भरतनाट्यमची उपासक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2022   
Total Views |


Shilpa Deshmukh
 
 
 
‘लोकल ते ग्लोबल’ भरतनाट्यम पोहोचविण्याचा मानस राखणार्‍या नाशिकमधील शिल्पा देशमुख यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारा हा लेख...
 
 
 
‘भरतनाट्यम’ क्षेत्रातील नाशिकमधील नावाजलेलं नाव म्हणजे शिल्पा देशमुख. शिल्पा मूळच्या औरंगाबादच्या. औरंगाबाद व पुढे पुणे येथे शिक्षण पूर्ण केलेल्या शिल्पा, भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यकलेला तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील अशा समर्पित नृत्यांगना म्हणून ओळखल्या जातात. नृत्यक्षेत्रात शिल्पा यांचा प्रवेश मात्र ठरवून झालेला नाही. शालेय शिक्षण घेत असताना वडिलांच्या झालेल्या आकस्मित निधनाचा आघात सहन करणे लहानग्या शिल्पासाठी सोपे नव्हते. 'या लहान मुलीचे मन रमावे,म्हणून हिला एखाद्या कलेच्या शिक्षणासाठी पाठव,' हा त्यांच्या आईच्या मैत्रिणीने दिलेला सल्ला शिल्पा यांच्या आयुष्याची वाट ठरविण्यास कारणीभूत ठरला. घराजवळ असणार्‍या एका भरतनाट्यमच्या क्लासमध्ये शिल्पांचे नाव नोंदविले गेले. भरतनाट्यम नृत्यकला म्हणजे नेमकं काय, आपल्याला खरंच हेच करायचे आहे का, हे प्रश्नदेखील न पडण्याच्या त्यांच्या लहान वयात मराठवाड्यातील ख्यातनाम नृत्यगुरुंकडे नृत्याचे धडे गिरवण्याची शिल्पा यांनी सुरुवात केली.
 
 
 
‘भावना-संगीत-लय’ या त्रयीची सांगड घालून होणार्‍या अभिव्यक्तीचं एक प्रभावी माध्यम म्हणजे भरतनाट्यम. शास्त्रीय नृत्यातील महत्त्वाचं नाव. मुद्रा, अभिनय व पद्म (पदन्यास) यांचा अपूर्व संगम असलेली एक कला. वयाच्या सातव्या वर्षी नृत्याचे औपचारिक शिक्षण सुरू झाले आणि वर्षभरातच शिल्पा सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी ठरली. नृत्याची आवड तर निर्माण झालीच, पण विविध स्पर्धांमध्ये बक्षीसेदेखील मिळू लागली. नृत्यशिक्षिका मीरा पाऊस्कर यांनी आपल्या विद्यार्थिंनीमधील गुणांची पारख केली. इतकेच नव्हे, तर नृत्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिल्पाला विनामूल्य मार्गदर्शनदेखील केले. इयत्ता सातवीत दिल्लीतल्या बालभवनमध्ये शिल्पाने नृत्य सादर केले आणि केंद्र सरकारची शिष्यवृत्ती तिला मिळाली. पुढच्याच वर्षी अमेरिका व इंग्लंडमध्ये जाऊन तिथे भरतनाट्यम सादर करण्याची संधी शिल्पाला प्राप्त झाली. वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी अरंगेत्रम करणार्‍या शिल्पाने मग नृत्याला जीवनाधार मानत तोच ध्यास घेतला.
 
 
 
आपल्यातील कलागुणांना प्रोत्साहन देणार्‍या गुरूंचे ऋण मान्य करत त्या जाणीवेतून प्रवास करावा, असे सांगतानाच आजच्या आपल्या यशाचे श्रेय शिल्पा आवर्जून आपल्या आईलाही देतात. “अभ्यास, शिस्त, एकाग्रता आणि परिपूर्णतेचा आग्रह याचं आईने केलेलं कसोशीने पालन आपल्यासाठी दिशादर्शक ठरलं,” असं त्या सांगतात. आजवरच्या प्रवासातले अनेक टप्पे आठवणीत असले तरी नृत्याच्या परीक्षेसाठी मुंबईत असताना उसळलेल्या दंगलीचा प्रत्यक्ष अनुभव त्यांच्या मनावर कायमस्वरूपी कोरला गेला. अशा अनेक अनुभवांचं संवेदनशीलतेने मनावर उमटलेले चित्र रंगमंचावरच्या आपल्या कलाकृतीतून आविष्कारीत होत असते. कलेसाठीचा प्रत्येक क्षण हा सुवर्णक्षण असतो, अविस्मरणीय असतो. कला आपल्याला नित्यनूतन करत असते. आपल्याला येणार्‍या अनुभवांची शिदोरी रसिकांच्या मनामनात कोरली जावी, यासाठी कलाकाराचे प्रयत्न असतात. कला, कलाकार व रसिक या तिन्ही मनांमध्ये एकच प्रतिबिंब उमटतं तो कलाकाराच्या जीवनातला यशस्वी क्षण, असं शिल्पा मानतात. पुण्याच्या ‘ललित कला केंद्रा’तून भरतनाट्यममध्ये पदव्युत्तर, तर गांधर्व महाविद्यालयाच्या अलंकार पदवीधर असणार्‍या शिल्पा नृत्याविषयी एकनिष्ठ भक्तिभाव बाळगून आहेत. कला क्षेत्रात अत्यंत मानाची समजली जाणारी दूरदर्शनची ‘अ’ श्रेणी त्यांना प्राप्त आहे. भारतातूनच नव्हे, तर जगभरातून विद्यार्थी त्यांच्याकडे नृत्याचे धडे घेत आहेत. २०२०-२१ भारत सरकारची ‘फेलोशिप’ त्यांना मिळालेली आहे व त्याअंतर्गत ’भारतीय अभिजात कला आणि संस्कृती’ या विषयांमध्ये त्या संशोधन करत आहेत.
 
 
 
भारतीय तत्त्वज्ञानाचा गौरव हा विविध पारंपरिक नृत्यशैलींचा गाभा. जगभर मान्यता पावलेल्या नृत्यकलेचा आपण एक भाग असावा, याचा शिल्पा यांना आनंद वाटतो. भरतनाट्यममधील सौंदर्य व लालित्य हे वैशिष्ट्य, तर या नृत्यामुळे शरीराला प्राप्त होणारी लय ताल, व्यक्तिमत्त्वाची घडण, भाषा आणि संस्कृती परंपरेची जाणीव हे महत्त्वाचे भाग त्यांना वाटतात. मुख्यत्वे स्त्रीप्रधान व नायिकाप्रधान असणार्‍या या रचनांमध्ये मोक्षाची संकल्पना सुंदर रीतीने मांडलेली असते. नृत्यातील अभिनयामुळे भावभावनांची जाणीव समृद्ध तर होतेच, पण या कलेची वाट स्त्रियांना घर सांभाळूनही चालता येते. त्यामुळे जगभरात कुठेही उत्पन्नाचे एक साधनदेखील त्यातून प्राप्त होऊ शकते, असं मत शिल्पा व्यक्त करतात. ‘सृजननाद’ या आपल्या संस्थेतून नृत्य व गायनाचे धडे देणार्‍या शिल्पा ‘लोकल ते ग्लोबल’ या संकल्पनेचा पुरस्कार करतात. शास्त्रीय नृत्य जागतिक पातळीवर मान्यता पावत असताना भारतात ते केवळ मोठ्या किंवा निमशहरी भागामध्येच न राहता, अगदी लहान खेड्यांमध्येदेखील पोहोचावं,त यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. अर्थात खरा कलाकार तोच ज्याने शिक्षणाची आस सोडली नाही आणि खरा गुरू तोच जो आयुष्यभर एकीकडे विद्यार्थी राहण्यास तयार आहे, असे मानणार्‍या शिल्पा भविष्यात नृत्याचे अजून शिक्षण घेण्याचा मानस राखून आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@