‘एकात्म मानव दर्शन - संकल्पना कोश’(Ekatma Maanav Darshan - Glossary of Concepts)या एका विशेष कोशाचे प्रकाशन रा. स्व. संघाचे प्रकाशन सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची विशेष उपस्थिती होती. सदर कार्यक्रम पुणे येथे संपन्न झाला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘एकात्म मानव दर्शन - संकल्पना कोश’ची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय चिंतनावर आधारित या कोशाविषयी...
देशाचा प्रगत सांस्कृतिक वारसा, समृद्ध राष्ट्रीय जीवन पुसून टाकण्याचे नियोजनबद्ध काम परकीय आक्रमकांनी केले होते. विशेषतः ब्रिटिशांनी धूर्तपणे भारतीय विचार मागास ठरवून पाश्चात्त्य विचारांची पेरणी प्रभावीपणे केली होती.‘मॉर्डनायझेशन’ म्हणजे ‘वेस्टर्ननायझेशन’ असे देशभर बिंबवले होते. हिंदुस्थानी मूल्य, परंपरा हीन, अमानवी ठरवून त्याचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला. यात ते यशस्वी झाले होते. शिक्षित-उच्चशिक्षित भारतीय वसाहतवादाचे वाहक झाले होते.
अशा वातावरणात भारतीय जनमानस आपली रोजचा जगण्याचा संघर्ष करत असताना स्व-त्वसाठी अस्वस्थ होते. मुळांकडे परत जाण्याची ओढ सर्वसामान्यांच्यात निर्माण होत होती. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मार्ग शोधून तो दाखवण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यातूनच ‘एकात्म मानव दर्शना’ची मांडणी केली गेली. साम्राज्यवादी मानसिक पकडीतून ‘राष्ट्रीय मानस’ मुक्त करण्याच्या प्रयत्नातील ही एक विशेष महत्त्वाची घटना होती. ‘एकात्म मानव दर्शना’चे उद्गाते पंडित दीनदयाळ यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे याचे अधिक विश्लेषण झाले नव्हते. मात्र, काही प्रमाणात चर्चा सुरू झाली होती.
तत्कालीन जनसंघ आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वर्तुळात यावर मर्यादित विचार होत राहिला. स्वदेशीच्या धोरणाचा विचार करणार्या गटात ‘एकात्म मानव दर्शना’वर मंथन होत राहिले. जगभरातील अर्थकारणातील स्थित्यंतराच्या पार्श्वभूमीवर ‘एकात्म मानव दर्शना’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित होऊ लागले आहे. मार्क्सवाद, समाजवाद आणि भांडवलशाही यातून सत्ता बदल झाले. मात्र, सर्वसामान्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा प्रश्न सुटलेला नाही. ‘एकात्म मानव दर्शना’त आर्थिक समानतेच्या मुद्द्यांचा शोध घेता येईल का, असा प्राथमिक विचार होत आहे.
‘एकात्म मानव दर्शना’चा अभ्यास सोपा होण्यासाठी ‘सेंटर फॉर इंटिग्रल स्टडीज अॅण्ड रिसर्च’तर्फे ‘एकात्म मानव दर्शन-संकल्पना कोश’ ’(Ekatma Maanav Darshan - Glossary of Concepts) प्रकाशित करण्यात आला आहे. हा कोश ‘एकात्म मानव दर्शना’चे अभ्यासक, संशोधक, कार्यकर्ते यांच्यासह धोरणकर्ते यांना साहाय्यक ठरेल.कोसळत जात असलेला कम्युनिझम आणि अडखळती भांडवलशाही यातून एका संकटाकडून दुसर्या संकटाकडे जगाची होणारी वाटचाल पाहून पश्चिमेतील बुद्धिजीवी-विचारवंत आपल्या श्रेष्ठत्वाचा अहंकार बाजूला करून तिसर्या पर्याय शोधात आहेत. सर्वजन हिताय-सर्वजन सुखाय जीवनपद्धती, समाजरचना मांडणारा तिसरा पर्याय म्हणजे ‘एकात्म मानव दर्शन’ आहे. मात्र, याची स्वीकृती धोरणाच्या पातळीवर अद्याप झालेली नाही. तत्वतः मान्य परंतु, व्यवहारात नाही अशी स्थिती आहे. स्वातंत्र्यानंतर सत्तारूढ झालेल्या सर्वच शासकांनी या ‘एकात्म मानव दर्शन’ सिद्धांताची उपेक्षा केली आहे. ते विदेशी विकास प्रतिमानाचे अनुकरण करत राहिले आहेत.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी आपण काही एक नवे दर्शन मांडल्याचा दावा केलेला नव्हता. आपल्या भारतीय राष्ट्रीय चिंतनाचे युगानुकूल स्वरूप म्हणजे ‘एकात्म मानव दर्शन’ हीच त्यांची भूमिका होती. याचे वर्णन सनातन हिंदू धर्माचे युगानुकूल सादरीकरण, असे करता येईल.मुळात ‘एकात्म मानव दर्शन’ कोणाएका समूहाचे किंवा विशिष्ट विचारांचे नाही. ते राष्ट्रीय विचारांचे दर्शन आहे. भारतीय चिंतनावर आधारित सर्व विचारप्रवाह आपापल्या पद्धतीने या राष्ट्रीय दर्शनास बळ देत आहेत. स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींचे विचार यात आवश्यकतेप्रमाणे मांडलेले आहेत.या कोशामध्ये राष्ट्रजीवनाशी संबंधित अशा १३१ मूलभूत संकल्पना नोंदवलेल्या आहेत.
धर्म- तत्त्वज्ञान, समाज, आर्थिक आणि अभिशासनिक अशा चार विभागात या संकल्पना मांडलेल्या आहेत. त्यात त्या संकल्पनेचे मूळ, भारतीय चिंतनात ती कुठे येते, आजचा तिचा संदर्भ, अधिकारी व्यक्तींची मते, आज त्यातून दिसणारे भाव व खरे अनुस्यूत असलेले भाव, करणीय कार्य अशा मुद्द्यांवर प्रासंगिक विवेचन केलेले आहे. यात ‘चिति’, ‘विराट’, ‘अखंडमंडलाकार’, ‘अदेवमातृका कृषी’ अशा गूढ वाटू शकणार्या संकल्पना आहेत. तसेच, माहितीच्या पण अपप्रचाराने खर्या अर्थाबद्दल संभ्रम निर्माण केल्या जाणार्या धर्म, अध्यात्म, धर्मराज्य, संस्कृती इ. संकल्पना, चुकीच्या अर्थाने वापरलेल्या सेक्युलॅरिजम, अधिकार, दंड इ. संकल्पना, तसेच सध्या प्रचारात असलेल्या काही पाश्चात्त्य ‘लिबरॅलिझम’, ‘कॅपिटॅलिझम’, ‘रिलिजन’, ‘सोशालिझम’, ‘कम्युनिझम’ अशा संकल्पना यांचे खऱे स्वरूप स्पष्ट केलेले आहे.
सदर कोश मुंबईच्या ‘एकात्म प्रबोध मंडळा’ने रवींद्र महाजन आणि नाना लेले यांच्या संपादकत्वाखाली, देशभरातील ३० विद्वानांच्या लेखनाने चार वर्षांच्या प्रयत्नानंतर तयार केला आहे. ५३३ पानांचा कोष इंग्रजीमध्ये आहे. हा कोश राष्ट्रजीवनासंबंधी भारतीय संकल्पना समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल. देशभरातील मानव्य विद्येच्या सर्व महाविद्यालयात समाज धोरणनिर्मितीच्या संस्थांत हा कोश असणे आवश्यक आहे. या कोशाच्यानिमित्त वसाहतवादी मानसिकता झुगारण्याच्या प्रयत्नांना बळ मिळेल. स्वातंत्र्याच्या अमृत काळात ‘आत्मनिर्भर’ व्यवस्था उभारणीसाठी हा कोश प्रकाश देण्याचे काम करू शकेल.
‘एकात्म मानव दर्शन-संकल्पना कोश’ ’(Ekatma Maanav Darshan - Glossary of Concepts) भारतीय विचार साधना, पुणे (०२०-२४४८७२२५, bhavisafoundation@gmail.com) येथे उपलब्ध आहे.
मकरंद मुळे
(लेखक पत्रकार असून, राजकीय-सामाजिक विश्लेषक आहेत.)