नागपूर : आमची ताकद काय आहे ते राणा दाम्पत्याला कळेल. या पुढचा आमदार आणि खासदार अमरावतीतून शिवसेनेचा निवडून येईल, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा पठणाची घोषणा केली.
राणा कुटूंबियांच्या आंदोलनावर प्रतिक्रीया देण्यासाठी त्यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राऊत यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली. अमरावती जिल्ह्यात आपलीच हवा आहे. शिवसेनेचा तिथे बालेकिल्ला आहे. पुढच्या वेळेस तिथली जागा निवडणूका जिंकून दाखवू असा इशारा त्यांनी दिला.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांचा बंटी आणि बबली, असा उल्लेख करत हिंदुत्वाच्या नावाखाली बोगसपणा करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. हनुमान चालीसा मंदिरात वाचावे, आपल्या घरी वाचावी त्यासाठी मातोश्रीची जागा निवडावी हे कुणाचे कारस्थान आहे. त्यांचा हिंदूत्वाशी संबंध काय आहे. श्रीरामाचे नाव घेण्याला यांचा विरोध होता. हिंदूत्व हा शब्द उच्चारायला त्यांना लाज वाटत होती.
तेव्हा त्यांनी हिंदूत्व आम्हाला शिकवू नये. हे जे दीड शहाणे आहेत. त्यांनी कृपा करुन शिवसेनेच्या वाटेले जाऊ नये. मातोश्रीची छेडछाड करू नका, शिवसेनेच्या संयमाची परीक्षा पाहू नका. हिंदूत्वाच्या नावाने आज तुमच्या विषाला उकळी फुटलेली आहे. ते दाबण्याची धमक शिवसेनेत आहेत. मी आजही नागपूरातच आहे. उद्धवजींनी आम्हाला नागपूरातच रहायला सांगितले आहे., असेही ते म्हणाले.
राष्ट्रपती राजवट कशी लावली जाते हे आम्हाला देखील माहिती आहे. आम्हाला कायदा कळते, आम्हाला घटना कळते. जातीचे बोगस प्रमाणपत्र दाखल करुन जी व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढते. ज्या बोगस प्रमाणपत्राला उच्च न्यायालयात दाद मिळाली नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयात गेलेल्यांनी आम्हाला हिंदूत्व शिकवू नये. या महाराष्ट्रामध्ये ढोंग पाप आणि खोटेपणाला थारा नाही. ही शिवसेना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचीच आहे.
मातोश्रीची रेकी करण्याचा हा प्रयत्न झाला. शिवसैनिक कंटाळले. शिवसैनिक चाल करुन गेले. सत्ता असेल नसेल आम्हाला परवा नाही परंतू, पुन्हा असा प्रकार झाला तर पुन्हा एकदा शिवसैनिक चाल करुन जातील. महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करायचे अराजक निर्माण करायचे. शिखंडींना पुढे करुन आमच्यावर हल्ले करायचे हे असेच चालणार नाही.
महाभारत नव्याने घडवण्याची ताकद शिवसेनेची सुरू आहे. हे सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करेल. बोगस प्रमाणपत्रात निवडून आलेले खासदार आहेत. त्यांना माझे आव्हान आहे की, पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून या, मी पाहतो, असा इशारा त्यांनी दिला. अशी बरीच आव्हानं आम्ही स्वीकारली आणि उलटवून लावली, असेही राऊत म्हणाले.