ऑस्टिन: अमेरिकेच्या टेक्सास राज्यात मंगळवारी (२४ मे रोजी) दुपारी झालेल्या गोळीबारात १९ शाळकरी मुलांसह दोन जण ठार झाले. टेक्सासमधील युवाल्डे येथील रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये १८ वर्षीय तरुणाने गोळीबार केला. या हल्ल्यात १३ मुलांसह शाळेचे कर्मचारी आणि पोलिसही जखमी झाले आहेत. मात्र, पोलिसांनी हल्लेखोराला ठार केले.
या घटनेनंतर अमेरिकन पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. जखमी मुलांच्या आरोग्यासाठी अनेक पालक प्रार्थना करत आहेत. एलिमेंटरी स्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलाची आई म्हणते की, ती आपल्या मुलाला पुन्हा कधीही अमेरिकन शाळेत पाठवणार नाही.
एव्हलिनचा मुलगा तिसरीच्या वर्गात शिकत आहे. ती सांगते, "आम्हाला शाळेच्या ऑटोमेटेड अलर्ट सिस्टीमद्वारे गोळीबाराची माहिती मिळाली. माझे मूल जिवंत आहे की मेले हे मला माहीत नव्हते. विद्यार्थ्यांना पालकांशी भेटण्यासाठी युवाल्डे सिव्हिक सेंटरमध्ये नेण्यात आले. तेथे पालक एकत्र आले. माझं मुलं सुखरूप असावं यासाठी मी प्रार्थना करत होते. पोलीस एकावेळी एकाच व्यक्तीला आत प्रवेश देत होते. जेव्हा मी माझ्या मुलाला पाहिले तेव्हा तो रडत होता. तो खूप घाबरला होता."