मुंबई: कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा येथे घर कोसळून एका मुलाचा मृत्यू झाला आणि दोन महिला जखमी झाल्या आहेत. ड्रेनेज लाईनचे काम सुरू असताना तळमजला अधिक एकमजली घराचा मोठा भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत नौशाद अली हा बालक गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि शाहीदुनिसा रैन, हसीना शहा या महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेतील मृत मुलाच्या कुटुंबियांना महापालिकेने १० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी आणि जखमींनाही मोफत उपचार देऊन काही प्रमाणात आर्थिक मदत करावी, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक कमलेश यादव यांनी केली आहे.
कांदिवलीतील शिंपोली टॉवरजवळ रस्त्याचे काम सुरु असताना ड्रेनेज लाईनचेही काम सुरू होते. तेथील कंत्राटदाराने रस्त्याची कामे करण्याअगोदर ड्रेनेज लाईनचे काम सुरु केले. तेथील एका चाळीतील तळमजला अधिक एकमजली घराजवळ त्याने अंदाजे तीन - चार फूट खोदकाम केले. परंतू, ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण होण्याआधीच एक मजली घराचा मोठा भाग शनिवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला. मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी दुर्घटनाग्रस्त घराजवळ धाव घेऊन आणि दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकानेही तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य हाती घेतले. स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि वॉर्ड अधिकारी या दुर्घटनेची अधिक चौकशी करीत आहेत.