नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 'द रेसिस्टन्स फ्रंट' (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेचा थेट सहभाग असल्याचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (युएनएससी) निर्बंध समितीच्या निरीक्षण पथकाने (मॉनिटरिंग टिम) आपल्या अहवालात स्पष्टपणे नोंदवले आहे. हा अहवाल भारतासाठी एक महत्त्वाचा राजनैतिक विजय मानला जात आहे.
अहवालात टीआरएफच्या नावाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा आणि नंतर माघार घेतल्याचा स्पष्ट उल्लेख त्यात आहे. २२ एप्रिलला पाहलगाममधील पर्यटनस्थळी टीआऱएफने हल्ला केला होता. यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. टीआऱएफने त्याच दिवशी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत घटनास्थळाचे फोटोही प्रसिद्ध केले. मात्र २६ एप्रिल रोजी टीआऱएफने ती जबाबदारी मागे घेतली, आणि त्यानंतर त्या संघटनेने कोणताही पुढचा संवाद साधलेला नाही.
हा अहवाल टीआऱएफ आणि लष्कर-ए-तोयबाचे संबंध दर्शवणारा पहिला अधिकृत आंतरराष्ट्रीय दस्तऐवज ठरतो. २०१९ नंतर प्रथमच एखाद्या पाकपुरस्कृत दहशतवादी गटाचा नामोल्लेख या अहवालात झाला आहे. लष्कर ए तोयबा आणि टीआऱएफ यांच्यातील संबंध नाकारता येत नाहीत, असेही अहवालात म्हटले आहे. एका सदस्य राष्ट्रानेही म्हटले की, लष्कर-ए-तोयबाच्या मदतीशिवाय असा मोठा हल्ला होऊच शकत नाही. दुसऱ्या राष्ट्राने टीआएफ म्हणजेच लष्कर ए तोयबा आहे, असे म्हटले; तर तिसऱ्या सदस्य राष्ट्राने मात्र लष्कर ए तोयबा सध्या निष्क्रिय असल्याचा दावा केला.
या अहवालातील टीआऱएफचा उल्लेख आणि पाकिस्तानकडून त्या उल्लेखाला हटवण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे पाकच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या प्रचारावर मोठा आंतरराष्ट्रीय फटका बसल्याचे भारत सरकारच्या सूत्रांनी सांगितले. टीआऱएफने 'पीपल अगेन्स्ट फॅसिस्ट फ्रंट' (पीएएफएफ) अशा आधुनिक नावांमागे लपून पाकिस्तानने आपल्या जिहादी गटांना देशांतर्गत गट म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला, पण तो आता उघड झाला आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी याआधी पाकिस्तान संसदेत दावा केला होता की, पाहलगाम हल्ल्याबाबतच्या युएनएससीच्या प्रसिद्ध निवेदनातून टीआऱएफचा उल्लेख हटवण्यास ते यशस्वी झाले. मात्र आता टीआऱएफ चा ठोस उल्लेख एमटी च्या अधिकृत अहवालात झाल्याने, भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये आपली दहशतवादविरोधी भूमिका प्रभावीपणे मांडल्याचे अधोरेखित झाले आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालय डिसेंबर २०२३ पासूनच टीआऱएफ आणि इतर पाकपुरस्कृत गटांविषयी एमटी ला सातत्याने माहिती देत आहे. २०२४ मध्ये दोन वेळा टीआऱएफ च्या हालचालींबाबत माहिती देण्यात आली होती. मे २०२४ मध्ये परराष्ट्र मंत्रालयाचच्या नेतृत्वाखालील एक आंतरमंत्रालयीन प्रतिनिधिमंडळाने न्यूयॉर्कमध्ये युएनएससी सदस्य देशांना टीआऱएफ व पाकिस्तानच्या दहशतवादी नेटवर्कबाबत सखोल माहिती दिली होती.