काहीही झालं तरीही शिवसेना आणि वडापावचं नातं अबाधित राहिलंयं...
23-Apr-2022
Total Views | 238
मुंबई : शिवसेनेचं कुठलंही आंदोलन असो, मोर्चा असो वा कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारसभेचा नारळ असो. पक्ष स्थापन झाल्यापासून आजपर्यंत कुठल्याही नेत्याला वडापाव वेगळा करता आलेला नाही. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा पठण करण्याबद्दल चॅलेंज केले होते.
त्यानंतर शिवसैनिकांनी राणांच्या या आव्हानाला स्वीकारत संपूर्णपणे मातोश्रीबाहेर चोख बंदोबस्त लावला. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यांना भेट देऊन त्यांचा जोश द्वीगुणीत केला खरा परंतू, शिवसैनिकांच्या चहा नाश्त्याची व्यवस्था मात्र, पक्षाला करता आली नव्हती. त्यामुळे केवळ वडापाववरच त्यांना समाधान मानावे लागले.
राणा दाम्पत्य हे सकाळी नऊ वाजता मातोश्रीबाहेर येणार म्हणून सकाळपासूनच सगळे शिवसैनिक जमले होते. राणा दाम्पत्याला घेराव घालण्यासाठी काहीजण त्यांच्या निवासस्थानीही पोहोचले होते. दिलेली वेळ उलटून गेली तरीही राणा कुटूंबिय काही हनुमान चालीसा पठणाला येईना. हळूहळू उनं डोक्यावर सरकू लागली होती. मीडियाही पोहोचला होता. संपूर्ण रंगीत तालीम सुरू होती.
याच आंदोलनात वयोवृद्ध शिवसैनिक आज्जीही येऊन पोहोचल्या होत्या. मातोश्रीबाहेर खासदार विनायक राऊत, युवासेना नेते वरुण सरदेसाईही पोहोचले होते. मात्र, उनं डोक्यावर आली तरीही कुणीच घटनास्थळी येईना. आंदोलन सुरू झाले, घोषणाबाजी सुरू होती. मात्र, राणा दाम्पत्य काही पोहोचू शकलेले नव्हते. पोलीसांनी नोटीस बजावल्याने त्यांनी काही स्वतःचे घर सोडले नाही.
इकडे शिवसैनिकांच्या अंगाची लाही लाही होत होती. तर सकाळापासून तातकळत बसल्याने भूकाही लागल्या होत्या. शिववडा ही संकल्पना शिवसेनेने सर्वात आधी महाराष्ट्रात मांडली. हीच संस्कृती आजही दिसली. सर्व नेते मंडळींनी वडापाव वाटत आपल्या कार्यकर्त्यांच्या भुकेला काही काळ का होईना पण उसंत दिली. खासदार विनायक राऊत, माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, वरुण सरदेसाई, माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनीही वडापाववर यथेच्छ ताव मारला.
राणा दाम्पत्य मात्र एसीमध्ये बसूनच!
याउलट राणा दाम्पत्य मात्र, घरी बसून होते. त्यांनी शिवसेनेला इशारा दिला तोही फेसबूक लाईव्ह आणि चॅनल्सच्या मुलाखतींद्वारेच. फक्त एक आमदार आणि एक खासदाराने संपूर्ण शिवसेनेला रस्त्यावर आणल्याची टीकाही त्यावेळी करण्यात आली होती. कदाचित हनुमान चालीसा पठणाला परवानगी दिली असती तर चित्र वेगळे असते, अशी प्रतिक्रीया याबद्दल राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राणा दाम्पत्य ताब्यात
एका खासदार आणि आमदाराला ज्या प्रकारे पोलीस ठाण्यात फरफटत नेण्याचे काम सुरू आहे, त्यात मी एकदा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विनंती करु इच्छीते की आज महाराष्ट्रात तुमच्यासारखे नेते असतानाही लोकप्रतिनिधींना ही वागणूक मिळत आहे. येणाऱ्या काळात जर आम्हालाच न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेला काय मिळणार?", असा प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करुन दाखवणार, असा इशारा शिवसेनेला दिल्या प्रकरणी अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर कलम १५३ (अ) आणि (ब) अंतर्गत राणा दाम्पत्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार करू शकते, अशी सुत्रांची माहिती आहे.. पोलीस त्यांना रविवारी न्यायालयात हजर करणार आहेत. चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी त्यांनी ही कारवाई होऊ शकते, असा आरोप ठाकरे सरकारच्या नेत्यांनी केला आहे.