नवी दिल्ली: देशातील स्टार्टअप्स कडून आता पर्यंत तब्ब्ल ७ लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी नुकतेच राज्यसभेत सांगितले. याच बरोबरीने देशातील नोंदणीकृत स्टार्टअप्सची संख्यासुद्धा ६५ हजारांच्या वर गेली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या स्टार्टअप्स कडून सरासरी ११ याप्रमाणे ७ लाख नवीन नोकऱ्यांची निर्मिती झाली आहे. २०१६ साली भारत सरकारने स्टार्टअप्स इंडिया उपक्रम चालू केला होता. तेव्हा भारतात फक्त ७२६ नोंदणीकृत स्टार्टअप्स होते, ती आता थेट ६५ हजारांच्या वर ही संख्या जाऊन पोहोचली आहे.
"हे स्टार्टअप्स कृत्रिम बुद्धिमत्ता,हार्डवेअर तंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी यांसारख्या तब्ब्ल ५६ विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. तसेच देशातील ६४० जिल्ह्यांमध्ये किमान एकतरी स्टार्टअप आहे. भारत सरकारने नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरु केलेली ही योजना यशस्वी होते आहे आणि यातून भारतातील उद्योजकतेला आणि रोजगाराला चालना मिळेल." असेही गोयल यांनी यावेळी स्पष्ट केले.