मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सुरू असलेल्या चर्चा, आरोप - प्रत्यारोप आणि वाद - प्रतिवादांना अखेर बुधवार, दि. २५ मे रोजी जवळपास पूर्णविराम लागल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार आणि छत्रपती घराण्याचे वंशज असलेल्या छत्रपती संभाजीराजेंच्या अपक्ष निवडणूक लढविण्याच्या घोषणेमुळे राज्यात नवी चर्चा सुरू झाली होती.
सर्वपक्षीय राजेंना पाठिंबा देणार का, महाविकास आघाडी (मविआ) आपला चौथा उमेदवार रिंगणात न उतरवता आपली शिल्लक मते राजेंच्या पारड्यात टाकणार का, की राजे भाजपच्या पाठिंब्यावर राजसभेत जाणार, याकडे सर्वांच्या नजरा खिळलेल्या होत्या. मात्र, बुधवारी शिवसेनेने आपला दुसरा म्हणजेच मविआचा चौथा उमेदवार जाहीर करून संभाजीराजेंच्या राज्यसभेची आशा जवळपास मावळून टाकली आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे संभाजीराजेंची राज्यसभा दूरच राहण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे.
आता राज्यसभा नव्हे, तर संपूर्ण राज्यच!
मविआने छत्रपती संभाजीराजेंच्या बाबतीत घेतलेल्या भूमिकेमुळे संभाजीराजेंचे समर्थक आता आक्रमक झाले असून, राजेंच्या समर्थनार्थ त्यांनी बॅनरबाजी करायला सुरुवात केली आहे. संभाजीराजे समर्थकांनी एक पोस्टर समाजमाध्यमावर ‘व्हायरल’ केले आहे. त्या पोस्टरमध्ये ’आता राज्यसभा नव्हे, तर संपूर्ण राज्यच घेणार. इतिहासाची पुनरावृत्ती, महाराष्ट्रात स्वराज्याची निर्मिती, लक्ष २०२४,’ असा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे.