ठाण्यात सुनील देवधर यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राजकीय संघर्ष’ यावर व्याख्यान
ठाणे : हिंदू संघटनासाठी आणि बलवान हिंदूराष्ट्र उभे राहण्याच्या ध्येयाने कार्यरत राहिलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि ठाणे भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २८ मे रोजी गडकरी रंगायतनमध्ये स्वा. सावरकर यांच्यावरील ‘कालजयी सावरकर’ या पुरवणीचा प्रकाशन सोहळा आणि व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राजकीय संघर्ष’ या विषयावर व्याख्यान होणार असून, प्रख्यात नृत्यांगना सोनिया परचुरे यांच्याकडून नृत्याविष्कार सादर केला जाणार आहे.
या कार्यक्रमाला नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांनी केले आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साकारलेल्या ‘कालजयी सावरकर’ या विशेष पुरवणीत सावरकरांचा जीवनपट उलगडला आहे. स्वातंत्र्यचळवळीत ब्रिटिशांशी संघर्षाबरोबरच सावरकरांना जीवनात राजकीय संघर्षालाही सामोरे जावे लागले होते. त्यावर भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्याकडून व्याख्यान दिले जाईल.
सावरकरांच्या प्रार्थनीय साहित्यसागराला वाहिलेला ‘स्वातंत्र्यसूर्य’ हा नृत्याविष्कार प्रख्यात नृत्यांगना सोनिया परचुरे यांच्याकडून सादर केला जाईल. या कार्यक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संपूर्ण जीवनप्रवास रसिकांना अनुभवयास मिळणार आहे. गडकरी रंगायतनमध्ये शनिवारी सकाळी १०.३० वाजता कार्यक्रम होणार आहे. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
स्वा. सावरकरांचे विचार दिशादर्शक
भाजप आमदार संजय केळकर या कार्यक्रमाबाबत म्हणाले की, “आजच्या काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर व्यक्तिमत्त्व दिशादर्शक आहे किंबहुना, हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व याबद्दलचे सावरकरांचे विचार निश्चितपणे पुढील वाटचालीसाठी उपयुक्त ठरणारे आहेत. सावरकरप्रेमी सुनील देवधर हे अभ्यासू आणि प्रभावी वक्ते असल्याने त्यांच्या व्याख्यानाला ठाणेकरांनी आवर्जून उपस्थित राहावे.
स्वा. सावरकरांची जयंती हिंदू सणाप्रमाणेच साजरी व्हावी...
भाजप ठाणे शहर सांस्कृतिक प्रकोष्ठचे संयोजक बाप्पा राऊत म्हणाले की, “सावरकरांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांच्या अष्टपैलू गुणांचा वापर करून देशभरात देशभक्तीची ज्वलंत आग निर्माण करण्याचे काम केले. सावरकरांचे हेच साहित्यधन आजही समाजमनावर तितकेच प्रभावी ठरत आहे. याकरिता सावरकर जयंतीचे औचित्य साधुन ’कालजयी सावरकर’ ही सावरकरांवर आधारित पुरवणी तसेच व्याख्यान आणि नृत्याविष्कार असे सावरकरांच्या साहित्यावर प्रकाश टाकणारे कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत.
‘स्वातंत्र्यसूर्य’ हे आव्हान
नृत्यांगना सोनिया परचुरे म्हणाल्या की, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारखा विषय नृत्यातून मांडणे हे खरे तर आव्हानात्मक आहे. ‘स्वातंत्र्यसूर्य’ या कार्यक्रमातून सावरकरांच्या ज्वलंत काव्यावर नृत्य करण्याची संधी ‘शरयु नृत्य कलामंदिर’ला मिळाली. हे आमचे अहोभाग्य! यासाठी आयोजकांचे आभार!”
‘कालजयी सावरकर’ अनुभवण्याची संधी
सावरकरांचे साहित्य, त्यांची अस्सीम राष्ट्रभक्ती, प्रतिभासंपन्न कवने तसेच सावरकरांच्या जीवनातील उच्च कोटींच्या घटनांची इत्यंभूत माहिती असणारे ‘कालजयी सावरकर’ अनुभवण्याची संधी सावरकरप्रेमी ठाणेकरांना यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे.
- आ. निरंजन डावखरे, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष
नाशिकमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून होणार स्वातंत्र्यसूर्याचा कार्यगौरव
नाशिक : ‘मुंबई तरुण भारत’ व ‘लघु उद्योग भारती, नाशिक’ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वा. वि. दा. सावरकर यांच्या जयंतीच्या औचित्याने रविवार, दि. २९ मे रोजी संध्याकाळी ठीक ४ वाजता स्वातंत्र्यसूर्य सावरकर यांचा जीवनगौरव करणारे व त्यांच्या सर्वांगीण कार्याचा मागोवा घेणारे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या जु. स. रुंग्ठा हायस्कूलचे सभागृह, अशोक स्तंभ, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार हभप वैजयंती सिन्नरकर या कीर्तन सादर करणार असून ‘मारू अथवा मरू...’ या समर्थ रामदास स्वामी लिखित अभंगाचा दाखला घेत त्या स्वा. सावरकर यांचा जीवनपट उलगडणार आहेत. तसेच, यावेळी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे प्रकाशित ’कालजयी सावरकर’ या विशेषांकाचे प्रकाशन अंकाचे अतिथी संपादक अक्षय जोग व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी, या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार व ‘लघु उद्योग भारती, नाशिक’चे अध्यक्ष विवेक कुलकर्णी, कार्यवाह निखील तापडिया, उपाध्यक्ष मिलिंद देशपांडे, योगेश बहाळकर, खजिनदार धनलक्ष्मी पटवर्धन, कार्यकारिणी सदस्य वीणा माजगावकर, योगेश जोशी, सुप्रिया देवघरे, वामन भानोसे, सुजाता बच्छाव, प्रशांत कुलकर्णी, अविनाश मराठे आदींसह लघु उद्योग भारती, नाशिकचे सर्व कार्यकारिणी सदस्य व संलग्न उद्योजक यांनी केले आहे.
भगूर स्मारकातही अभिवादन
दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने ‘कालजयी सावरकर’ या विशेषांकाच्या प्रती भगूर येथील स्वा. सावरकर स्मारकात स्वा. वि. दा. सावरकर यांच्या चरणी अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम दि. २८ मे रोजी सकाळी ९ वाजता भगूर येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांतचे अध्यक्ष तथा भगूर शिक्षण मंडळ, भगूरचे कार्याध्यक्ष एकनाथ शेटे, भगूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय करंजकर आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासदेखील उपस्थित राहण्याचे आवाहन दै. ‘मुंबई तरुण भारत’ व ‘लघु उद्योग भारती,नाशिक’च्यावतीने करण्यात आले आहे.
विरारमध्ये ‘सावरकर : एक झंझावात’ विषयावर व्याख्यान
विरार : शनिवार, दि. २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. स्वातंत्र्यवीरांच्या जयंतीचे औचित्य साधून दै. ‘मुंबई तरुण भारत’द्वारे दरवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित कालजयी सावरकर विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येते. यंदाही विविध ठिकाणी ‘कालजयी सावरकर’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. विरारमध्येही ‘कालजयी सावरकर’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार असून विशेषांक प्रकाशन कार्यक्रम विरारमधील ‘धीमही बँक्वेट हॉल’, पहिला माळा, बीएपीएस, स्वामी नारायण मंदिराजवळ, जुना विवा कॉलेज रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘कालजयी सावरकर’ विशेषांकाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वसई जिल्हा संघचालक नरेंद्र पितळे आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत जोशी यांच्या हस्ते रविवार, दि. २९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात येणार आहे. यावेळी प्रख्यात वक्ते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे ‘सावरकर : एक झंझावात’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून करण्यात आले आहे.