी, उद्योग, व्यवसाय करू शकतात.
 
 
अशा प्रकारची योजना यापूर्वी भारतीय सैन्य दलात होती काय? की हा पहिलाच प्रयोग आहे?
हो, भारतीय सैन्यदलात या प्रकारची योजना अधिकरी वर्गासाठी आजही आहे. जी ‘शॉर्ट कमिशन’ नावाने ओळखली जाते. या योजनेत सैन्य अधिकारी म्हणून ‘शॉर्ट कमिशन’साठी उमेदवारांची निवड केली जाते. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी सैनिकी प्रशिक्षण संस्थांमध्ये नऊ महिने ते दीड वर्षांपर्यंत प्रशिक्षण दिले जाते. ७, १४, ते २० वर्षांपर्यंत नोकरी करून परत ते घरी जातात आणि पेन्शन व मिळालेल्या पैशाचा, अनुभवाचा चांगला उपयोग करून व्यवसाय-नोकरी करतात व त्यांना अनेक क्षेत्रात चांगली मागणीही असते. तसाच फायदा ‘अग्निपथ’ योजनेमुळे असंख्य मुलांना मिळेल यात शंका नाही.
 
हा चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर अग्निवीरांना काय मिळेल?
१) मातृभूमीची सेवा करण्याची संधी आणि समाधान.
 
२) २२ लक्ष रुपये अभ्यासक्रम पूर्ण करून घरी येताना.
 
३) निवड झाल्यास कायमस्वरूपी सैन्यदलात नोकरी करण्याची संधी, उत्तम पगार, सर्व प्रकारच्या सवलती, पेन्शन, वैद्यकीय सुविधा. अनेक फायदे.
 
४) निवड न झाल्यास अर्ध सैनिक दले, राज्याची पोलीसदल, अशा अनेक ठिकाणी प्राधान्याने नोकरीचीसंधी.
 
५) मिळालेल्या २२ लाखांत स्वतःचा स्वयंरोजगार, शेतीचा असल्यास त्याचा विकास, छोटा मोठा, उद्योग करण्याची संधी. प्रशिक्षित अग्निवीर असल्याने खासगी उद्योगात विविध प्रकारच्या नोकरीची संधी. इ. अनेक.
 
‘अग्निपथ’ योजनेचे सामाजिक फायदे
 
१) बेरोजगारी कमी होईल. तरुणांना काम मिळेल. पदवीचे शिक्षण पूर्ण होईल.
 
२) समाजातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल.
 
३) शिस्तप्रिय प्रशिक्षित तरुणांची समाजातील संख्या वाढेल.
 
४) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ‘अग्निपथ’ योजनेतून मिळालेले पैसे शेती विकास व उद्योगासाठी वापरतायेतील. बीज भांडवल उपलब्ध होईल. ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मदत होईल. शेतकर्‍यांच्या आत्महत्या कमी होतील.
 
५) प्रशिक्षित आणि शिस्तप्रिय समाजनिर्मितीस सुरुवात होईल.
 
६) वाम मार्गाला जाणार्‍या तरुणांची संख्या कमी होईल. गुन्हेगारीचे प्रमाण घटेल. अशाप्रकारे अतिशय बहुगुणी आणि उपयुक्त अशी अग्निपथ योजना आहे. त्याकडे तरुणांनी सकारात्मक दृष्टीने पाहावे. त्यात राजकारण आणू नये. अफवा फसरवणारे आणि बुद्धिभेद करणार्‍या राष्ट्रविरोधी घटकांपासून दूर राहावे आणि या ‘अग्निपथ’योजनेमध्ये सहभागी होऊन ‘अग्निवीर’ होण्याची संधी सोडू नये. राजकीय हेतूने तरुणांची डोकी भडकविणार्‍यांपासूनदूर राहावे. तसेच, योजनेचा अभ्यास करून त्यात काही सुधारणा सुचवायची असल्यास केंद्र सरकार आणि गृहखाते त्याचे स्वागतच करणारे आहे, याचीही नोंद घ्यावी व भारताला बलशाली बनवण्याच्या या प्रक्रियेत सक्रिय सहभागी व्हावे, असे तरुणांना आवाहन आहे.
 
- डॉ. दिलीप बेलगावकर

(लेखक सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, भोंसला, नाशिकचे सरकार्यवाह आहेत.)
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121