योगशास्त्र हे एक प्राचीन भारतीय आध्यात्मिक शास्त्र आहे. योगशास्त्रामध्ये योगाचे अंतिम उद्दिष्ट समाधी, मोक्षाचे वर्णन केले आहे. तसेच, या अंतिम उद्दिष्टाची प्राप्ती करण्यासाठी अनेक मार्गांचे वर्णनदेखील आहे. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, हठयोग, अष्टांगयोग, मंत्रयोग, राजयोग इत्यादी. यामधील अंतिम शब्द योगावरील उद्दिष्ट दर्शवितो. अगोदरचा शब्द कोणत्या मार्गाने ते उद्दिष्ट प्राप्त करायचे, तो मार्ग दर्शवितो. ज्याला जो मार्ग जमेल, सोपा आणि योग्य वाटेल, त्याला तो मार्ग अंतिम उद्दिष्टप्राप्तीसाठी साधन म्हणून वापरता येतो.
कर्मयोगामधील ‘योग’ हा शब्द ‘युज्’ धातूपासून तयार झाला आहे. ‘युज्’चा अर्थ आहे जोडणे, संयोग करणे, शरीर-मन, मन-आत्मा, आत्मा-परमात्मा यांची जोडणी म्हणजेच योग. भगवद्गीतेमध्ये ‘समत्वं योग उच्यते’ (२.४८) असे सांगितले आहे. मनाचे संतुलन म्हणजे योग. सुख-दु:ख, यश-अपयश, आशा- निराशा, क्रोध या सर्व भावनांच्या आहारी न जाता कोणत्याही प्रसंगी मनाची संतुलित अवल्या कायम ठेवणे, थोडक्यात मनाची स्थितप्रज्ञ अवस्था कायम ठेवणे, याला ‘योग’ म्हणतात.
कर्मशब्द ‘क्र’ धातूपासून तयार झाला आहे. ज्याचा अर्थ आहे, क्रिया करणे. साध्या, सरळ, सोप्या भाषेत सांगायचे म्हटले, तर आपण जे काही काम (क्रिया) करतो, त्याला ‘कर्म’ असे म्हणतात. आपण आपल्या रोजच्या कर्मातून ही योगच्या अंतिम उद्दिष्टाची प्राप्ती करू शकतो. त्यालाच ‘कर्मयोग’ असे म्हणतात. आपण आपल्या आजूबाजूला जर बघितले, तर असे लक्षात येते की, प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी, आवडनिवड ही वेगळी असते. त्यामुळे सर्वांनाच एका जागेवर बसून प्रत्याहार, धारणा, ध्यान जमेल, असे नाही. तसेच आज धावपळीच्या जीवनात बर्याचदा वेळेअभावी लोकांना आसन किंवा प्राणायमदेखील जमत नाही. मग प्रश्न असा येतो की, अशा लोकांना योग साध्य होणार का? तर उत्तर असे आहे की, त्यांचा कामांतून ते योग साध्य करू शकतात. योगमार्गावर त्यांची वाटचाल होऊ शकते. कर्मातून योग कसे साध्य करायचे याचे अतिशय सुंदर वर्णन श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये केले आहे.
श्रीकृष्णांनी सांगितले-
कर्मण्येऽवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संड्गोऽ स्त्वकर्माणि(२/४७)
कर्म करीत जावे, पण फळाची अपेक्षा करु नये. कर्मे करावीत, पण कर्तेपणाचा अभिमान धरू नये. अर्थात, आपण जर आपल्या रोजच्या जीवनातील सर्व कामे एकाग्रतेने समरसतेने, मन लावून फळाची अपेक्षा न ठेवता केली, तर कर्म करताना आनंद तर मिळतोच आणि आपल्याला त्या कर्माचा त्रासदेखील होत नाही. त्यामुळे मन शांत व स्थिर होते. पण, फळाची अपेक्षा न करता कर्म करणे, हे आपल्यासाठी सोपं नाही. मनात फळाची अपेक्षा येतेच, मग या परिस्थितीमध्ये सतत फळाचा विचार न करता, मनाला फळावर एकाग्र न करता कर्मावर एकाग्र करावे. जेणेकरून मन शांत व संतुलित होते. त्यामुळे मनात सुख, दु:ख, भय, क्रोध, मोह, लोभ अशा भावना उत्पन्न होत नाही. मनात येणारे विचार कमी होतात. शरीर-मन जोडले जाते आणि योगउद्दिष्टाच्या पहिल्या पायरीकडे आपली वाटचाल होते! अशा प्रकारची (निष्काम) कर्म करण्यासाठी कायम वर्तमान काळात जगणे आवश्यक आहे.
भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात -
सुखदुःख समे कृत्वा लाभालाभो जयाजयो।
ततो युद्धाय युज्यस्त नैवं पापमवाप्स्यापि॥
अर्थात, सुख-दु:ख, हानी-लाभ, जय-पराजयाचा विचार न करता कर्म करा. आपण बर्याचदा वर्तमानकाळात न जगता भूतकाळ किंवा भविष्यकाळात जगतो. आपले मन त्यातच रमते. आपली ज्ञानेन्द्रिये कायम वर्तमानकाळातच असतात, पण मन हे चंचल असल्यामुळे भूतकाळ-भविष्यकाळात फिरत असते. भूतकाळामध्ये अनुभवलेल्या सुख-दु:खाचा हानी-लाभ, यश-अपयशाचा परिणाम वर्तमानकाळात करणार्या कामावर होतो. त्यामुळे वर्तमान कामे करताना मनामध्ये चिंता, भीती, निराशा इत्यादी उत्पन्न होतो. त्यामुळे मन, अशांत व अस्थिर होते आणि मनाला एकाग्र करणे कठीण जाते म्हणून मनाला शांत, स्थिर, संतुलित ठेवण्याकरिता कर्मावर एकाग्र करण्याकरिता सतत वर्तमानकाळात, वर्तमान क्षणात जगणे आवश्यक आहे.!
अशा प्रकारे अनेक वर्षे सातत्यांनी आपण जर का कर्म केले तर आपल्याला कर्मामध्ये कुशलता प्राप्त होते. ‘योग: कर्मसु कौशलम्।’ (भगवद्गीता २.५०) कर्मामध्ये कुशलता म्हणजेच योग. अशा प्रकारे कर्माद्वारे योग साधला जातो आणि साधकाची अध्यात्ममार्गावर पुढे वाटचाल होते.सीमा तापीकर