‘ऑपरेशन शिवशक्ती’मध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

    30-Jul-2025   
Total Views |

नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन शिवशक्ती’मध्ये भारतीय लष्कराने जम्मू – काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

भारतीय लष्कराने सोमवारी रात्री जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात एक मोठी कारवाई केली. या कारवाईत अंधाराचा फायदा घेत भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणारे दोन दहशतवादी ठार झाले. काही दिवसांपूर्वी लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाली होती की काही दहशतवादी पुंछच्या देगवार सेक्टरमधून घुसखोरी करण्याचा विचार करत आहेत. सोमवारी रात्री नियंत्रण रेषेजवळ काही संशयास्पद हालचाली दिसताच लष्कराने सतर्कता बाळगली आणि संपूर्ण परिसराला वेढा घातला. घुसखोर दहशतवाद्यांना शरणागती पत्करण्यास सांगण्यात आले. मात्र, त्यांनी गोळीबारी सुरू केला. प्रत्युत्तरादाखल लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे

चकमकीनंतर, सुरक्षा दलांनी परिसरात शोध घेतला तेव्हा दहशतवाद्यांकडे तीन अत्याधुनिक शस्त्रे आढळली. याशिवाय मोठ्या प्रमाणात गोळ्या, ग्रेनेड, वायरलेस सेट आणि खाद्यपदार्थ देखील जप्त करण्यात आले. यावरून दहशतवादी पूर्ण तयारीने आले होते आणि त्यांचा हेतू भारतात मोठा हल्ला करण्याचा होता, असे स्पष्ट झाल्याचे लष्कराने म्हटले आहे.