
राजीव गांधींप्रमाणे मोदी सरकारची राजवट संपविण्याचा होता कट
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : राष्ट्रीय तपास संस्था (NIA) कायद्यांतर्गत मुंबई येथील विशेष न्यायालयाने २०१८ सालच्या कोरेगाव भीमा प्रकरणातील कबीर कला मंचशी संबंधित चार आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.
कबीर कला मंचचे तीन सदस्य सागर गोरखे, रमेश गायचोर आणि ज्योती जगताप, आणि सहयोगी प्राध्यापक हानी बाबू - यांना भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत इतर कलमांसह देशद्रोह, गुन्हेगारी कट रचणे आणि बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्यांतर्गत (युएपीए) अटक करण्यात आली होती. विशेष न्यायाधीश डी. ई. कोथळीकर यांनी एनआयएने सादर केलेल्या पुराव्यांचा विचार करून सदर आरोपींना जामीन नाकारला. यामध्ये सरकार उलथून टाकण्याचे प्रयत्न केल्याविषयी एनआयएनने सादर केलेल्या पुराव्यांची गंभीर दखल न्यायालयाने घेतली.
सदर आरोपींनी दिलेल्या घोषणा या दोन गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणाऱ्या आणि सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या असल्याचे न्यायालयाने नमूद केले. सहआरोपी रोना विल्सनने लिहिलेल्या एका पत्राचीही न्यायालयाने दखल घेतली आहे. सीपीआय – माओवादी मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला संपविण्यासाठी कार्यरत असल्याचे पत्रातील मजकुरातून समोर येत असल्याचे न्यायालयाने म्हटले. त्याचप्रमाणे राजीव गांधी यांच्या निवडणूक रॅलीस लक्ष्य करून ज्याप्रमाणे त्यांची हत्या घडविण्यात आली, तशाप्रकाराची पुनरावृत्ती करण्याचाही प्रयत्न सदर आरोपींचा होता. बंदी घातलेल्या संघटनेच्या इतर सदस्यांसह या आरोपींनी संपूर्ण देशात अशांतता निर्माण करण्यासाठी गंभीर कट रचला होता, असेही न्यायालयाने नमूद केले.