चंदिगढ : देशात सध्या विधानसभा निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. पाच राज्यांतल्या या निवडणुकांच्या रणधुमाळीत आम आदमी पार्टीने यंदा पंजाबमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काँग्रेससमोर आता मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लुधियाणात झालेल्या प्रचार सभेत चरणजीत सिंह चन्नी यांना काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले. या निर्णयावर आम आदमी पार्टीने समाजमाध्यमावरून काँग्रेस पक्षाची खिल्ली उडवली असल्याचे पहायला मिळत आहे.
पंजाबमध्ये काँग्रेसने कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढवावी यासंदर्भात एक सर्वे करण्यात आला होता. यात ४० टक्के लोकांनी चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाला पसंती दिली. चन्नी यांच्या नेतृत्वात पंजाबमध्ये काँग्रेसने निवडणूक लढवावी असे लोकांचे म्हणणे आहे. याउलट फक्त २१ टक्के लोकांनीच सिद्धू यांच्या नावाला पसंती दिली. २७ टक्के लोकांनी दोघांच्याही नावाला नकार दिला. तर १२ टक्के लोकांनी याबाबत माहित नसल्याचे उत्तर दिले आहे.
राहुल गांधींच्या निर्णयावर 'आप'ने केले ट्विट
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चरणजीत सिंह चन्नी यांना काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केल्यावर आपने त्यांच्या ट्विटरवर यासंदर्भात शुभेच्छा देत गमतीशीर फोटो शेअर करत काँग्रेसची खिल्ली उडवली आहे. "पंजाबचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून रेटा चोरची घोषणा केल्याबद्दल काँग्रेसचे अभिनंदन!", असे त्यांनी यात म्हटले आहे.