नवी दिल्ली: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अखेर पायउतार व्हावे लागलेच. पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीमध्ये इम्रान यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला. इम्रान पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्या विरोधात कारवाया सुरु झाल्या झाल्या आहेत. इम्रान यांचे निकटवर्ती आणि त्यांच्या पीटीआय या पक्षाचे प्रवक्ता डॉ. अर्सलान खालिद यांच्या घरावर धाड पडली आहे. नेमक्या कुठल्या कारणासाठी ही कारवाई झाली आहे या बद्दल स्पष्ट माहिती मिळाली नाही.
इम्रान यांच्या पीटीआय पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ही माहिती देण्यात आली आहे. अर्सलान यांना कोणाशीही संपर्क करण्यास बंदी करण्यात आली असून त्यांचे फोनसुद्धा हिसकावून घेण्यात आले आहेत. इम्रान यांच्या राजीनाम्यानंतर पाकिस्तानातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधकांनी एकजुटीने माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे भाऊ शहाबाज शरीफ यांना पुढचे पंतप्रधान म्हणून निवडले आहे.