नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये परिसीमनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आयोगाने तो अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे. या परिसीमनानंतर प्रदेशातील राजकीय परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलणार असून जम्मू- काश्मीरमध्येही प्रथमच हिंदू मुख्यमंत्री होण्याची शक्यता बळावली आहे.
जम्मू-काश्मीरचे परिसीमन करून विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्यात येईल, असे केंद्र सरकारने वेळोवेळी स्पष्ट केले होते. त्यानुसार त्यातील पहिला म्हणजे परिसीमनाचा टप्पा आता पूर्ण झाला आहे. आता या परिसीमनामुळे जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच हिंदू मुख्यमंत्री होण्याची शक्यता आता बळावली आहे. अंतिम परिसीमन आदेशानुसार, ‘परिसीमन कायदा, २००२ च्या कलम ९ (१)(अ)’ च्या तरतुदी लक्षात घेऊन, प्रदेशातील ९० विधानसभा मतदारसंघांपैकी ४३ जम्मू क्षेत्राचा भाग असतील आणि ४७ काश्मीरसाठी असतील. जम्मू प्रदेशातील सहा नवीन विधानसभा मतदारसंघ राजौरी, डोडा, उधमपूर, किश्तवाड, कठुआ आणि सांबा जिल्ह्यांमधून तयार केले जातील, तर कुपवाडा जिल्ह्यातून काश्मीर खोर्यासाठी नवीन जागा निर्माण होण्याचीही शक्यता आहे. यामध्ये प्रथमच क्षेत्रफळाने अधिक असलेल्या जम्मूला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रथमच नऊ विधानसभा मतदारसंघ (एसटी) अनुसूचित जमातींसाठी राखीव करण्यात आले आहेत, त्यापैकी सहा जम्मू प्रदेशात आणि तीन काश्मीरमध्ये आहेत.
असे बदलणार समीकरण
परिसीमन आयोगाच्या शिफारशींनुसार, आता जम्मूमधील ४४ टक्के लोकसंख्या ४८टक्के जागांवर मतदान करेल, तर काश्मीरमध्ये राहणारे ५६ टक्के लोक उर्वरित ५२ टक्के जागांवर मतदान करतील. नवीन परिसीमनांतर्गत, जम्मूमधील सहा नवीन जागांपैकी चार जागा या हिंदूबहुल आहेत. तसेच दोडा आणि किश्तवार जिल्ह्यांचा समावेश असलेल्या चिनाब प्रदेशातीलदोन नवीन जागांमधील पाडर मतदारसंघामध्ये मुस्लीम अल्पसंख्याक आहेत. दुसरीकडे काश्मीरमधील एक नवीन जागा ‘पीपल्स कॉन्फरन्स’चा बालेकिल्ला असलेल्या कुपवाडामध्ये आहे. ‘पीपल्स कॉन्फरन्स’ हा भाजपचा निकटवर्तीय पक्ष मानला जातो. त्याचप्रमाणे दोन नामनिर्देशित काश्मिरी पंडित सदस्य, ही परिस्थिती पाहता, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने जम्मू भागातील बहुतांश मतदारसंघांमध्ये विजय मिळवला आणि काश्मीरमध्ये मित्रपक्षांचा विजय झाला, तर अजिबात अशक्य नसल्याचे स्पष्ट होते.
भाजपचे वाढते संघटन ठरणार निर्णायक
जम्मू-काश्मीर, भाजपची महत्त्वाची जबाबदारी असणार्या नेत्याने प्रदेशात भाजपचे संघटन मजबूत होण्यास सुमारे दहा ते १२ वर्षांपूर्वीच प्रारंभ झाल्याचे सांगितले. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यास विशेष गती मिळाली. भाजपने यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत २५ जागा मिळवून काही काळ सरकारमध्येही सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीत (ग्रामपंचायत, ब्लॉक विकास परिषद, जिल्हा विकास परिषद) भाजपने पीर-पंजाल, काश्मीर खोरे, पूंछ राजौरी, जम्मू अशा प्रदेशाच्या सर्व विभागांमध्ये उमेदवार उभे केले आणि विजय मिळविला आहे. प्रदेशात सर्वत्र उमेदवार देणे, हे काश्मीरच्या कथित हितांसाठी काम करण्याचा दावा करणार्या ‘नॅशनल कॉन्फरन्स’ आणि ‘पीडीपी’लाही जमले नव्हते. या निवडणुकीमध्ये भाजपने घराणेशाहीच्या पक्षांच्या जाळ्यातून काश्मिरी जनतेस बाहेर काढून त्यांना शासन-प्रशासनात सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही प्रदेशात सर्वत्र उमेदवार देऊन ते निवडून आणण्याची भाजपची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.