मुंबई : "राज्यात भोंगे लावण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक असेल. राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडून यासंदर्भात एकत्रित असे धोरण येत्या काही दिवसात ठरवलं जाईल. त्यातून पुढे सर्वांसाठी गाईडलाइनही काढण्यात येतील.", असे म्हणत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बेकायदा भोंग्यांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी (दि. १८ एप्रिल) पत्रकारांशी ते यासंदर्भात बोलत होते. याविषयी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दुपारी बैठक होणार आहे.
"येत्या एक-दोन दिवसात दिवसांत भोंग्यांसंदर्भात धोरण ठरवण्यात येईल. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट राज्यासाठी अधिसूचना काढण्यात येईल. यात भोंगे लावण्यासंदर्भात सूचना जारी करण्यात येतील. त्यामुळे कुणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. अन्यथा संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येईल.", असे गृहमंत्री यावेळी म्हणाले. भोंग्याच्या मुद्यावरून राज्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी गृहखात्याने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.