ज्ञानेश्वरीतील अतींद्रिय अनुभवांचे वर्णन
ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात माऊलींनी कुंडलिनी जागृतीनंतर येणार्या अतींद्रिय म्हणजेच पराशरीर (पॅरासायकॉलॉजी) अनुभवांचे जे सुंदर वर्णन केले आहे, त्याचा आशय योगमार्गात अग्रेसर असणार्यांना कळू शकेल, अन्यथा केवळ शब्दार्थाने त्याचे रहस्य कळणे असंभव आहे. त्यात वर्णन केलेल्या रहस्यमय अनुभवांचा अनुभूतिजन्य अनुभव आल्यावर जो एक आनंद प्राप्त होतो, त्याचे वर्णन करणे कठीण आहे. सखीभावनांचा तो एक कल्लोळ असतो. ज्ञानेश्वरीचा आशय या अर्थाने समजण्याकरिता योगसाधना आवश्यक आहे. माऊलींनी ज्याअर्थी आपल्या ग्रंथात तसल्या अतीद्रिंय अनुभवांचा साहित्यिक भाषेत उल्लेख केला आहे, त्याअर्थी त्यांना व त्यांच्या काळात तसले दिव्य अनुभव घेणारे योगी असलेच पाहिजेत, हे स्पष्टच आहे. आज अध्यात्मातील दिव्य अनुभूतीबद्दल औदासिन्य दिसून येत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. प्रवचने, उत्तम वक्तृत्व वा शाब्दिक कसरत म्हणजे अध्यात्म वा योग नव्हे, हे आपण लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
उपनिषदे स्पष्टच सांगतात, ‘नायमात्मा प्रवचनेन लभ्य:न मेधया न बहुना श्रुतेन॥’ ज्ञानेश्वरी, पातंजल योगसूत्रे वा तत्सम अतींद्रिय अनुभव ग्रंथित करणारे ग्रंथ कळण्याकरिता प्रत्यक्ष अनुभवांची नितांत आवश्यकता आहे, अन्यथा असल्या चिरंजीवी ग्रंथांचे ज्ञान पूर्णपणे होणार नाही. ही अध्यात्महननाची परिस्थिती बदलली पाहिजे, अन्यथा अन्य सेमेटिक पंथाप्रमाणे वैदिक परंपरा प्राप्त हिंदू धर्म एक निष्क्रिय पंथ बनल्याशिवाय राहणार नाही आणि अध्यात्माच्या नावावर केवळ वाचाळपणाचाच भाग शिल्लक राहील. कर्ण म्हणजे कान. ध्यानधारणा न करता केवळ प्रवचने ऐकून वा विद्वत्तापूर्ण बोलून आपण किती ज्ञानी झालो, असे समजणार्या वाचाळ वीरांना महाभारत ‘कर्ण’ म्हणते, तर रामायण ‘कुंभकर्ण’ म्हणते. ज्ञानमय अशा वैदिक जीवनाकरिता असल्या ‘कर्ण’-‘कुंभकर्णी’ वृत्तीचा नायनाट होणे आवश्यक आहे. प्रस्तुत विषयाकरिता ज्ञानेश्वरीतील सहाव्या अध्यायातील दोन-तीन ओव्या जाणण्याचा म्हणजे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करू.
बुद्धीची फुलिका विरे। परिमळ प्राणी उरे।
तोही शक्तिसवे संचरेश्र मध्यमेमाजी॥ २४६॥
तव वरिले कडोनी ढाळे।
चंद्रामृताचे तळे। कानवडोनी मिळे शक्तिमुखी ॥ २४७॥
तेणे नाळके रस भरे। तो सर्वांगामाजी संचरे।
जेविचा तेथ मुरे श्रप्राण पवने ॥ २४८ ॥
वरील ओव्यात कुंडलिनी जागृतीनंतर योग्याला येणार्या दिव्य अनुभवांचे साहित्य भाषेतील सरळ व निखळ वर्णन आहे. त्यातील आशय क्रमाक्रमाने पाहू. ‘बुद्धीची फुलिका विरे’ म्हणजे बुद्धीचा फुलोरा शमतो, नष्ट होतो. मेंदूत उत्पन्न होणार्या लहरीप्रपातांनाच आम्ही बुद्धी समजतो. सर्व विश्वातील प्रत्येक अस्तित्वात जे सत्य म्हणजे ज्ञान भरले आहे, त्याची प्रत्यक्ष अनुभूती येण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय. असली बुद्धी साधक अंतर्मुख बनल्याखेरीज प्राप्त होत नसते. बुद्धीचे उपकरण जो मेंदू त्याचा तर्कविलास वा फुलोरा म्हणजे बुद्धी नव्हे. असल्या वरपांगी फुलोर्याच्या वर जो साधक चित्ताच्या साहाय्याने जाईल, त्यालाच पलीकडील दिव्य अनुभव येतील. म्हणून प्रथम ‘बुद्धीची फुलिका विरे’ असे ज्ञानेश्वर म्हणतात.
असली तर्कापलीकडील अनुभवजन्य दिव्य अवस्था आली म्हणजे ‘मगपरिमळ प्राणी उरे’ असा अनुभव तो योगी घेत असतो. पदार्थातील अतिशय सूक्ष्मकण आसमंतात भ्रमत असतात. हे सूक्ष्मकण आपले नासिकातील अंतर्भागात जाऊन आपल्याला वास वा परिमळ येत असतो. साधारण व्यक्तीला परिमळ येण्याकरिता बाह्य गंधयुक्त सूक्ष्मकणांची आवश्यकता असते. त्याशिवाय अशांना कोणताच गंध येणार नाही. परंतु, वर वर्णन केलेली अवस्था याही पलीकडील असाधारण आहे. कोणत्याही बाह्य सूक्ष्मगंधकणांशिवाय नासिकेतील पेशी सहज स्पंदन पावल्यामुळे योग्याला असा परिमळ येत असतो. बाह्य परिमळाशिवाय तो परिमळ घेऊ शकतो. प्रथम आपल्याला वास वा परिमळ कसा येतो, याचे सामान्य विज्ञान पाहू.
आपल्या नासपुटातील वरच्या भागातील अंत:त्वचेवर अतिशय सूक्ष्म अशा पेशी असतात. त्या प्रत्येक पेशीवरील बाह्य अंगावर अतिशय सूक्ष्म असे केस एखाद्या मखमलीप्रमाणे भरलेले असतात. बाहेरील गंधयुक्त पदार्थाचे सूक्ष्मकण वातावरणातील हवेवर तरंगत जाऊन परिमळाचा अनुभव घेणार्याचे नाकात जातात. ते गंधकण अनुभव घेणार्याच्या नाकाच्या वरच्या अंतर अंगातील पेशीच्या सूक्ष्मकेसांवर (उळश्रळरीू उशश्रश्री) जाऊन आदळतात. त्या गंधकणांच्या घटनेनुसार व भारानुसार ते गंधकण नासपेशींच्या केशसंभारावर एक प्रकारचे आंदोलन तयार करतात. असली आंदोलने नासपेशींच्या केशसंभारावर विशिष्ट मोडी तयार करतात. तसल्या पेशीकेसांच्या विशिष्ट मोडीमुळे नाकात येणार्या मज्जातंतूना विशिष्ट गंधाची जाणीव होते. प्रत्येक गंधकणाच्या घटना, आकार व भारानुसार नाकातील पेशीकेसांच्या मोडी विभिन्न होणार आणि तसल्या विभिन्न मोडिगणिक मज्जातंतूंना त्या त्या कणभारानुसार विभिन्न गंधांची जाणीव होणार.
मज्जातंतूंची ही जाणीव बाह्य पदार्थांच्या सूक्ष्मकणांवर अवलंबून असते. सूक्ष्मकणांच्या आघातामुळे नाकातील गंधपेशीवरील केसावर विभिन्न मोड पडून प्रत्येक पदार्थकणांनुसार विभिन्न गंधांची जाणीव होणार. असल्या परिमळ जाणिवेकरिता बाह्य पदार्थापासून मोकळ्या सुटणार्या गंधकणांची आवश्यकता असते. म्हणजे बाह्य उत्तेजक नसेल, तर घेणार्याला गंधाचा अनुभव येणारच नाही. ‘परिमळ घ्राणी उरे’ या ओवीपदाद्वारे ज्ञानेश्वरांना निराळेच सांगायचे आहे. असला परिमळ योग्यामध्ये स्वयंभू असतो. असल्या परिमळाला बाह्य पदार्थापासून मोकळ्या सुटणार्या गंधकणांची आवश्यकता नसते. म्हणजे बाह्य उत्तेजकांची आवश्यकता नसते. उत्तेजक नसेल, तर नासपेशीतंतूवर आघात कसा होणार एवं त्या आघातामुळे होणारे गंधज्ञान कसे होणार? येथे अतींद्रिय अनुभवशास्त्राची आवश्यकता आहे. असल्या दिव्य अवस्थेत असणार्या साधकाचे अंगप्रत्यंगाचे स्पंदन ‘कुंडलिनी’ जागृतीमुळे आपोआपच विभिन्न पद्धतीने होत असते.
’कुंडलिनी’ जागृतीमुळे साधकाच्या सर्वांगातील प्रत्येक पेशीपेशींमधून एक दिव्य स्पंदन उत्पन्न होत असते असा सर्व सावध साधकांचा अनुभव आहे. ‘कुंडलिनी’ जागृतीचे स्थान केवळ मूलाधार नसून साधकाच्या शरीरातील यच्चयावत पेशीपेशींतून होत असते. त्यामुळे सर्व अवयवातील असंख्य पेशी ‘कुंडलिनी’ जागृतीच्या नवचैतन्यामुळे ’स्फुरित एवं स्पंदित’ होत असतात. या असाधारण अवस्थेला नाकातील गंधपेशीतंतू अपवाद नसतात. नाकांतील गंध पेशीतंतू उत्तेजित झाल्यामुळे त्यांचा स्वैरसंचार होत असतो. त्या स्वैरसंचारामुळे त्यांना विभिन्न प्रकारच्या मोडी पडत असतात. त्यामुळे त्यातील मज्जातंतूद्वारे मेंदूला तसल्या प्रकारच्या गंधाची आपोआप जाणीव होणार. असली जाणीव म्हणजेच गंधभावना होय. म्हणून ‘कुंडलिनी’ जागृत झालेल्या महान साधकाला बाह्य उत्तेजक गंधपदार्थ नसतानाही आपोआपच अनेक दिव्य गंध येत असतात. म्हणजे असल्या योग्याचा परिमल बाह्य पदार्थात नसून त्याच्या प्राणातच आहे. म्हणून माऊली म्हणतात ’परिमळ घ्राणी उरे...!’
- योगिराज हरकरे