ठाणे : “पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील १३० कोटी जनतेच्या स्वप्नाचे सामर्थ्य असलेले नेता आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या आठ वर्षांच्या कालावधीत एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही. हेच त्यांच्या सरकारचे फलित आहे,” असे गौरवोद्गार केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद व केंद्र सरकारला आठ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण अंतर्गत भाजप ओबीसी मोर्चा, ठाणे शहर यांच्यावतीने नुकतेच कळवा येथे ओबीसी कल्याण संमेलन आयोजित करण्यात आले होते.
त्यावेळी पाटील बोलत होते. यावेळी भाजपचे कळवा पूर्व मंडलचे उपाध्यक्ष अॅड. दीनानाथ पांडे व अॅड. सुदर्शन साळवी यांनी कपिल पाटील यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे, आ. संजय केळकर, प्रदेश सचिव संदीप लेले, प्रदेश उपाध्यक्षा माधवी नाईक आणि नगरसेवक, भाजप पदाधिकारी व ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘राज्य सरकारच्या अपयशामुळेच ओबीसी समाजाला आरक्षण नाही’
“राज्य सरकारचा अपयशामुळेच ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले नाही. याला सर्वस्वी महाविकास आघाडी जबाबदार आहे. ओबीसीवर अन्याय झाला असून, जर राज्य सरकारने योग्य ती बाजू न्यायालयात मांडली, तर पुढचा निर्णय होणार आहे. तसेच, ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे,” अशी भूमिकाही कपिल पाटील यांनी यावेळी मांडली.