ब्रिटिश रॉयल नेव्हीमध्ये धर्मगुरू म्हणून प्रथमच हिंदू व्यक्ती; हिमाचल प्रदेशातील 'भानू अत्री' यांची निवड

    17-Aug-2025
Total Views |

मुंबई : भारताच्या अनेक सुपुत्रांनी परदेशात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करून देशाला गौरव मिळवून दिला आहे. यामध्येच आता एक नविन उदाहरण समोर आले. हिमाचल प्रदेशातील गडखल (कसौली) येथील भानू अत्री यांची ब्रिटिश रॉयल नेव्हीने पहिले हिंदू धर्मगुरू म्हणून नियुक्ती केली. भानू अत्री ब्रिटिश रॉयल नेव्हीमधील पहिले गैर-ख्रिश्चन धर्मगुरू झालेत.

३९ वर्षीय अत्री यांनी इतर विद्यार्थ्यांपेक्षा थोडा वेगळा अभ्यासक्रम निवडला आहे. त्यांनी अधिकारी प्रशिक्षण, समुद्री जीवन रक्षा आणि धर्मगुरू प्रशिक्षण यासह एक विशेष प्रशिक्षण घेतले. नवीन १४८ रॉयल नेव्ही अधिकाऱ्यांमध्ये दोन धर्मगुरू आहेत.

सप्टेंबर १९८६ मध्ये जन्मलेल्या भानू अत्री यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण नलवा येथील सरस्वती निकेतन वरिष्ठ माध्यमिक विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सोलन येथील संस्कृत महाविद्यालयातून 'शास्त्री'चे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर दिल्ली येथून ज्योतिषाचार्य ही पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी धार्मिक विधी करण्यास सुरुवात केली. २००९ मध्ये ते लंडनला गेले आणि पुजारी म्हणून काम करू लागले.