नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीर मध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधला जातोय. चिनाब नदीवर बांधल्या जाणाऱ्या या पुलाची थक्क करणारी छायाचित्रे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर टाकली आहेत. हा पूल जम्मू आणि काश्मीर मध्ये चिनाब नदीवर बांधला जात आहे. अस्विनी वैष्णव यांनी टाकलेल्या छायाचित्रांमध्ये या पुलाची कामं दिसत आहे. 'ढगांच्या वरचा जगातील सर्वात उंच कमानदार पूल' असे या पुलाचे वर्णन वैष्णव यांनी केले जाहे. हा पूल फ्रान्समधील आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटरने उंच आहे.
या पुलाचे बांधकाम २००२ मध्ये सुरु झाले होते. चिनाब नदी पासून या पुलाची उंची ३५९ मीटर इतकी आहे. या पुलाची एकूण लांबी १३१५ मीटर असून यातील चिनाब नदीवरील मुख्य कमानीच्या ४७६ मीटर भागासाठी स्टील वापरले गेले आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनीही या पुलाचे छायाचित्र कू ॲपवर टाकले आहे. "नदीवर ३५९ मीटरवरचा हा १३१५ मीटर लांबीचा हा पूल अतिशय सुंदर आहे. भारतीय अभियंत्र्यांच्या कौशल्याची कमाल आहे. या पुलामुळे काश्मीर खोऱ्यातील दळणवळण अजून सुलभ होईल" असे पात्रा यांनी म्हटले आहे.