स्पर्श : मानवी संवेदनांचा काव्यात्म आविष्कार

    21-May-2022
Total Views | 93

sparsh



कवितेच्या क्षेत्रात कवितेची शैली, आशय, प्रतिमा आणि प्रतीके तसेच कवितेतून हाताळलेले विषय याबाबत अनेक कवींनी वेगवेगळे प्रयोग केले आहेत. विविध विषयांवरील कवितांचे एकत्रित संग्रह, प्रातिनिधिक कवितासंग्रह, एकाच विषयावरील कविता आणि एकाच आशयाच्या विविध कविता असलेले कवितासंग्रह व दीर्घकविता यांची निर्मिती आजवर मोठ्या प्रमाणात झाली.



या पार्श्वभूमीवर कवीच्या कविता आणि त्या कवितांना अनुरूप असे शीर्षकाचे सुलेखन करून वेगळ्या परंतु आकर्षक स्वरूपात रसिकांसमोर आणण्याचा अद्वितीय प्रयोग कवी दीपक शेडगे यांच्या ’स्पर्श’ या कवितासंग्रहाच्या दुसर्‍या आवृत्तीद्वारे ‘अक्षरसंवेदना’ प्रकाशनाने केला आहे. या पुस्तकात कवी दीपक शेडगे यांच्या कविता आणि त्यांचे बंधू आणि प्रख्यात सुलेखनकार कमल शेडगे यांच्या सुलेखनकलेचा अनोखा मेळ रसिकांच्या मनावर उत्कृष्ट परिणाम साधून जातो. त्यामुळे चार दशकांपूर्वी गाजलेल्या या कवितासंग्रहाची आकर्षक स्वरूपातील दुसरी सुधारित आवृत्ती वाचकांसाठी एक मनोहारी पर्वणीच ठरली आहे.


कवी दीपक शेडगे यांनी मनोगतात व्यक्त केल्यानुसार, कवितेच्या माध्यमातून स्वत:चा शोध घेता घेता आजूबाजूच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा, निसर्गाचा आणि माणसाच्या जगण्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. संग्रहातील कवितांतून त्यांनी भोवतालाविषयी मनात उमटलेल्या भावनांचा आणि विचारांचा चित्रात्मक आलेख शब्दांच्या माध्यमातून रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यातून प्रभावी परिणाम साधण्यात ते यशस्वी झालेले आहेत. या संग्रहाला काही प्रख्यात समीक्षक आणि साहित्यिकांचे आस्वादक आणि विश्लेषक अभिप्राय लाभले आहेत. डॉ. मुरलीधर जावडेकर यांच्या विवेचक लेखात दीपक शेडगे यांच्या कवितांचे चित्रकला आणि कविता या कलेच्या दोन प्रकारांच्या मिश्रणातून निर्माण झालेल्या कलात्मकतेची चिकित्सा केलेली
आहे.



डॉ. जावडेकर म्हणतात की, “शेडगे यांच्या कविता चित्रांतून चित्रापलीकडे, शब्दांतून शब्दांपलीकडे नेणार्‍या कविता आहेत.” डॉ. जावडेकर यांनी शेडगे यांच्या अनेक कवितांची उद्धरणे त्यातील बलस्थाने आणि सौंदर्यस्थळे यासह दाखवून दिली आहेत. प्रख्यात समीक्षक डॉ. प्रा. शशिकांत लोखंडे यांनी आपल्या लेखातून शेडगे यांच्या काव्यातील व्यक्तिविशेषाचे स्वरूप उघड करताना नमूद केले आहे की, “शेडगे यांच्या कविमनाला हरवलेपणाची जाणीव होते आणि वर्तमान जीवनव्यापारात सर्व मानवी नाती विस्कटल्यासारखी दिसतात.” डॉ. लोखंडे यांच्या विश्लेषणानुसार ’स्पर्श’मधील चिंतनशील कवितेत ‘रोमॅन्टीसिझम’चा स्पर्श झाल्यामुळे ही कविता बरीचशी स्वागतपर, आत्मभानपर झालेली आहे.



’स्पर्श’ कवितासंग्रहाच्या या सुधारित आवृत्तीतील कविता चार दशकांपूर्वीच्या काळातील वातावरणात लिहिलेल्या असल्या तरी त्या आजही तितक्याच ताज्या आणि मनाला स्पर्श करणार्‍या आहेत. या कवितांचा मूळ गाभाच मानवी संवेदना आणि भोवतालातील जीवनातील गूढता आणि रहस्य उलगडून दाखविणारा आहे, याचा प्रत्यय त्यांच्या कवितांतून प्रकर्षाने येतो. उदाहरणादाखल, ‘दिशाहीन’ या कवितेत ते प्रश्न विचारतात, मुळांनीच मातीशी वैर पत्करल्यावर झाडांनी कसे जगावे, फांद्यानीही पानापासून विभक्त व्हायचं ठरवल्यावर.


या कवितासंग्रहात काही व्यक्तिनिष्ठ कविता देखील आहेत, ज्यापैकी ‘सवय’, ‘मोकळे केस’, यापूर्वीही, ‘सावली’, ‘मी असा मरताना’, ‘बाप’, ‘कधी काळी’, ‘मी पाहतो’, ‘राणीस’, ‘चॅप्लीन ’,म्हातारा, ‘ती गोष्ट’, ‘तू’ या अनुभवजन्य कविता हृदयस्पर्शी आहेत. कवी आपल्या कवितांतून केवळ मनोहारी शब्दच्छल न करता भवतालच्या गूढतेबद्दलचे प्रश्न करून वाचकांस निरूत्तर करतो. याचा दाखला देण्यासाठी ’सावली ’ या कवितेतील खालील ओळी उद्धृत कराव्याशा वाटतात.
पायाखालची जमीन अन् डोक्यावरचा सूर्य यांच्यात सापडलेल्या तुझ्या सावलीचा अर्थ तुझ्या देहाला तरी समजलाय का ते विचारून बघ कविच्या अतिसंवेदनशील मनातून उमटलेल्या या कवितांतून भवतालच्या वेदनेचे आर्त रसिकाला व्याकूळ करते. कविला आपला भवताल, आपल्या जीवनातील वेदनादायी आठवणी छळत असतानाही तो शांतपणे आपल्या कवितेत शब्दांच्या माध्यमातून प्रतिमा-प्रतीकांचे विश्व उभारतो. या संमिश्र स्वरूपाच्या कवितांतून जीवनातील क्षणभंगूरता, उदासीनता, अस्वस्थ क्षणांचे दडपण, नात्यागोत्यांची उसवणारी शिवण, प्रियेचे भावूक संदर्भ, मृत्यूच्या दारातले भयनाट्य, असे अन्वयार्थ दडलेले दिसून येतात.

कमल शेडगे यांचे मुखपृष्ठ या कवितासंग्रहाच्या आशयाला साजेसे असून त्यातील सुलेखनाद्वारे आकर्षक केलेली शीर्षके संबंधित कवितांना समर्पक अशीच आहेत. कवी आणि चित्रकार असलेल्या शेडगे बंधूंच्या कलेची ही एकात्म निर्मिती पुस्तकाच्या सौंदर्यात भर टाकणारी झाली आहे. एकूण हा कवितासंग्रह पुन्हा पुन्हा वाचावासा वाटणारा आणि त्यातील कवितांचा रसास्वाद घेता घेता मनाच्या हळुवार कोपर्‍यात जपून ठेवण्यासारखा आहे. या सुंदर पुस्तकाच्या निर्मितीसाठी ’अक्षरसंवेदना प्रकाशन’ यांचे अभिनंदन करताना चित्रकार कमल शेडगे यांचेही स्मरण करणे उचित ठरेल! ‘आर्ट स्कूल’मधील विद्यार्थ्यांना अभ्यासनीय व उपयुक्त असा कमल शेडगे यांच्या अक्षरलेखन शैलीचे विविध प्रयोग असलेला दीपक शेडगे यांचा वेदक व भेदक कवितांचा ‘स्पर्श’ हा काव्यसंग्रह रसिक वाचकांसाठी संग्रहणीय झाला आहे.


कवितासंग्रहाचे नाव : स्पर्श

कवी : दीपक शेडगे

प्रकाशक : अक्षर संवेदना प्रकाशन

मुखपृष्ठ मांडणी, अक्षर लेखन : कमल शेडगे

पृष्ठे : ८०

मूल्य : रुपये २००




- रमेश सावंत 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121