मुंबई : एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजय पांडे हे आता क्रुझ ड्रग्स प्रकरणाचा नव्याने तपास करणार असल्याचे सांगितले जात आहे. यावर आता मोहित कंबोज यांनीदेखील आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी म्हंटले आहे की, "या क्रुझ ड्रग्ज प्रकरणात कोणते मंत्री आणी आमदार होते याचा तपास करण्यात यावा. मी पुरावे द्यायला तयार आहे. हवं तर मला चौकशीला बोलवा," असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच, नव्या पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
"मुंबई पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात तपास करून एफआयआर दाखल करण्यात यावा. मला कधीही चौकशीसाठी बोलवा. माझ्याकडे याचे सगळे पुरावे आहेत. सलीम जावेदची स्टोरी बनवली गेली. आजच्या अधिवेशनातही काहीजण बसलेले आहे. हे देशासमोर उघड व्हायला हवे," अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली आहे. पुढे त्यांनी म्हंटले की, " सुनील पाटील, किरण गोसावी, प्रभाकर साईल, शिवसेनेचा एक मंत्री, काँग्रेसचे असे कुठले मंत्री आहेत? त्यांची या प्रकरणात काय भूमिका आहे? परेळच्या घटनेत कुणी समन्वय केला? याच्या अनेक चर्चा झाल्या परंतु हे प्रकरण दाबले गेले. हे सत्य देशासमोर यायला हवे. गुन्हेगारांना वाचवू नका," अशीही मागणी त्यांनी केली आहे.